...

51 views

एका सुंदर घरात...🏡
"सुंदर घराची संकल्पना म्हणजे फक्त दिसायला सुंदर नाही, तर माणसांना मिळणाऱ्या सुखांनी भरलेलं आनंदी समाधानी असे हवे सुंदर घर..."
एका सुंदर घराचे स्वप्न पाहिले तू आणि मी... त्या सुंदर घराला घरपण देणारी सावली मी असणार, आपण दोघे ते घरकुल प्रेमाने सजवणार... घराच्या चारही भिंतींना तुझ्या माझ्या गोड संसाराचा गोड स्पर्श झालेला असणार. त्याच सुंदर घरातील चार कोपऱ्यात सुखाचा लखलखाट पडलेला दिसणार...
सुगंधाचा वास, प्रेमाचा प्रकाश, मेजवानी खास, सुखाची आस आणि एकमेकांचा सहवास असणार आपल्या "एका सुंदर घरात"

आपल्या अंगणात समाधानाची तुळस डुलत असेल आणि येता जाता हसत सुखी संसाराला न्याहाळून ती बघेल. तुझ्यातील कर्तृत्व म्हणजे, जीवनात स्त्री पुरुष यांची तुलना करताना पुरुषाचं पहावं कर्तृत्व आणि स्त्रीचं पहावं सौंदर्य, सुगरणता, चपळ आणि चंचल हे गुण... तुझ्या प्रेमाच्या स्पर्शाने झालेली आपली एक डझन मुलं... बाप रे किती आनंदाने भरून जाईल आपलं एकच पण सुंदर घर... घर असेल छोटसंच पण त्यात नांदत असेल माझ्यासोबतच "तृप्ती, सावली, भावना, माया, भक्ती, श्रद्धा, आनंद, प्रेम, सुख, समाधान, प्रसन्न आणि प्रसाद ..." तू घरात आल्यावर आपलं सुंदर घर चैतन्याने भरून जाणार, बाबा बाबा करत आपली मुलं तुलाच येऊन घट्ट बिलगणार, मग दमलेला बाबा सगळ्या लेकरांना प्रेमाने जवळ घेणार... ते प्रेमळ दृश्य बघून माझं मन आनंदाने तृप्त होणार...
किती समाधान असेल आपल्या "एका सुंदर घरात..."

दमलेल्या तुला मी माझ्या हाताने बनवलेल्या जेवणाची चव पोटभरून खायला देणारं... तुझं रिकामं पोट भरलं, की मी न जेवता ही माझं पोट गच्च भरून जाणार... कारण माझ्या लेकरांचा बाबा दमलेला थकलेला असूनही घराच्या आत आला ही तो एक जबाबदार बाप असणार...
खरचं किती सुंदर आहे एका सुंदर घरातील माणसं, त्यांचा प्रेमाचा, मायेचा मेळा आणि ओलावा आहे तुझ्या माझ्या गोड संसाराला...
"तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं, तुझ्या माझ्या लेकरांना आई वडिलांच्या आशीर्वाद छत आणि मायेचं एक सुंदर घर हवं..."
असचं माणसांनी शोभलेलं...
प्रेमानी भिजलेलं... सुखानी सजलेलं... हास्याने बहरलेलं... नव चैतन्याने नटलेलं... ममतेनं दाटलेलं... आणि समाधानाने भरलेलं... तुझं माझं "एक सुंदर घरकुल"...

मी कधी ही तुझ्याकडे कसलीच तक्रार नाही करणार, ना तुला दुःख होईल असे वागणार... पण एका गोष्टीसाठी तुझ्यावर रुसणार, तुझा वेळ हवा म्हणून मी तुला हक्काने भांडणार...
मला नको कपडा दागिना, मला हवा सहवासाचा अलंकार...मला नको पैशाची हाव, प्रेमाची असेल मला नेहमीच आस... मला नको राजवाडा, एकच हवे प्रेमाचे घर... ना हवी दारासमोर गाडी, मीच रेखाटलेली हवी आहे मला घरासमोर सुखाची रांगोळी...
हे सगळं मी माझ्या माणसांसाठी
माझ्या भावनांनी चौहूबाजुंनी एकरूप होऊन सजवलेलं असेल आपल्या "एका सुंदर घरात..."

{POONAM}🖊️