...

11 views

इंग्रजीचा पेपर मला खूप कठीण जायचा....
(काल्पनिक नसून सत्यघटनेवर आधारित आहे😜.)

इंग्रजीचा पेपर मला खूप कठीण जायचा,
शोले मधला तो गब्बरच भासायचा,
जिकडे-तिकडे तोच दिसायचा,
उगाच नाही मला इंग्रजीचा फार राग यायचा,
मराठी हिंदी पेपरनंतर त्याचाच नंबर असायचा,
अभ्यासासाठी त्याच्या मग पहाटे तीनला उठायचो,
घोकंपट्टीला आपलंसं करून अभ्यास करायचो,
आवरून सावरून मग परीक्षेला निघायचो,
छातीची धडधड घेऊनच वर्गात शिरायचो,
इतर दोघे भाऊ त्याच वर्गात असायचे,
रोल नंबरच्या गणितामुळे दूरच बसायचे,
मागे कोण? पुढे कोण? चौकशी व्हायची,
अडल्या-नडल्याला या उपयोगी म्हणून विनवणी व्हायची,
सुपरवायझर मग वर्गात शिरायचे,
दुरून ते हिटलरच भासायचे,
एक-एक करून पेपर वाटायचे,
पहिल्या मुलाचा चेहराच; आपलं काही खरं नाही याची जाणीव करुन द्यायचा,
एकदाची तो पेपर हातात यायचा,
सोपा जाऊ दे म्हणून प्रार्थना व्हायच्या,
पांढऱ्या पेपर वर काळा रेघोट्या असायच्या,
त्याचा सुगंध मात्र अप्रतिम असायचा,
सुरुवातीला सूचनांचा रकाना असायचा,
नेहमीच्याच असतात म्हणून न वाचता पुढे जायचा,
पहिले दर्शन seen passage च व्हायचं,
कधीतरी वाचलयं हाच भास व्हायचा,
तेवढं तरी आठवतंय म्हणून मेंदूचा आभार प्रदर्शन व्हायचा,
He, She, It चा नुसता बोलबाला असायचा,
प्रश्न यांचे नि उत्तरे आपण का बरे शोधायची?,
हा विचार करून उगाच त्रागा व्हायचा,
Unseen Passage नकोसा वाटायचा,
Synonyms-Antonyms काय-काय असायचा,
Grammar विषयी काय बोलायचं, आजूबाजूच्याला येतोय का म्हणून खाणाखुणा व्हायच्या,
'तिथपर्यंत अजून नाही पोहोचलो' म्हणून ठरलेलं उत्तर यायचं,
शेवटी Not only...but also जुळवत पुढे निघून जायचं,
Poem चा आशय डोक्यात शिरायचा,
इंग्रजीत मांडताना मात्र फार घोळ व्हायचा,
Rhyming Pairs पटकन जुळवायचो,
2-4 marks सहज खिशात घालायचो,
मध्येच एक जण 'पुरवणी' म्हणून ओरडायचा,
माझी main sheet च संपेना यांना extra बरे लागायच्या,
Comprehension आल्यावर हायसं वाटायचं,
मनातला लेखक खुदकन हसायचा,
Essay Writing ला चार options असायचे,
पण पाठ केल्यापैकी कोणतेच नसायचे,
एक तृतीयांश सारांश कसाबसा उरकायचा,
Story Writing करताना Grammar चा insult करायचा,
एक-दोन करता-करता तीन तास संपायचे,
Writing Pad हातात घेऊन घरी पळत सुटायचे,
हा-हा म्हणता सगळे पेपर व्हायचे,
वीस-पंचवीस दिवस आरामात निघायचे,
आता मात्र वर्गातला माहौल बदलायचा,
एक-एक तपासलेला पेपर हाती यायचा,
बरे marks मिळाले म्हणून स्वर्गात गेल्यासारखे वाटायचे,
ह्या सगळ्या आनंदावर विरजण पडायचे,
इंग्रजीचे शिक्षक पेपर हाती द्यायचे,
एक भाऊ पहिल्या पाचात; दुसरा निदान पास तरी व्हायचा,
मी मात्र नापास होऊन ढसाढसा रडायचो,
तीस पैकी नऊ मिळाले म्हणून हिरमुसून बसायचो,
नापासच्या भितीमुळे घरी उशिरा जायचो,
पण ती खबर घरी आधीच गेलेली असायची,
"आमचं नाक कापलं" म्हणून आईचा ओरडा खायचा,
एका पेपरात 'ढगात' गेलो म्हणून धाकटा मिश्किल चीडवायचा,
सगळ्याचा राग मात्र जेवणावर काढायचा,
पुस्तक हातात घेऊन मुद्दाम उपाशी राहायचो,
एक गोष्ट मात्र कटाक्षाने पाळायचो,
पप्पा घरी येण्याआधी झोपून मी घ्यायचो,
सकाळी उठल्यावर पप्पा धारेवर धरायचे,
'अभ्यासच कठीण असतो' म्हणून आईने त्यांना समजवायचे,
उपाशी राहिल्याचा हाच फायदा व्हायचा,
इंग्रजीत नापास झालो तरी, आईच्या पेपरात पास व्हायचा,
सहामाही नऊमाही करत वार्षिक धडकायची,
आणि "एकमेका सहाय्य...." म्हणत पुढच्या वर्गात पोहोचायचे......


© Rahul R. Telavane