...

14 views

कस्तूरी मृग
एका हिरव्यागार रानात एक सुंदर हरिण राहत होते.त्याला कस्तूरी मृग असे म्हटले जात.असे म्हणतात की त्या हरणाच्या नाभीपाशी कस्तूरी म्हणून एक सुगंधी पदार्थ होता.
एक दिवस ते मृग शांत होते म्हणजे ते शिकारी व इतर प्राण्यांच्या बाबतीत निर्भय असते तेव्हा त्याचे लक्ष कस्तूरीच्या सुगंधाकडे जाते.त्याला हा सुगंध खूप आवडतो.तो या सुगंधाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतो.तो त्या सुगंधात इतका गुंग होतो की तो त्याच्या रानाच्या बाहेर चालला आहे हेसुद्धा त्याला कळत नाही.तो त्या सुगंधाला मिळवण्यासाठी धावत असतो.अगदी गवत खाणं आणि पाणी पिणंही विसरून जातो.तो सुगंधाच्या शोधात त्याच्या रानापासून खूप दूर एका वाळवंटात येऊन पोहोचतो.तो थकलेला असतो.पण वाळवंटात त्याला गवत आणि पाणी कुठून मिळणार.तो थकून हळूहळू चालत असतो.ऊन कडक असतं, वाळू तापलेली असते पण त्याला परत जाण्याची वाट मिळत नसते.तो थांबतो,अडखळतो आणि खाली पडतो.त्याला कस्तूरीचा सुगंध येत असतो पण आता तो सुगंधही त्याला भयानक वाटत असतो.डोळ्यासमोर अंधार येत असतो आणि काही तासांतच कस्तूरी मृग प्राण सोडतो.
कधीकधी वाटतं की माणूसही असाच एक कस्तूरी मृग आहे.त्याकडे सारं काही असताना तो सुखासाठी दारोदार भटकत असतो.तो कधी स्वत:बद्दल अध्यात्माचा आढावा घेत नाही.अध्यात्म म्हणजे कोणता देव-धर्म-श्रद्धा नव्हे तर अध्यात्म (अध्य+आत्म) म्हणजे
अध्य:- अध्ययन
आत्म:- स्वत:
म्हणजेच स्वत:चे परीक्षण.कारण जेव्हा माणूस स्वत:चे परीक्षण करू शकतो तेव्हाच तो इच्छा-आकांक्षांच्या मागे धावणे थांबवू शकतो आणि समाधानरुपी सुख व शांतता मिळवू शकतो.
- सुमेध गायकवाड
© All Rights Reserved