देहसक्ती : ज्ञानाचा अभाव
अलीकडे उत्तरप्रदेश येथील हाथरस येथील घटनेने पुन्हा एकदा समाजातील पुरूषी भोगवादी मानसिकतेने एका निष्पाप मुलीचा बळी जाताना सर्वांनी पाहिला. काहींनी चीड व्यक्त केली. काहींनी अगदी टोकाची मतंही मांडली. काहींनी मागे घडलेल्या घटनांचा उल्लेख करत समाजातील अशा गुन्हेगारांना मोकाट न सोडता त्यांच्यावर त्वरित कारवाई केली जावी, असे मत व्यक्त केले. मुळात आपल्यापर्यंत एखादीच घटना पोहोचते. ग्रामीण आणि शहरी भागात दररोज अशा कित्येक घटना घडत असतात. कित्येक मुली आपल्या इभ्रतीपोटी तसेच नराधमांच्या धमकावण्याने घाबरून कोणासमोर व्यक्तच होत नाहीत. म्हणूनच गुन्हेगारांना कोणती शिक्षा असावी ? त्यांना मोकाट सोडावं का ? यापेक्षा समाजात अशा घटना वारंवार का घडतात याचा विचार व्हायला हवा. भोगवादी मानसिकतेच्या कारणांचा शोध घ्यायला हवा. आपली वासना शमविण्यासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या विकृतीचा विचार व्हायला हवा. केवळ तरुणच नाही तर अगदी वयस्कर आणि अगदी काही महिन्या-वर्षाच्या मुली जेंव्हा पुरूषी वासनेला बळी पडतात तेंव्हा घटना कोठे घडली ? का घडली ? त्यात पुन्हा मिडिया आणि राजकारण आणून केवळ चीड आणि संताप निर्माण करण्यापेक्षा अशा घटना घडू नये म्हणून त्यामागच्या कारणांचा अभ्यास होणे गरजेचे आहे. अभ्यासाअंती आलेल्या निष्कर्षावर ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
अत्याचार पूर्वीही होत होते; परंतु अलीकडच्या काळातील वासानंधता, क्रूरपणे केली जाणारी देहाची विटंबना तळपायाची आग मस्तकाला नेणारी आहे. यामागचे एक कारण म्हणजे आपल्याकडे १९९० च्या आसपासच खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण यांमुळे समाजावर होणारे परिणाम ठळकपणे दिसून येऊ लागले. माणसांच्या जगण्याचे सूत्रच बदलले. पैसा जगण्याचा केंद्रबिंदू झाला. पैश्यासाठी मोठ्या...