...

44 views

हरवलेल्या वाटा...
आयुष्याच्या प्रवासात काही ना काहीतरी हरवत असतं. कधी सुख तर कुठे तरी दुःख आपल्या पासून दूर होतं असतं... सुख हरवलं तर आपल्याला अमाप दुःख होतं, आणि दुःख हरवलं तर आपल्याला आनंद होतो...
अगदी तसेच, आयुष्य जरी सगळ्यांचे सारखे असेल तरी आयुष्यातील घडामोडी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या, निराळ्या, असतात...
म्हणजे प्रत्येकाच्या वाटा, मार्ग, रस्ते भिन्नभिन्न असतात. कुणाच्या वाटेवर सुख उभे असते, तर कुठे सुखासाठी वाटा हरवलेल्या असतात...
कुणासाठी ऊनात वृक्ष सावली घेऊन उभा असतो, तर कुणासाठी त्याच वाटेवर झाडाची पानगळ झालेली असते... जसं देवानं आयुष्य सगळ्यांना हिऱ्यासारखं दिलं आहे, पण जो झिजेल तोच चमकेल. तसेच आयुष्याच्या वाटा वेगळ्या असल्या, वाटेवर काटे असेल तरी त्या काट्यांना चुकवत नाही, तर त्या काट्यांना बाजूला काढून फेकून देऊन आपल्याला आपल्या हरवलेल्या वाटा सुख दुःखाच्या साथीने हसत हसत, वेळ समयी रडत ही चालायच्या आहेत...

याच हरवलेल्या वाटेवर अनेक माणसं भेटतात... कोण काटे पेरणारे असतात, तर कोण आपल्या सारखे काटे बाजूला सरणारे ही असतात...
आपण माणसानं असं असावं...अर्थातच असावचं, जर आपण कोणाच्या आयुष्यात फुलं नाही पसरू शकलो, तरी निदान माणूस म्हणून आयुष्य जगताना माझ्या मार्गात योगायोगाने आलेल्या जीवन वाटेवर भेटलेल्या माणसांच्या आयुष्यातील माणुसकी म्हणून काटे तरी नक्कीच निस्वार्थीपणाने बाजूला सारण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा, फक्त आपल्या सारखाच माणूस आहे आणि आज नकळत तो संकटात सापडला आहे, जर त्याला आपली कृतीतून नाही कोणतीच मदत होऊ शकत, पण "दोन जगण्यासाठी सकारात्मक शब्द" तर देऊ शकतो ना आपण...

प्रत्येकालाच अडचण ही फक्त पैशाचीच असते असे नसते. कधी कधी अमाप पैसा असतो, पण मानसिक सुख नसते. आयुष्याने, वेळेने की नशिबाने साथ देणं सोडून दिलेली असते, याचे उत्तर शोधत शोधत आयुष्य संपण्याची वेळ नशिबाने येते. पण हारून कसे चालेल ! कोलमडून पडून कसे निभवेल ! खचून कसे उभारेल...!
विचार करण्यासारखी गोष्ट आहे, "हे जीवन पुन्हा नाही" मग एकदाच मिळालेल्या आयुष्यात हरवलेल्या वाटा आपल्या आपणच शोधायच्या... भेटले कोणी सत्याने चालणारे वाटसरू तर त्याच्या सोबत किंवा त्याच्या शिवाय ती वाट, ती हरवलेली वाट, ती स्वतःच्या जिद्दीने, बुद्धीने, हक्काची, कष्टाची, प्रगतीची, यशाची शोधलेली वाट आनंदाने चालायची.. पण हरायचे नाही.. माघार घ्यायची नाही.. आणि स्वतःशीच संवाद करायचा की मी सत्य आहे, व मी पळकुटे पणाची भूमिका या अनमोल आयुष्यात तरी कदापिही घेणार नाही...मग भले जीवनाची कितीही वाट अवघड, अडचणीची आणि हरवलेली असुदे...
""मी माझी हरवलेली वाट स्वतःच्या आत्मविश्वासाने शोधणार आणि जगणार या आयुष्याला.....""

{पौर्णिमा}