...

5 views

उल्का - आजचे संकट उद्याची संधी
    
  संकटावर खंबीरपणे मात केल्याने ,आजचे संकट उद्याच्या संधीमध्ये आपण प्रवर्तित करु शकतो ,ही सकारात्मकता आणि शुभता या लेखातून प्रक्षेपित (project) करण्याचा माझा उद्देश आहे .
   पलायन ,आत्मघात, समाजघात , एखाद्या समूहाप्रति दूषित दृष्टिकोन ठेवणे ,उन्माद, वैफल्य या अशुभाला स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी वाचकांस स्वयं प्रेरणा ,आत्म शक्ती मिळावी याचसाठी, हा लेखन प्रपंच, मी केवळ वाचकांच्या  समंजसपणावर भिस्त(विश्वास) ठेवून  मांडला आहे .

    अव्याहत सुरू असलेल्या सृष्टी चक्रातील एक नेहमीची रात्र. रडणारी लेकरे ,चिवचिवणारी पाखरे आणि समईच्या वाती सारेच दमून विझून गेले होते .एका  मोठया राज्यातील शेवटच्या ध्रुवावरचे छोटेसे गाव . त्या गावावर अचानक एका काळरात्री संकट ओढवले . भयानक कर्णकर्कश्य आवाज होऊन ,कंपनामुळे घरांची कौले फुटली ,मातीच्या भिंतींनाही तडे गेले . भयाने थरकाप उडाल्याने झोपलेले सारेच जीव जागे झाले, दुःखाने रडू विव्हळू लागले .बाहेर धुराचा नि राखेचा कल्लोळ ! पण आग कुठे दिसेना . दूरच्या रानात सूर्य उगवावा तसा प्रकाश दिसत होता .इंद्राचा वज्रप्रपात झाला जणू!! बोंब उठली . वैयक्तिक विवेक मागे पडून समूहमन कार्यरत झाले. गावकरी तसे विवेकी आणि पापभिरु.  "ठेविले अनंते तैसेचि" राहिले .  पोटापूरते धान्य ,अब्रू झाकायला वस्त्र .  सणावाराला त्यात फक्त , पानात गोडाची नि मनात हौसेची भर .
   नाही म्हणता गावात पाण्याची समस्या पुराणापेक्षा जुनी ! तशा चार -दोन विहिरी पिण्याची तहान भागवायच्या . बाकी पाण्याची गरज  बाया बापड्या जंगलाकडे कोसभर चालून, घड्यांची चळत डोईवर वाहून भागवायच्या. इतर कामना ,विकार ,व्याधींवर सहनशक्तीची मात्रा चपखल लागू पडायची . गावात पाणी नसले तरी माळरानापलीकडे विशाल जंगल होते . त्यातुन लाकडे ,मध, डिंक,रानभाज्या असे बरेच काही , बाया...