...

5 views

शाळा, शिक्षक आणि ऑनलाईन शिक्षण
कोरोनामुळे एकूणएक सर्व व्यवस्थेवर परिणाम झाला आहे. यामध्ये लहान मुले आणि त्यांचे शिक्षण हा अत्यंत संवेदनशील विषय बनला आहे. सुदैवाने आपल्याकडे कोरोनामुळे सर्व व्यवस्था ठप्प होताना शाळांना सुट्टी लागणारा काळ होता. परीक्षा झाल्या नसल्या तरी शिक्षण विभागाने व्यवस्थित मार्ग काढला. खूप काही अडचण आली नाही. आता मात्र नवीन शैक्षणिक वर्षातसुद्धा कोरोनाचे संकट काही कमी झालेले नाही. तेंव्हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून प्रत्येक शाळेने वेगवेगळे मार्ग निवडायला सुरूवात केली आहे. त्यातील एक मार्ग म्हणजे ऑनलाईन शिक्षण. परंतु मागील काही दिवसापासून वेगवेगळ्या बातम्यांमधून तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातून कोरोनापेक्षाही अधिक गंभीर चर्चा होत आहे ती ऑनलाईन शाळा, शिक्षक, आणि पुस्तक विक्रीसंदर्भात.
आपली मुलं ज्या शाळेत ज्ञान मिळवतात त्याच शाळांना आज काही अल्पसंतुष्ट लोकांनी आणि संघटनांनी जणू काही टार्गेटच करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या शाळा ऑनलाईन शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा शाळांच्या बाबतीत, हा केवळ फी उकळण्यासाठीचा मार्ग निवडला आहे अशी विधानं काहींच्या तोंडून बाहेर पडत आहेत. काहीजण ‘प्रत्यक्ष शाळा नाही तर फी नाही’ अशी विधाने करीत आहेत. अशी विधाने करणारे बहुसंख्य जणांचे पाल्य इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत आहेत. यापैकी बहुसंख्य लोकांनी लॉकडाऊनच्या काळात तीन महिने घरात बसून ऑनलाईन काम करून पगार मिळवलाच आहे. मग काय विनानुदानित आणि कायम विनानुदानित विविध माध्यमाच्या शाळेत शिकविणारे शिक्षक घरात बसून टाईमपास करत होते का ? नाही. तर शिक्षकांनी सुद्धा आपली कामे घरी बसून केली आहेत. इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासून स्वतः जोखीम पत्करून मॉडरेटरकडे जाऊन देऊन आले. मॉडरेटर मंडळींनी त्या तपासून बोर्डाकडे पाठविल्या म्हणूनच उशिरा का होईना पण मुलांना त्यांचा निकाल मिळणार आहे. काही शाळेतील शिक्षकांनी या काळात दररोज दोन ते तीन तास ऑनलाईन शाळेचे तास कसे घ्यायचे याचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्या प्रशिक्षणात शिकविलेल्या भागावर अभ्यास करून पुन्हा दोन ते तीन तासाचा वेळ ई-कंटेंट बनविण्यासाठी घालविला. हे सगळं कोणासाठी केलं त्यांनी ? स्वतःच्या पगारासाठी की उद्या परिस्थिती जरी बिकट झाली तरी मुलांना शिक्षणात अडचण येऊ नये म्हणून ? उत्तर एकच आहे. मुलांच्या शिक्षणात कोणतीही अडचण येऊ नये, शिक्षणात खंड पडू नये.
शाळेच्या वेळेत जेवढे काम शिक्षक करतात तितकेच काम घरी आल्यावर त्यांना करावे लागते. दिवाळीच्या सुट्टीमध्ये सहामाही परीक्षेचे पेपर तपासून निकालाचे काम असते. एप्रिल महिन्यात मुलांना सुट्टी मिळते तेंव्हा शिक्षक पेपर तपासून अंतिम निकालाची तयारी करतात. मे महिन्यात पुढील वर्षाचे नियोजन चालूच असते. विविध कार्यशाळा असतात. सांगायचा मुद्दा हा की शाळा चालू असतानाच शाळेचे कामकाज चालू असते असे नाही तर बारा महिने शाळेचे काम चालूच असते ते शाळेत शिकणाऱ्या मुलांसाठीच. जर प्रत्यक्ष शाळा नाही तर शाळेची फी नाही असाच सूर लावायचा असेल तर ऑफिसात जाऊन काम नाही तर पगार नाही असं म्हणणं योग्य ठरेल का ? आपल्या सर्वांच्या सद्सदविवेकबुद्धीला तरी ते पटेल का? विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा शाळेतच होतो. शाळेमुळेच त्यांच्यातील सुप्त गुणांचा विकास होतो. वाचन, लेखन, भाषण, संभाषण आदी कौशल्यांचा विकास शाळेतच होतो. शाळा हे केवळ वर्गात वेगवेगळे विषय शिकविण्याचे ठिकाण नाही. वर्गांमध्ये जितके मुलांच्या ज्ञानात भर पडते तितकेच किंबहुना त्याहून अधिक वर्गाबाहेरील अनेक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते. शैक्षणिक सहली, विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचे व्याख्यान, सोशल क्लब, शारीरिक शिक्षण, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन या सर्वातून विद्यार्थी घडत असतो. वरील सर्व उपक्रमात पालकांचा नेहमीच सहभाग असतो, पाठिंबा असतो तेंव्हा आता ओढावलेल्या या परिस्थितीत केवळ फीचा मुद्दा उपस्थित करून शाळा करत असलेल्या उपाययोजनांवर आक्षेप घेणे...