...

3 views

ए. आय. (आर्टीफिशियल इंटेलिजन्स)
बी इन्फोटेकमध्ये आजही परिस्थिती तिच होती. नवीन मागवलेले यंत्रमानव आजही उलट काम करत होते. कंपनीतील इंजिनियर्स नी खूप प्रयत्न केले. पुन्हा पुन्हा त्यांची सिस्टीम्स चेक केल्या परंतु कुठे अडचण आहे हे समजत नव्हते. बी इनफोटेक चे सी. ई. ओ. डॉ. देशमुख चिंतामग्न अवस्थेत आपल्या केबीनमध्ये बसले होते. त्यांनी बांधलेले सर्व आडाखे चुकीचे ठरले होते. डॉक्टर देशमुख यांच्या पूर्ण देशात बावीस कंपनीज होत्या. त्याही विविध क्षेत्रातील जसे की लोखंड, स्टील, कापड उत्पादन इ. डॉ. देशमुख यांना यांत्रिक गोष्टीवर जास्त विश्वास असल्याने त्यानी नुकतेच आपल्या एका फॅक्टरीसाठी वीस यंत्रमानव परदेशाहून मागवले होते. दहा यंत्रमानवांची चाचणी घेण्यात आली सुरवातीला ती चाचणी यशस्वी ठरली. मेमरी मध्ये फीड केलेल्या सुचना, कामाची पूर्ण आणि अचूक माहिती, मशिन्स ऑपरेट करण्याचे नियम. कोणत्यावेळी कोणते काम करायचे याचे वेळापत्रक, शिफ्ट्सच्या वेळा सारं काही त्या यंत्रमानवांमध्ये फीड केलं गेलं. फॅक्टरीमध्ये दोन चार ते पाच दिवस काम उत्तम चालू होतं. बी इन्फोटेकच्या या निर्णयामुळे त्यांच्या शेअर्सची व्हल्यूही वाढली. काही दिवसांनी पुन्हा जे बाकी दहा यंत्रमानवांमध्ये शेअर मार्केट आणि शेअर्सची सर्व माहिती फिड करण्यात आली. शेअर मार्केट मधील लहानातली लहान गोष्ट व त्याबद्दलची माहितीही यंत्रमानवांच्या मेमरी मध्ये फीड करण्यात आली. ते यंत्रमानव आधीच्या यंत्रमानवांसारखेच व्यवस्थित काम करत होते. कुठेही चूक न होता. एक महिना सारं काही व्यवस्थित चालू होतं.

अचानक असं काय झालं असावं ?? डॉ. देशमुख केबीनच्या खिडकी बाहेर पहात विचार करत होते. तोच केबीनला असलेल्या काचेच्या दारावर टकटक झाली.
"कम इन.." देशमुखांचे पी. ए. वागळे आत आले.
"सर, आता सारं काही व्यवस्थित आहे. आपण येऊन पहावे."
"वागळे, हे आधीही दोन तीन वेळा सांगितले आहे तुम्ही मला. अँण्ड यु नो व्हॉट हॅपन्ड."
"सर, रिक्वेस्ट आहे प्लीज."
"ओके." असं म्हणून डॉ. देशमुख, वागळेंसोबत केबीनमधून बाहेर आले. जवळच असलेल्या ऑडीटोरियमध्ये यंत्रमानवाची चाचणी होणार होती. स्टेजवर दहा यंत्रमानव एका रांगेत ठेवले होते. जे फॅक्टरीमध्ये काम करणार होते.
त्यांच्यासमोरच कापड, लोखंड, स्टील याप्रकारच्या जड वस्तू तर दोन तीन खाद्यपदार्थही होते. बी इन्फोटेक मधील सर्व पदाधिकारी पहिल्या रांगेत बसले खरे पण काही मिनिटांतच त्यांना काढता पाय घ्यावा लागला. कारण यंत्रमानव आता दिलेली ऑर्डर न पाळता समोर ठेवलेल्या वस्तू फेकून मारत होते. या दहा यंत्रमानवांसोबत असे घडल्याने बाकी दहा यंत्रमानवांची चाचणी घेण्याचा प्रश्नच उरला नाही. या सगळ्यामध्ये कंनीचं नुकसान होत होतं ते वेगळंच. आता तर शेअर्सची व्हॅल्यू ही कोसळत होती. डॉ. देशमुखांना संशय याऊ लागला की रोबोट्सचे असे वर्तन म्हणजे. त्यांना दुसरं कोणी कमांड देत नसेल ना?? म्हणजे आपण देतो त्या उलट?? एखादा हॅकर. ज्याने यंत्रमानवांची सिस्टीम हॅक केली असेल. याचा संबंध फॅक्टरीत झालेल्या 'कट ऑफ' शी नसेल ना?? विचार करत करत डॉ देशमुखांनी कमिशनरना कॉल केला आणि सर्व परिस्थिती सांगितली. कमिशनरनी आपले ऑफिसर आणि दोन सायबर हॅकर बी इन्फोटेक मध्ये पाठवले. सूत्र हलली. ज्या कामगारांना फॅक्टरीमधून काढून टाकण्यात आलं होतं त्यांची लिस्ट बनवली गेली. गुप्तपद्धतीने त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची माहिती काढली गेली. शोध घेता घेता पोलीसांना दोन गुन्हेगार सापडले. एकाच वेळी दोघांना अटक करण्यात आली. विवेक आणि अजित त्यांची नावं. कम्प्युटर इंजिनियरींग करत होते दोघं.

कोर्टरूममध्ये आरोपीच्या जागेवर त्यांना उभे करण्यात आले. सरकारी वकीलाने पूर्ण केस कोर्टरूममध्ये कथन केली. त्याचप्रमाणे विवेक आणि अजित हे दोघे कसे गुन्हेगार आहेत हे ही पटवून देण्यात आलं. शिक्षा सुनावण्याआधी जजसाहेबांनी दोघानाही विचारले,
"विवेक अँण्ड अजित यु बोथ आर गिल्टी ऑर नॉट गिल्टी??" जजसाहेबांच्या या प्रश्नावर विवेकने कोर्टरूममध्ये बसलेल्या सर्वांवर नजर फिरवली आणि एका व्यक्तीवर नजर स्थिर करत म्हणाला,
"नो. वी आर नॉट गिल्टी." असं म्हणताच कोर्टरूममध्ये कुजबुज वाढली.
"ऑर्डर ऑर्डर."
"तुम्ही गुन्हेगार आहात हे तुम्हाला मान्य आहे का??" जज साहेबांनी पुन्हा विचारले. यावर अजित म्हणाला,
"हो. आम्ही गुन्हेगार आहोत पण गुन्हा का केला याचं कारण नाही विचारलंत. याला कारण तो माणुस जो साळसूदपणाचा आव आणून बसला आहे. बी इन्फोटेक चा सी. ई. ओ. याच्यामुळे फॅक्टरीतील शंभर कामगार बेरोजगार झाले. यात माझे आणि विवेकचे बाबा ही होते. मन लावून काम करणारे कामगार या माणसामुळे देशोधडीला लागले. कारण याने यंत्रमानव मागवले होते परदेशाहून आणि ते येताच तडकाफडकी कामगारांना काढून टाकलं. देशमुख साहेब, याचं तुम्हाला काही वाटलं नाही. मऊ गाद्या गिरद्यांवर झोपणारे तुम्हाला कामगारांचं दुःख कसं समजणार होतं??"
"एक महिन्याचा पगार देईन या आशेवर सर्व कामगारांना ठेवलं या माणसाने. जेव्हा सर्व कामगार पगार घेण्यासाठी गेले तेव्हा सिक्युरीटी बोलावून हाकलून लावलं. बाकीच्या फॅक्टरीत नोकरी मिळाली पण तिथे कमी पगार आहे. किती संसार उद्ध्वस्त झाले. आम्हालाही मदत करायची होती बाबांना. नोकरीच्या शोधात बाहेर पडलो. कुठेही नोकरी भेटली नाही कारण शिक्षण अर्धवट त्यात इंजिनियर. आम्ही दोघांनी हमाली करून पैसे मिळवले आहेत. जेव्हा आम्ही हमाली करत होतो तेव्हा हा माणूस पैसे कमवत होता. ते पण खोऱ्याने. कामगारांच्या पोटावर पाय देऊन." अजित बोलत होता. त्याचं बोलणं ऐकून पूर्ण कोर्टरूम शांत झालं होतं.
"तुम्ही पोलिसमध्ये तक्रार का नाही केलीत." सरकारी वकील म्हणाले.
"तुम्ही वकील असून तुम्हाला काहीच माहित नाही याचं नवल वाटतं वकील साहेब. कायद्यामध्येही भेदभाव. या केसचा निकाल का लवकर लागत आहे माहित आहे?? कारण ही एक हाय प्रोफाईल केस आहे म्हणून. तीच केस जर आम्ही फाईल केली असती तर. कट ऑफ करून फक्त याच फॅक्टरीतून नाही तर इतर फॅक्टरीमध्येही हे हेच करणार आहेत ते अँण्ड दिस इज द ॲक्च्युअल डार्क साईड ऑफ आर्टीफिशयल इंटेलिजन्स. कृत्रिम बुद्धीमत्तेची ही खुप वाईट आणि काळी बाजू. हे रोबोटस् तर फक्त एक उदाहरण आहेत. अजून किती नोकरींवर गदा येणार हे भविष्यच सांगेल." विवेक म्हणाला.

"तुम्ही हे सगळं कसं जमवून आणलंत??" सरकारी वकीलांनी विचारलं.
"आम्ही गरीब असलो तरी आमचे काही मित्र गडगंज श्रीमंत आहेत त्यांनी आम्हाला मदतही केली आहे. दोन लॅपटॉप विकत घेण्यासाठी त्यांनीच आम्हाला मदत केली पण आम्ही त्यांचं नाव सांगणार नाही आणि जज साहेब आम्ही गुन्हा केला पण तो कामागारांना न्याय मिळावा त्यांना पुन्हा नोकरी मिळावी यासाठी. तुम्ही दिलेली कोणतीही शिक्षा भोगण्यास आम्ही तयार आहोत." अजित म्हणाला.
जजसाहेब काही म्हणणार इतक्यात देशमुख उभे राहिले आणि म्हणाले, "जजसाहेब मला काही सांगायचं आहे."
"आपण या जागेवर येऊन सांगावे."
डॉ. देशमुख, विवेक आणि अजित च्या समोर उभे राहिले आणि म्हणाले, "जजसाहेब, मला हे सांगायचे आहे की, ज्या कामगारांना मी फॅक्टरीमधून काढून टाकले होते त्यांनी उद्यापासून पुन्हा फॅक्टरीमध्ये येण्यास पूर्वीप्रमाणेच सुरूवात करावी. अजित आणि विवेकलाही माझे धन्यवाद.
त्यांनी स्वतःचे नुकसान करून फक्त कामागारांच्या भल्यासाठी शिक्षा स्विकारली आणि सर्व कामगारबंधूनी मला क्षमा करावी ही विनंती."

अजित आणि विवेकला शिक्षा सुनावली गेली. दुसऱ्याच दिवसापासून सर्व कामगार फॅक्टरीमध्ये येण्यास पूर्वीप्रमाणेच सुरूवात झाली. याला एक महिना उलटला. बी इन्फोटेक कंपनीची शेअर्स व्हल्यू पुन्हा उभारी घेऊ लागले.

〽️〽️ 🤖🤖

कट ऑफ म्हणजे एकत्र शंभर, हजार या संख्येने कमी करणे.
Artificial Intelligence (A. I.) म्हणजेच कृत्रिम बुद्धीमत्ता. यंत्रमानव किंवा विविध यंत्रप्रणालीमध्ये वापरली जाते. नजिकच्या काळातील याचं उदाहरण म्हणजे "सोफिया" जी रोबोट आहे.
Artificial Intelligence (A. I.) यावर आंतरजालावर भरपूर माहिती आहे. ती वाचून ही कथा लिहण्याचा प्रयत्न केला आहे..

कथा आणि कथेतील पात्रांची तसेच कंपनीचे नावही काल्पनिक.

© शुभांगी_दिक्षीत
हक्क राखीव