...

4 views

चंद्रिका: body shame, missing tile syndrome यावर भाष्य
प्रस्तुत स्तंभ लेखनात मी body shame म्हणजे, शारीरिक त्रुटींबाबत व्यंगभाव बाळगणे, आणि missing tile syndrome यावर भाष्य करणार आहे. अवजड वैज्ञानिक संकल्पनेचे मी माझ्या मती, अनुभूती नुसार विवेचन करीत आहे. प्रारंभीची बोध कथा मनोरंजन हेतू साध्य करो.

सुसंपन्न राज्यात ,सुसंस्कारी राजा राणीला , कन्यारत्न प्राप्त होते. म्हणून जन्मसाफल्य झाल्याचा आनंद दोघांना होतो . चंद्रासमान सुंदर असणाऱ्या, राजकन्येच्या चेहऱ्यावर मोठा काळा तीळ असल्याने , तिचे नाव चंद्रिका ठेवले जाते. सुविद्य माता पिता तिला राजनीती , वेद यासोबत युद्ध ,संगीत आदी कलांचे यथोचित ज्ञान देऊन निपुण बनवतात. कन्या उपवर झाल्यावर , माता पित्याला तिच्या विवाहाची चिंता लागते . कारण त्या एका डागासोबत अनेक अंधश्रद्दधांचा डाग तिला लावून अशुभ ठरविलेले असते. माता पित्यांची चिंता ओळखून ,चंद्रिका त्यांची समजूत घालते. तिच्या गालावरील काळ्या डागाला महत्त्व न देता जो तिचा स्वीकार करेल, अशा निष्कलंक व्यक्तीचा मी स्वतः च शोध घेऊन वरण करेन, असे आश्वस्त करते. तिचा आत्मविश्वास आणि स्वाभिमान पाहून हताश राजा राणीलाही हुरूप येतो . सुविद्य राणीवर राज्य कारभार सोपवून कन्यावत्सल राजा, चंद्रिका व एक अंगरक्षकांची तुकडी घेऊन वेष पालटून निघतो. माता निघताना तिला धनाढ्य किंवा वीर युवकाचे पती म्हणून चयन करण्यास सांगते.

नदी पलीकडील एक राज्याच्या सीमेवर दोन राज्याच्या सैन्यामध्ये तुंबळ युद्ध सुरू असल्याचे ते पांथस्थ पाहतात . शत्रूपक्ष वरचढ होऊन एका राज्यात घुसून कत्तल करणार असे दिसताच , युध्दकुशल चंद्रिका शिरस्त्राण घालून ,घोड्यावर बसून आपल्या सैन्य तुकडीसह त्यांच्यावर तुटून पडते. युद्धनिपुण वीरांगना शत्रू सैन्याचा पाडाव करते . शत्रू राजा विरगतीस प्राप्त होतो . विजयी राजासमोर युद्ध कैदी प्रस्तुत केले जातात . युद्धकैदी आपला राजा मरण पावल्याने त्याचे मांडलिकत्व स्वीकारून प्राणदान मागतात. तरीही तो जेता आपले फर्मान रद्द न करता अडीग आहे असे पाहून ,रण आवेश शमलेली धीरोदात्त चंद्रिका त्यास सैनिकांस क्षमा करण्याचे आर्जव करते . तिच्या विरात्त्वाने प्रभावित झालेला तो विजेता भूपती(राजा) , तिच्या समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवून तिचे प्रियराधन करतो ." हे विरबाला आपल्या शौर्याने मी भारावून गेलो आहे .संकटसमयीं माझे राज्यरक्षण व हितासाठी सज्ज झालेल्या, हे सुमुखी आपला मुख चंद्रमा पाहण्यास मी अधीर आहे. सुंदर मनाच्या हे सुकांता , माझ्या विवाहाचा प्रस्ताव स्वीकार कर" यावर चंद्रिका आपले शिरस्त्राण काढून केश संभार बाजूला घेते . तिच्या चेहऱ्यावरील काळा डाग पाहून निराशेने चेहरा काळवंडलेल्या राजपुत्रास चंद्रिका स्वतः च म्हणते ,आपण काही निर्णय घेण्याआधी मी आपले पती म्हणून वरण करण्याची मनीषा बाळगत नाही .कारण शरणागताची हत्या करण्याची आज्ञा आपण दिलीत . क्षमा हे वीराचे भूषण आहे . दयेच्या अभावी विरत्त्व हे क्रौर्य ठरते . निर्णय देऊन ती निघून जाते. तिच्या वक्तव्याने आणि निर्णयाने लज्जित ,चेहरा म्लान पडलेला राजपुत्र तिला मूक राहून जाताना पाहत राहतो .

पुढे जंगलातून जाताना , एकसद्गुणी...