...

2 views

तंत्रज्ञान युगातील मुलांचे भावविश्व
    संध्याकाळची वेळ ऑफिसमधून दमलेला मध्यम वर्गीय पती घरी येतो.  एवढ्यात उपनगर ते शहर  असा प्रवास करून थकलेली आणि ऑफिसच्या कामाने वाकलेली त्यांची पत्नी सुध्दा घरी येते . काही वेळाने भाऊ पण घरी येतो. भावाची गृहिणी असणारी पत्नी सुद्धा घरकामाने त्रस्त आहे . घरट्यात पाखरे परतली म्हणून , आजी आजोबा देखील भरल्या घरात लहानग्या नातवंडांना ठेवून बाहेर पाय मोकळे करण्यासाठी निघतात.   अभ्यास की खेळ या संभ्रमात असणारी दोन छोटी पिल्ले आई बाबांकडे धाव घेतात .सारे उद्विग्न आहेत म्हणून पिल्ले चिवचिव करून शांत होतात.  13/14 वर्षांची नात आधीच बाहेर गेलेली आहे .  तिची विचारपूस करून बाबा आणखी चिडतात .नोकरी करणारी पत्नी आल्यावर लगेच स्वयंपाक, घरकाम वगैरेत गृहिणीला मदत करण्यासाठी जाते. दोघे भाऊ आपल्या रूममध्ये निघून जातात . एक भाऊ ऑफिसचे काम काढून बसतो,  तर दुसरा मोबाइल वर share मार्केट वगैरे ची चौकशी करत बसतो. घरातील दैनंदिन काम संपवून ,दोघीजणी जेव्हा आपापल्या रूममध्ये जातात तेव्हा पसारा काढून बसलेल्या त्यांना पाहून दोघींचा पारा चढतो . गृहिणी तिच्या पतीला सांगते की,  ऑफिस चे काम घरी करू नका, घराकडे लक्ष द्या .तर तू दिवसभर घरीच असतेस  तू लक्ष दे,  असे तो तिला सूनवतो. गृहिणी दिवसभर घर एकटीने सांभाळताना कशी तारांबळ उडते  ,सकाळी अचानक आलेले पाहुणे, स्वयंपाक ,सासू सासऱ्यांची देखभाल , शेजारच्या काकूंच्या सुनेला 7व्या महिन्यामध्येच इस्पितळात न्यावं लागले ,आपण कसा शेजारधर्म पाळला याचा पाढा वाचते .
   इकडे नोकरी करणारी पत्नी आपल्या पतीला जेव्हा मोबाईल वर गप्पा मारताना पाहते , तेव्हा मी पण नोकरी करते, घर चालवते वगैरे बोलून दाखवते. यावर कंपनीत टार्गेट अचिव्ह करू न शकल्याने  नोटीस मिळाल्याने तणावात असणारा तो आणखी भडकतो .ऑफिस, घरकाम ,प्रवास ,गाडीखर्च ,घराचे लोन ,नातेवाईक, गाडीचे हफ्ते ,महागाई यावरून दोघांच्याही रुममधून भांडणाचे समान स्वर येऊ लागतात . भल्या पहाटे उठून मेहेनतीने बनवलेला डबा नवऱ्याने तसाच परत आणला,  म्हणून 'ती' चिडते तर outdoor कामामुळे उपाशी राहावे लागले म्हणून 'तो' चिडतो. परफॉर्मन्स चांगला असूनही प्रमोशन नाकारले , म्हणून 'तो' दुःखी असतो तर दूरच्या प्रवासाला 'ती'  कंटाळलेली असते .
    आरोप प्रत्यारोप करणारे ते...