...

7 views

आयुष्याच्या सायंकाळी
आयुष्याच्या सायंकाळी

आयुष्याच्या सांयकाळी
रंग नभीचे माखून घेतो
स्व अस्ताला रंगीत करणे
सुर्याकडूनी शिकून घेतो . . . .!

सुख दुःखाच्या झेलत लाटा
तनामनाने भिजून घेतो
ओसरणे ... भरतीला येणे
लहरींकडूनी शिकून घेतो....!

कधी होता आघात मनावर
अश्रू ढाळणे सोडून देतो
पाण्याचेही मोती करणे
तुषार पाहून शिकून घेतो...!

मी , मीच ,माझे , मलाच सारे ...
भाव संकुचित टाकून देतो
बांधून किल्ला सोडून जाणे
बाल क्रीडेतून शिकून घेतो....!

सागरतीरी वाळूवरती
जरा पाऊले ठसवून बघतो
सत्य अखेरचे या दुनियेचे
वाळूकडूनी शिकून घेतो....!

हासत हासत निरोप घेणे
क्षण भाग्याचे सांधत जातो
सांज सावली आयुष्याची
रवी बिंबाला आंदण देतो...!

रात्र अंधारी होता होता
अलवार पापण्या झाकून घेतो
त्या लहरींचा नाद अनाहत
मन गाभारी भरून घेतो . . . !

#शिव पंडित
© All Rights Reserved