...

14 views

वसंत...!

वेगळीच रूपे ह्या वसंताची
उभारून येती क्षणोक्षणी,
ऋतुचक्राच्या ह्या कालचक्रात
भावूनी जातो तु मनोमनी....

पालवी फुटुनी त्या फांदीला
जणु नवनिर्माणाचेच रूप हे येते,
नवचैतन्याच्या ह्या प्रहरात
सारे काही पवित्र होते....

चैत्राची प्रसन्नता
पाडव्याचे मांगल्य,
रामाचे नवरात्र तर
अक्षय तृतीया ह्या सणांचे प्राबल्य...

वाऱ्याची मंद लाट, स्पर्श करते जेव्हा,
मोहीत करूनी जणु, मिठीच गवसते आम्हा...

लपंडाव तो ऊन सावलीचा,
हर्ष आणतो मनी...
प्रेमीयुगलाच्या भांडणासारखा,
जातो-येतो तु क्षणो-क्षणी...

अफाट खेळ तुझे, रंग अनेक हे
असे चित्र तुझे मनमोहक आहे...
विशाल उपमाही कमी पडेल वर्णायला तुला,
कविता तर फक्त एका प्रश्नाचे कोडे आहे....!

श्रीराम अरूण कुलकर्णी