...

4 views

e Love
e love
पूर्वीच्या हळव्या प्रेमाच्या भावना हातात हात गुंफणे , गालावरचं स्मित,लाजून पायाने माती उकरणे आता कधीच मातीआड झालंय. आता चॅटिंग ,डेटिंग ,”मिटिंग” आणि finally break up ,who cares!!! प्रेमाच्या आणाभाका out dated झाल्यात. मॅरेज मटेरियल प्रेमवीरांना वाईट दिवस आलेत. होकाराची वाट पाहणे, झुरणे, विरह नावाच्या waiting साठी वेळ नसतो. कुणाशीही मनसोक्त गप्पा मारणे म्हणजे ‘’ तसलं काहीतरी असलं पाहिजे ‘’ ,(इथे हसणे, खिदळणे याला न मागता ‘प्रसिद्धी ‘प्राप्त होते.) या शंका कुशंकांमध्ये हिंदकळणऱ्या e love ने मैत्रीला टॅग केलंय. एखादया नखरेल नटविनं साध्य सुध्या गृहिणीला सौंदर्य स्पर्धेत हरवावं तसं. या e love ने चितपट केलंय मैत्रीला. एकमेकांचे चेहरे ही धड न पाहिलेल्या facebook वरच्या बघ्यांच्या गर्दीला नाव मित्रता यादी/ friends list. चॅटिंग ,डेटिंग वगैरे वगैरे…म्हणजे सर्वकाही just friends!!!
आजकाल पार्क,बीच ,मूवी ,कॉफी जुनं झालं. कोरोनाने तर सारं इतिहासजमा केलं. बागेतला बाक ,गच्चीतली खुर्ची, दोस्तांचा कट्टा electronic झाला ,आणि तेथेच या e love ने मैत्रीला खिंडीत गाठले आणि फसवले. मैत्रीचा मुखवटा घालून दशावतारी सोंग निघाली. कधी मित्रांची नावं घेऊन बनावट संदेश ,पैशांची,मदतीची याचना ,बदनाम मात्र मैत्री.
हे e love मधून आलेले संशयाचे virus मेंदू पोखरून संसारात घुसले. मित्र /मैत्रिणींशी मारलेल्या निगुतीच्या गप्पा, सुंदर चित्र ;चरित्र बिघडवू लागली. परिचितांच्या गोतावळ्यात मैत्रीचा कोपरा म्हणजे विरंगुळा, हौशीचा क्षण नसून “ भलतंच काहीतरी” ठरू लागले. अधिकार, ममत्व, रुसवा, समानता या सर्वांचा परिपाक म्हणजे मैत्री. पण आता ती ‘प्रेमाच्या आधीची पायरी’ इतकीच महत्वाची. मैत्रीच्या वेष्टनात ‘इश्कवाला लव’ लपवायला शिकवून मैत्रीच्या घरांदाजपणाला सिनेमावाल्यांनी देखील चूड लावली आहे. मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे असं नवं नातंही त्यांनीच निर्माण केलं. अगदी दोन देशांच्या सीमारेषेएवढाच तो प्रश्न ही शेवटपर्यंत ज्वलंत ठेवता येतो म्हणून असेल.
अनेक वर्षांच्या serious relatiinship च्या फुग्याला मैत्रीची टाचणी टोचून हवा काढून टाकण्याचा सराईतपण आल्यावर प्रोफेशनमध्ये मुरल्यासारखं वाटत असावे.पण म्हणूनच खऱ्या मैत्रीची बारशाच्या वेळीच वधु परीक्षा सुरू होते.संशयाच्या उन्हात करपून जाते, मनातल्या रानात एकटी पडते.
खरी मैत्री असते ,अंगणातल्या फुलझाडासारखी .तुमच्या संसारात न येता ,सावली धरते,वाटेवर फुलांचा सडा टाकते. म्ह्णूनच, ,मैत्रीला बहरूदे मैत्रीच्या जागी. मनाच्या एका कोपऱ्यात अबाधित राहूदे तिचं स्वातंत्र्य आणि पावित्र्य, अगदी तुळशी वृंदावनासारखं!!!
(माझ्या प्रिय रुसलेल्या मैत्रिणी साठी)
#पूर्णा गंधर्व
© purna gandharv