...

5 views

मायलेकी, गुंड, पोलिस आणि मी
परोपकार हा स्थायीभाव असल्याने अडलेल्या नडलेल्या गोरगरिबांना मी मदत करीत असतो. त्यामुळेच माझ्याभोवती नेहमीच गोरगरीब गरजुंची गर्दी असते. माझ्या सडेतोड आणि निर्भीड बातम्यामुळे एक पत्रकार म्हणून माझा आदरयुक्त दबदबा निर्माण झाला होता. त्यातच आमच्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून जेष्ठ बंधूनी उभे केलेले सेवाभावी काम पाहण्यासाठी मी पोलीस आणि महसूल विभागातील अतिवरीष्ठ अधिकाऱ्यांना आवर्जून निमंत्रित करीत असे.  त्यामुळे सारेच राजकारणी आणि प्रशासन मला दबकून असायचे. माझ्या एका फोनची दखल घेऊन कोणाला वेळेत रेशनिंग, कोणाला एसटीच अर्ध तिकीट मिळून जायचे. त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे हसू मला आत्मिक समाधान देउन जात असे.

     सन २००५ ची ही घटना आहे. अशीच एक महीला तिच्या सोळा वर्षांच्या मुलीसह माझ्या ऑफिसमध्ये आली होती. बोला मावशी काय काम आहे, मी विचारणा केली.  त्या म्हणाल्या, तुमच्या एकट्याबरोबर बोलायचे आहे. त्यामुळे दोघी मायलेकीला घेउन मी माझ्या  ॲंटीचेंबरला गेलो. आम्हाला कुणाचाच आधार नाय ..कोणीच आमची दखल घेइना.. पोलीस म्हणत्यात इकडे फिरकायचे नाय... तर ते दोन गुंड म्हणत्यात, कुठ तक्रार केली तर जीवंत ठेवणार नाय.. जगण मुस्कील झालय.. आम्ही काय करायचं? असं म्हणत त्या मावशी ढसढसा रडायलाच लागल्या.. अजिबात घाबरु नका मी आहे.. असा धीर देत मी त्यांना शांत केले. त्या मायलेकीच्या मनात माझ्या बद्दल एक आश्वासक भाव निर्माण झाला असावा. त्यामुळेच आईच्या सांगण्यावरुन सोळा वर्षाच्या लेकीने कसलाही संकोच न बाळगता  ब्लाउज काढून मला छाती दाखविली.  तीच्या दोन्ही छातीचे दाताने लचके तोडलेले होते. ते पाहून मला प्रचंड चीड निर्माण झाली. ही माझीच मुलगी आहे असे समजून प्रकरण धसास लावायचेच असा मी निर्धार केला.    

      माउलेकीकडून घडलेली सारी हकीकत जाणून घेतल्यानंतर माझा संताप अनावरण झाला होता. पवारांच्या बारामतीत हे अस कस घडतेय? याची एक बातमी केली असती तर मोठा गदारोळ माजला असता. बातमीमुळे माझ नावही झाले असत. परंतु बातमीने मायलेकीच्या पदरी काहीही पडल नसते.  विषय नाजुक होता.. त्या सोळा वर्षांच्या मुलीच्या अब्रूचाही  प्रश्न होता.. ! बीड जिल्ह्यातून आलेल्या या विधवा महिलेस बारामती एमाआयडीसीतील टेक्सटाइल कंपनीत काम मिळाले होते. त्यामुळे मायलेकी बारामतीत स्थायिक झाल्या होत्या. ज्यांच्या घरात भाडेकरु म्हणून रहात होत्या, ते दोघे घरमालक गुंड प्रवृत्तीचे होते. हे त्यांना नंतर कळले.. आईच्या असाह्यतेचा त्यांनी गैरफायदा घेतला होता. आता आईबरोबर त्यांना मुलीलाही वापरायचे होते.. परंतु मुलगी काही बधत नव्हती. त्यामुळे त्यातील एकाने तिच्यावर बळजबरी केली होती.  विरोध केल्याने तिच्या छातीचे लचके तोडले होते..!

     मायलेकी पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन गेल्या होत्या. पोलीसांनी दोन्ही गुंडाना आणून बदडून सोडून दिले होते. आणि या मायलेकीला त्यांचे घर सोडून निघून जाण्याचा सल्ला दिला होता.... त्या दोघींना ऑफिसमध्येच थांबविले.. आणि मी थेट पोलीस ठाणे गाठले. पोलीस ठाण्याचे इनचार्ज नवीनच आले होते. ते कोणालाच किमंत देत नव्हते. त्यांनी या मायलेकीची केस रेकॉर्डवरच घेतली नव्हती. याबद्दल मी विचारणा करताच ते वैतागाच्या सुरात बोलत होते. मी बाहेर आलो.  साहेबांनी गुडांकडुन पंचवीस हजार घेउन त्यांना सोडून दिले आहे. ही गोपनीय माहिती कानावर आली होती.  एखाद्या मुलीच्या छातीचे लचके तोडले जातात. आणि त्यात हा लाच खातो ?  हा कसला पोलिस अधिकारी. याच्याकडे बघायचे अस मी ठरविले. दोघी मायलेकीला घेऊन मी माझ्या घरी आलो. आणि त्यांना आमच्या आश्रमशाळेत मुक्कामी ठेवले. पोलिस अधिकाऱ्याला याचा सुगावा लागला होता. हे प्रकरण अंगलट येणार हे त्याच्या लक्षात आले होते. त्यामुळे तोही मायलेकीचा शोध घेतोय हे दुसऱ्या दिवशी माझ्या कानावर आले. मायलेकीला धमाकावून किंवा मॅनेज करून आमची काही तक्रार नाही असे तो लिहून घेउ शकतो. याची मला जाणीव झाली होती. त्यामुळे प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत आश्रमशाळा सोडायची नाही. हे मी दोघीना बजावून ठेवले होते. भरभक्कम आधार मिळाल्याने त्यांची मायलेकीचीही भीती दुर झाली होती. 

     दुसऱ्या दिवशीं पोलीस ठाण्यातून फोन आला. साहेबांनी चहा घ्यायाला बोलावले आहे. मी आणि माझे दोन सहकारी पत्रकार पोलीस ठाण्यात गेलो.  चहापान आणि इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. मी विषयाला हात घातला. केस रेकॉर्डवर का घेतली नाही ?  जाऊ द्या सावंत सरकार, फार मनावर घेऊ नका... ती बाय काय शहाणी हाय का ? घर मालकाबरोबर लफड आहे तिच?  ते ठिक आहे साहेब.  पण त्या मुलीची छाती तोडली आहे.  मी पाहीले आहे..! आता आईच असली असल्यावर मुलीला कोण सोडणार ? साहेबाच्या या उत्तराने माझा संताप अनावर झाला होता.  ती तुमची मुलगी असती तर ? माझ्या या प्रश्नाने साहेब भडकला.  आमची जोरदार वादावादी झाली.  बाकीचे दोन पत्रकार घाबरले होते. पोलीस काहीही करु शकतात हे मलाही ज्ञात होतेच.  परंतु आता हात घातलाच आहे,  तर मागे हटायचे नाही.. असे ठरवून मी ही आक्रमक झालो होतो.  असह्य मुलीची कोणतरी छाती तोडतेय आणि त्याच्यात पंचवीस हजाराची लाच खाताय काय? " कोणी घेतली.. काहिही आरोप करु नका"....  असा म्हणणारा साहेब आता गडबडला होता. मी पोलीस ठाण्याच्या बाहेर पडलो.  दिवसभर मला चैन पडली नव्हती. याच्याकडे बघायचेच असा ठाम निर्धार मी केला होता. 

     रात्रीच्या साडेनऊ वाजल्या होत्या. मी थेट सायबाला फोन लावला. बोला सावंतसाहेब.. !  साहेब नरमल्यागत वाटत होता. परंतु मला मात्र राग अनावर झाला होता. तुझ्या मुलीची छाती तोडल्यावर तुला कस वाटेल? मला भानच उरले नव्हते.  मी थेट एकरीवरच घेतल....  कर माझा फोन रेकॉर्ड .. पंचवीस हजाराची लाच खातोस काय रे ? मला माहीत आहे,  तू काहीही करु शकतोस. मी माझ्या घरीच थांबलोय. ये तुझ्यात दम असेल तर... ! अजितदादा आणि पवारसाहेबांशी थेट बोलणार आहे.. लाच खातोस काय ? मी काय बोलून गेलो ते मलाच कळत नव्हते. माझ्या रागाचा निचरा झाला होता... मी ही तसा घाबरलोच होतो .. परंतु साहेब मात्र चांगलाच भेदरल्याचे मला जाणवले होते. मी माझा मोबाईल बंद करून झोपण्याचा प्रयत्न करीत होतो.  परंतु मला झोप येत नव्हती.  रात्री साडेबाराला बंगल्याची बेल वाजली. माझ्या एका जीवलग मित्राला घेऊन साहेब आले होते. दरवाजा उघडताच साहेबांनी माझे पायच धरले...  सोडेनातच..  चुकल ..म्हणत माफी मागत होते...त्यांना घेउन मी आश्रयशाळेत गेलो.  मायलेकीला उठवले. साहेबांनी त्यांचीही माफी मागितली..! उद्या मायलेकीला घेऊन पोलीस ठाण्यात या. त्या दोघांना पोलिस ठाण्यात आणू बसवले आहे, असे सांगून आमचा निरोप घेऊन साहेब परतले होते.

    दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात मायलेकी आणि माझ्यासमोर चार पाच पोलीस गुंडाना टायरमध्ये घालून झोडपत होते. मायलेकीच्या हातातही पोलिसांनी त्यांचा पट्टा दिला होता...दोघींनीही त्यांचा संताप बाहेर काढला होता. तोंड सुजलेले गुंड माझ्याकडे दया याचना करीत होते. केस रेकॉर्डवर घेण्याची तयारी सुरु होणार होती. परंतु केस करून काहीही उपयोग होणार नव्हता.. मायलेकीला येथे रहाणे आता शक्य नव्हते. आणि भविष्यातील कॉर्टकचेऱ्या त्यांना परवडणाऱ्या नव्हत्या.  मी, साहेब, दोन चार वकील मित्र आणि सातआठ पोलिसांनी मिळून काही रक्कम जमा केली. मी ती मायलेकीच्या हातात ठेवली. त्या घेत नव्हत्या तरीही... ! त्यांना एक भाड्याची गाडी करून दिली..  त्या दोघी मायलेकी त्यांच्या गावी गेल्या ... !

      या घटनेनंतर पुढच्याच महीन्यात माझ्या वडीलांचा अमृतमहोत्सव होता ..कॅबिनेट मंत्री अजितदादा यांच्या हस्ते झालेल्या या समारंभाला जमलेला प्रचंड जनसमुदाय पाहून बंदोबस्तावर असणाऱ्या साहेबांला मी कोण आहे ते कळून चुकले होते. सभा संपल्यावर अजितदादांच्या पंगतीलाच मी त्यांना जेवायला बसवले.  त्यांच्या कानात हळू आवाजात म्हटले.. साहेब त्यादिवशी माझ चुकलच .. स्वारी.. ! जेवणानंतर अजितदादांशी त्यांची ओळख करुन दिली. साहेब आता खुश झाले होते.. तुमच नाही ओ माझच चुकले असे म्हणत त्यांनीही स्वारी म्हटल.  आज साहेब रिटायर्ड आहेत. मी ही पत्रकारिता थांबविली आहे. त्या लेकीचाही संसार सुखाचा चालला आहे. अधूनमधून तिचा फोन येतो. फोनवर बोलताना ती जेव्हा काका म्हणते..तेव्हा तिच्या माझ्याबद्दलच्या भावना ह्रदयाला भिडतात... त्यामुळे माझे उर भरुन येते.  ती माझी खुप काळजी करते. त्याचेच मला खुप खुप आत्मिक समाधान लाभते.

    🍁🌿🍁🌿🍁🌿🍁🌿🍁🌿🍁