...

1 views

माझे साडीचे कपाट
*माझे साडीचे कपाट*

*जेव्हा जेव्हा मी उघडते माझ्या साडीचे कपाट*
*कित्येक आठवणींच्या साठवणी मांडतात थाट*

*नीटनेटक्या एकावर एक साड्या सुरेख मांडलेल्या*
*शिस्तीत जणू स्मृतींच्या घड्या सुंदर या रचलेल्या*


साडी म्हणजे प्रत्येक बाईचा अगदी जवळचा विषय असतो. कपाट साड्यांनी गच्च भरलेला असला तरी नवीन प्रकारात साडी आली की ती हवीहवीशीच असते, असं हे बायकांच साडी प्रेम अगदी तसेच माझे पण काहीसं हे साडीचे प्रेम म्हणा की वेड? साडी म्हटलं की प्रत्येक महिलेच्या मनात एक वेगळी जागा असते. लग्नात वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या असोत अथवा कोणत्याही कार्यक्रमासाठी साडी निवड असो. प्रत्येक महिलेला आपल्या कपाटात साड्या हव्याच असतात.

आज पंजाबी ड्रेस, कुर्ती, वेस्टर्न, वनपीस जरी घालत असलो तरी साडी म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. कुठली नवीन साडी आली की ती आपल्याला हवीच असते असं हे मला देखील साड्यांचे प्रचंड आकर्षण आहे. त्यामुळे माझ्या साड्यांचे कपाटाला माझा नवरा मला मजेने म्हणतो तुझे साड्यांचे कपाट म्हणजे "एक छोटसं दुकान" आहे. बाजारात मिळणार नाही ती साडी तुझ्याकडे असते हमखास.


माझे हे साडीचे कपाट म्हणजे खरोखर आठवणींचा खजिना आहे. प्रत्येक साडी मागे एक सुखद आठवण दडली आहे. साखरपुड्याची बनारसी, हळदीची जिजामाता, मामाची नवरी केलेली पैठणी, लग्नातली कांजीवरम, डोहाळजेवणाची हिरवीगार नारायणपेठ, मुलाच्या बारशाची इराकल आजही कपाटात वीस वर्षे लग्नाला होऊन सुद्धा दिमाखात मिरवतात.. त्यांची कपाटात एक स्पेशल जागा आहे त्यांना पाहून मन आनंदाने भरून येतं.

नवऱ्याने वाढदिवसाला घेतलेली नाजूक वर्क केलेली गुलाबी साडी आजही मनाला गुलाबी करते. भाऊ भाऊबीज राखीला साडी देतो तिची शान वेगळीच असते. आईने दिलेली कुठलीही साडी घातली ना की वाटतं की आईने आपल्याला मिठीतच घेतला आहे आईचा तो उबदार स्पर्श त्या साडीत जाणवतो. मैत्रिणींनी प्रेमाने गिफ्ट आणलेली साडी घातली ना किती भारी वाटते. कित्येक सण समारंभ, कार्यक्रमांना आपण साड्या घेतो त्या गोड क्षणांची आठवण बनवून त्या कपाटात सजतात. आजी गेल्यानंतर तिची नऊवार मी आठवण म्हणून आणलेली आजही ती पाहिली की डोळ्यात टचकन पाणी येते. अशा कित्येक सुखद, दुःखद आठवणींनी एक एक साडी माझ्या कपाटात सजली आहे.

माझ्या साडीच्या कपाटात जेवढ्या मी साड्या व्यवस्थित, नीटनेटक्या, शिस्तीत, इस्त्री करून ठेवल्या आहेत तेवढ्याच त्या साडी मागच्या आठवणी देखील हृदयात साठवून ठेवल्या आहेत. हे माझे फक्त साडी प्रेम किंवा वेड नसून त्या आठवणींवरचे ही अतोनात प्रेम आहे...जे प्रत्येक स्त्रीला असते म्हणून प्रत्येक स्त्रीचा तिच्या साड्यावर जिवापाड जीव असतो. कोणतीही बाई तिला शंभर पेक्षा ही जास्त साड्या असल्यातरी ती साडी केव्हा, कधी, कुठे घेतली हे नक्की सांगू शकेल तर तिचे विशेष साडी प्रेम....नाही का?

*माझ्या साडीच्या कपाटात प्रत्येक साडीचे वेगळे आहे स्थान*
*लग्न, सण समारंभ, प्रसंगी घेतलेल्या साडीचा वेगळा मान*

*भारी, उंची रेशमी साडीने दिल्या कित्येक आठवणीं रेशमी*
*नवीन फॅन्सी, सिंथेटिक, वर्कच्या साड्यांची कुठे नाही कमी*

*बारसे, वाढदिवस, वास्तूला घेतल्या वेगवेगळ्या साड्या खास*
*साडी साठी कधी लाडिक हट्ट करत नवऱ्याला ही दिला त्रास*

*नवरा म्हणतो कपाट भरले आता बस कर साडी खरेदी राणी*
*त्याला ही माहीतच असते ही साड्यांची घर घर की कहाणी*

*सुरू म्हणता सुटत नाही, तुटत नाही साडीच्या मोहाची दोर*
*या साड्यांचे कपाट खचाखच भरूनही "ये दिल मांगे मोर"*


Mrs. Rashmi Ankush Kaulwar
IWC Pandharpur Dist 313


© Rashmi Kaulwar