...

8 views

बदलती शाळा
      शाळा हा शब्द आजही उच्चारला तर आपल्याला आपले शाळेचे दिवस आठवतात ; त्या मित्रांसोबत केलेल्या मौजमजा, मैदानावर घालवलेला वेळ, गृहपाठ पूर्ण नव्हता म्हणून मिळालेली शिक्षा आणि म्हणूनच कठोर वाटणारे ते शिक्षक असे बरेच काही... वर्षभर छान उपक्रमांसोबतच अभ्यास पण चालायचा आणि मग यायच्या परीक्षा. अशा या परीक्षांच्या वातावरणात पण एक वेगळीच मजा असायची आणि परीक्षेत चांगले गुण मिळाले पाहिजे म्हणून जबरदस्तीने म्हणा किंवा आनंदाने अभ्यास करावाच लागायचा.
         आता याच शाळेत कमालीचा बदल जाणवत आहे शाळेतील काळ्या फळ्याची जागा व्हाइट बोर्ड ने घेतली आहे. काही ठिकाणी तर अगदी डिजिटल बोर्ड झाले आहे . सर्व एकदम छान चालले असताना कोरोनामुळे संपूर्ण चित्र पालटून गेले .... अभ्यासक्रम अर्द्या मधातून सोडून द्यावा लागला , मैदानावरचा विद्यार्थांचा आवाज गायब झाला आणि काय तर विद्यार्थी डिजिटल लार्निंग करतोय.पण हे डिजिटल लार्निंग कितपत योग्य आहे, अर्थातच विद्यार्थ्याचा डोळ्यावर आणि मनावर  परिणाम होत आहे आणि आपण जरी डिजिटल इंडिया म्हणत असलो तरी इंटरनेटचे महाजाल अजून बऱ्याच गावात जायचे बाकी आहे. अशातच सरकार ने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला मग काय सर्व विद्यार्थी आनंदात उड्या मारत आहे पण परीक्षा रद्द केल्याने प्रश्न सुटला असे नाही. खरं तर परीक्षा हे वर्षभर केलेल्या मेहनतीमधून काय शिकलो याचे मूल्यांकन आहे आणि जर मूल्यांकनच  नसेल तर आपण काय मिळवले याची जाणीव होणार नाही.फक्त शाळाच नाही तर महाविद्यालयात पण विद्यार्थ्यांना विनापरिक्षा पास केले गेले आहे. महाविद्यलयीन किंवा शालेय अभ्यासक्रम बऱ्याच  वेळा असे असतात की पुढचा अभ्यासक्रम हा पूर्वीच्या वर्गावर अवलंबून असतो. उदाहरण सांगायचे झाले तर जर दुसऱ्या वर्गात बेरीज-वजाबाकी शिकलो तर तिसऱ्या वर्गात त्यावरील उदाहरणे सहज सोडवता येतील.
         या बदलत्या शिक्षणपद्धती मधे फक्त विद्यार्थीच नव्हे तर शिक्षकांना पण अद्यतनित होण्याची गरज आहे.नवीन तंत्रज्ञानचा वापर करता आला पाहिजे.हल्ली दर दोन किंवा तीन वर्षांतून अभ्यासक्रम बदलत असतो मग परत तो अभ्यासक्रम शिक्षकांना समजायला आणि विद्यार्थ्यांना शिकवायला थोडा वेळ जातो तोपर्यंत नवीन अभ्यासक्रम येण्याची वाटचाल सुरू होते.आजचे शिक्षण हे पूर्णपणे पुस्तकी स्वरूपाचे आहे.पुस्तका बाहेरील कुठल्याही गोष्टीचा विचार करण्याची मुभा विद्यार्थ्याला आणि शिक्षकालाही नसते. त्यामुळे विद्यार्थी मुक्तपणे विचार नाही करू शकत. जो पहिल्या पाचात आला तो अत्यंत हुशार असा गैरसमज आधी होता; नशीब की ते नंबर पद्धती सरकार ने बंद केली. कला, कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, संगीत, इत्यादी विषयामुळे तर विद्यार्थ्यांना त्यांच्यातील कला दाखवण्याची संधी मिळते.
         बरेच लोक जिल्हा परिषद शाळांपेक्षा इंग्रजी शाळांना जास्त प्राधान्य देतात.अलीकडे तर कित्येक शाळा मुलांअभावी बंद होण्याच्या मार्गावर आहे.याचा अर्थ असा नाही की जिल्हा परिषद शाळा मुलांना घडवत नाही; कित्येक मोठे नेते, प्रसिद्ध दिग्गज हे याच जिल्हा परिषद शाळेतून शिकलेले आहेत. राहला प्रश्न इंग्रजीचा तर सरकार ने इंग्रजी शाळा पण सुरू केल्या आहे पण लोकांची मानसिकता अजून पण इतर शाळांकडे आहे. बालपणापासूनच संपूर्ण शिक्षण इंगजी मधून मिळते म्हटल्यावर मराठी कुठेतरी दुरावल्यासारखी वाटत आहे. आता तर शाळेच्या आधीच शिक्षण चालू होते मग त्यात किंडर प्ले , केजी1 , केजी 2....असे नवीन नवीन वर्ग आले.बदल छान आहे; विद्यार्थाला  बालवयापासून शिक्षणाची गोडी आणि शिस्त लागते पण यात त्यांचे बालपण हिरावल्या जाते.
          अशी ही शाळा आणि शिक्षणपद्धती दिवसेंदिवस बदलतच आहे. आणि बदलती जीवन पद्धती बघता हा बदल पण सकारात्मकच आहे.काही वर्ष मागे वळून बघितले तर कमालीचा फरक लक्षात येईल.मला खात्री आहे वरील लेख वाचून आपल्याला पण आपली शाळा, सोबती, शाळेतील मौजमस्ती आणि सोबतच आताचा झालेला बदल जाणवला असेल.