...

6 views

मैत्रीचं नातं
मैत्री ही कृष्ण व सुदामा सारखी विशुद्ध असावी.
एकाने नं सांगता दुसऱ्याला निकड कळावी...
मग तो कितीही मोठा देवही का असेना.

सुदाम्यास आपल्या गरीबपणाबद्दल कृष्णाला सांगायचंच नव्हतं. फक्त त्याच्या पत्नीने सांगितल्यामुळे तो मदतीसाठी श्री कृष्णाला भेटावयास निघाला, ते पण पुरचुंडीभर पोहे घेऊन; कारण तेच त्याच्या घरात शिल्लक होते.
पुढची गोष्ट आपण सर्व जाणतोच...

सुदामा तर कृष्णास काही बोललाच नव्हता; न म्हणे समोर कृष्णाला बघताच त्याला काय बोलावं ते सुचलंच नाही.

पण जर कृष्णाने सुदाम्यास मदत केलीच नसती तर?
सुदामा आपल्या बालमित्रास फक्त भेटण्याच्या हेतूने गेला होता. पण त्याने आणलेले चिमुटभर पोहेही कृष्णाने गोड मानून खाल्ले.
मित्राच्या मदतीवीना रिकाम्या हाती गेलेला सुदामा, घरातील परिस्थिती बदलली नसती तरी कृष्णावर नक्कीच रागवला नसता...

पण आजच्या युगात खरंच हे शक्य आहे?
मी आणि कित्येकांनी अशी आयुष्यभर पुरून उरणारी व आयुष्यानंतरही कायम असलेली मैत्री पाहिलीय व अनुभवलीयही.

अशी पुरातनकालातील वा समकालीन जिवस्यकंठस्य मैत्री मग आपल्यालाही कुणाचं आयुष्यभरासाठी मित्र वा मैत्रीण होण्यास एक उदाहरण म्हणून प्रेरीत करतेच...

मग कुणी मित्राच्या घरातलं भेटलं तर त्याच्या खुशालीची चौकशी न चुकता केली जाते किंवा मित्रांची आठवण तितक्याच उत्कटतेनं त्यांच्या नंतरही काढली जाते...

मैत्री हा एकमेकांच्या संपर्कात रहाण्याचं नुसतं कारण म्हटलं तरी चालेल; मग ते फक्त भेटीगाठींपुरते असो, गरजेसाठी असो, वा सहज भेटणं, वा बोलणं असो.

मित्रांकडून मदत मागणं हे खचितच वाईट नाही; पण मदत मागितल्यावर मित्र मदत करेलंच याची अपेक्षा ठेवणं हे मात्र मैत्रीसाठीच काय कुठल्याच नातेसंबंधासाठी, आपल्याच मीपणाच्या गर्वापायी मारकंच ठरतं.

जेव्हापासून आपण आपला गर्व, मीपणा आपण बाजूला ठेवतो; तेव्हापासून आपण आपले सर्वच नातेसंबंध सुरळीत करायला सुरूवात करतो.

श्रीदत्ताच्या आरतीतील खालील ओळ आवर्जून उल्लेख करण्याजोगी आहे.
मी-तू पणाची झाली बोळवण...

@prasad_thale