...

3 views

पाणवठा....
पाणवठा ....



मी खुपच लहान होतो. घराच्या मागील भागात एक मोकळी जागा आणि त्याच्यापुढे एक पाणवठा होता. हा पाणवठा किती जुना, कसा अस्तित्वात आला याबद्दल कुणालाही पुरेशी माहिती नाही.

लहान असताना या पाणवठ्याला लागुन असलेल्या मोकळ्या जागेत आम्ही विटी दांडु, गोट्या, माचीस, थप्पर, लंगडी. पकडा पकडी असे अनेक खेळ खेळायचो. गावातील कातकरी वाडीतील काही लोक काठीला फास लावुन पाणवठ्याच्या किनारी बेडुक पकडण्यासाठी येतं . खेळ खेळताना कधी कधी किनाऱ्यावर आम्ही जात असू. पण पुढे त्याची खोली जास्त होती आणि चिखलही, त्यामुळे जपुनच उतरत असत. सकाळ संध्याकाळ हा पाणवठा माझ्या नजरेच्या टप्प्यात यायचा. याच पाणवठ्याला लागुन असलेल्या जागेत गवत आणि झाडाझुडपांचीं कमी नव्हती. हा पाणवठा म्हणजे आम्हा मुलांचं एकत्र जमण्याच आणि खेळ मस्ती करण्याचा एकमेव ठिकाण.

इथेच खेळण्यात बालपण जात होते आणि मग ६वी ला असताना बाहेर शिकण्यासाठी मी वसतिगृहात राहावयास गेलो. गावापासून दूर गेल्यामुळें गावात येणं जाणं कमी झालं. कधी गावी गेलो तरीही घरातील मंडळी मला घराबाहेर पडु देत नसत. त्यामुळे मित्रांपासुन कायमचाच दुरावलो. काही वर्षांनी पदवी पुर्ण करून पुन्हा गावी आलो.

आता गावामध्ये बरेच बदल झाले होते. कुडाची घरे जाऊन सिमेंटची पक्की घरे, डांबराच्या रस्त्यांची जागा काँक्रीट ने घेतली होती. गावात जनावरांचे गोठे दिसेनासे झाले होते. गल्लीबोळ पेव्हर ब्लॉक ने सजले होते. जुन्या पाणवठ्याची जागा मात्र अजूनही दुर्लक्षित होती. त्याच्या सभोवती कचरा साचला होता. आजूबाजूचा परिसर एकदमच भकास आणि भयाण वाटत होता. पुर्वी मुलांच्या वावरण्याने गजबजलेला परिसर आता निर्मनुष्य दिसत होता.

ग्रामपंचायतीने हा भाग का बरं विकसित केला नसावा? हा प्रश्न मनात आल्यावाचुन राहिला नाही. एक अविस्मरणीय बालपणं ज्या परिसरात घालवला तो परिसर आता भेसडा, भयानक, दुर्गंधीयुक्त आणि दुर्लक्षित राहणे म्हणजे आश्चर्यकारकच. मन विषन्न होत होतं. आपल्या गोड आठवणींवर आघात व्हावा तसं मनं त्या जागेच्या विचारांनीच सुन्न होत होतं.

घरी गेल्यावर थोड्या विश्रांतीनंतर एक फेरफटका मारला. पूर्वीसारखा तिथे जीव रमत नव्हता आणि त्या पाणवठ्याशिवाय कुठे जावे मनाला पटतही नव्हते. त्या पाणवठ्याविषयी एवढी आसक्ती असण्याचं एकमेव कारण म्हणजे माझ्या बालपणीच्या आठवणींचा ठेवा. इतरही माझे बालपणीचे सवंगडी असतील, त्यांना का बरं या पाणवठ्याविषयी आपुलकी वाटत नसावी? घरात मनं रमत नव्हते. मी जुन्या आठवणींनी व्याकुळ झालो होतो. मनात वेगळीचं घालमेल होत होती. मनातील अस्वस्थता मला स्वस्थ बसू देत नव्हती. मी वारंवार पाणवठ्याजवळ फेऱ्या मार्तब होतो.

शेवटी न राहवुन संतोष ने दुरून आवाज दिलाच. "किरण..... कधी आलास? कसा आहेस?

बऱ्याच दिवसांनी आम्ही भेटत होतो. तो ही झपाझप पावले टाकत एका दामातच माझ्या जवळ आला. ख्याली खुषाली विचारून झाल्यावर जुन्या आठवणींमध्ये रमलो. जास्त वेळ विषयांतर न करता शेवटी मीच मुद्द्यावर आलो.

"काय रे, किती मस्त जागा होती ही, आता का अशी केली? या पाणवठ्याच्या विकास का नाही करत? साफ-सफाई का नाही होत? पूर्वीसारखे इथे कोणीच कसे फिरकत नाही? माणसं तर दूरचं जनावरं देखील दिसत नाहीत?"

एकामागून एक प्रश्नांचा भडीमार चालू झाल्यावर संतोष खिन्न मनाने माझ्याकडे पाहू लागला.

"खुप दिवसांनी आलास ना? मध्ये आमची आठवण नाही आली का रे?" संतोष ट्रस्ट होऊन बोलू लागला.

"तु येथुन गेल्यावर आम्ही सर्वांनी तुला खुप मिस्स केलं. वेळ सरते तश्या आठवणी कमी होत जातात. आम्ही तुझ्या कमीपणाची सवय करून घेतली. पण तरीही एक आस असायची, तू अचानक येशील आणि पुन्हा आपले खेळ रंगतील"

संतोष खुपच भावुक होऊन बोलत होता. त्याचे शब्द मनाला भिडत होते.

"तू गेलास, त्यानंतर अनेक दिवस आम्ही सर्वजण इथे फक्त जमायचो, तू पुन्हा येशील हीच भाबडी आशा होती." संतोषच्या डोळ्यांत आसवे दाटली होती. आवंढा गिळुन रडवेल स्वरातच तो सांगू लागला.

"आपलं बालपण, आपली मैत्री किती निरागस होती. म्हणुनच कोणाचीही कमी इतरांना अस्वस्थ करून जायची. तु गेल्यावर गावात तसा काही फरक पडणारच नव्हता, पणं एक कमी मित्रांमध्ये जाणवतेच. मनात केलेली जागा खाली नाही होत. त्या गोड आठवणी आणि तो हर्षित सहवास हवाहवासा वाटतोच. ती एकमेकांची ओढ कायम मनात राहते.

काही दिवस शांत आणि निरास गेले पण हळुहळु आम्ही सावरू लागलो. एक दिवस गावात एक मेंढपाळ आला होता. खुप साऱ्या मेंढ्या काही दिवस बाजुच्या शेतात बसवल्या होत्या. तो या पाणवठ्यावर पाणी प्यायला त्यांना घेऊन येत असे. त्याच्यासोबत त्याची बायको, एक मोठा मुलगा आणि एक छोटीशी मुलगी असा परिवारदेखील होता. एक दिवस आम्ही खेळात असताना ती छोटी मुलगी मेंढीचं कोकरू हातात घेऊन इथे खेळायला आली. आम्हालाही उत्सुकता होती. आम्ही तिच्या सभोवती जामो. ते कोकरू उड्या मारायचं, कान टवकारायचं,डोळे मिचकवायचं, तोंड चावायचं आणि मध्येच नाजुक आवाज काढायचं. आम्हालाही त्याला उचलुन घेण्याचा मोह झाला. पण ती मुलगी आम्हांला, कोकरूला हात ही लागु देत नव्हती.

आम्ही सर्वांनी तिला खाऊच आमिष दिल, लाडी गोडी लावली, खेळायला घेतलं तरीही कोकरू ला काही हात लावता येत नव्हता. शेवटी सर्वांनाच तिचा राग आला. तिला दमदाटी करून आम्ही ते कोकरू उचलून घेऊ लागलो. पण ती मुलगीही हट्टीच होती. ती त्या कोकरूला आमच्या कडून हिसकावुन घेऊ लागली. आमच्या झटापटीत ते कोकरूही घाबरलं. तडफडू लागलं. आणि शेवटी त्याने कशीबशी सुटका करून घेत पाणवठ्यात उडी मारली. कोकरू पाण्यात बुडु लागलं तशी ती मुलगीही त्याच्या मागे धावली, पाणवठ्यात उतरली. आणि बघता बघता ते दोघेही पाणवठ्याच्या चिखलामध्ये दिसेनासे झाले. आमचा आरडाओरडा पाहुन ते धनगर कुटुंब तिथे आले. आपली मुलगी आणि कोकरू पाण्यात डुबताना पाहुन त्यांना शोक अनावर झाला आणि त्या दुःखातच त्या नवरा बायकोने तिथेच प्राण सोडले. राहिला तो एकटाच मोठा मुलगा. सरपंचांनी आणि गावकऱ्यांनी त्याच सांत्वन करून हाताशी थोडी मदत देऊन त्याची पाठवणं केली. परंतु त्या दिवसापासुन हा पाणवठा म्हणजे मृत्युचा दरवाज्याचं बनला आहे. अधुनमधुन वारंवार इथे कधी जनावरं, कधी कुत्रे तर कधी बालके गायब होऊ लागले. रात्री अपरात्री कुणाचा रडण्याचा ओरडण्याचा आवाज तर कधी चित्र विचित्र आकृत्या इथे सर्रास दिसु लागल्या."

बराच उशीर झाला होता. संतोषचा निरोप घेऊन मी घरी आलो. माझ्या चेहऱ्यावरील विषण्णता भावाने ओळखली.

"काय रे, किरण... एवढा शांत का? करमत नाही का गावात?" दादा ने विचारलं.

"अरे दादा, किती बदल झालाय गावात. सर्व लहानपणीचे मित्र दुरावलेत, कुणीही दिसत नाहीत" मी म्हणालो.

दादा गप्प बसला, त्याला काय बोलावे सुचत नव्हते. पण मी त्याच्या मागे तगादा लावला. शेवटी माझी व्याकुळता त्याला सहन झाली नाही. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला. "तुला खरंच काही माहित नाही? हम्म ,.. तसंही तुला माहित करून द्यायचं नव्हतंच. म्हणुनच तुला वसतिगृहातुन इकडे आल्यावर बाहेर जाऊ दिलं जात नव्हतं." दादा खिडकीतुन बाहेर पाहत मला सांगत होता.

मी संभ्रमात होतो. पुढें ऐकण्यासाठी मी आतुर होतो. त्याचे शब्द माझ्या मनावर परिणाम घडवत होते. एक अनामिक भीती मनात निर्माण होत होती.
"तु वस्तीगृहावर गेलास आणि गावात खुप काही घडले." दादा इति वृत्तांत सांगु लागला.
पुर्ण घटना ऐकल्यावर मी म्हणालो," हो, ... मला संतोष भेटला होता, त्यानेही सांगितलं"
दादाला झटकाच लागला. ताडकन मागे वळून डोळे विस्फारून दोन पावले पुढे येत मला विचारू लागला, "कोण संतोष", तो पाड्यावरचा?
कसं शक्य आहे? अरे तो तर....." दादा अडखळला. मध्येच बोलायचं थांबला. घामाने लथपथ होऊन आणखी पुढे होत त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवले. "तु संतोषला भेटलास?"
"हो दादा, काय झालं?" मी घाबरूनच विचारले.

"अरे तो संतोष जाऊन ९ वर्षे झाली रे.... त्या धनगराच्या मुलाने घात केला. त्याच्या कुटुंबाला झालेला आघात या मुलांमुळेच झालाय असा समाज करून त्याने काही दिवसांतच पाणवठ्यावर मृत्यूतांडव रचला. एक दोन नाही तुझे सर्व सवंगडी संतोष, आकाश, दिलीप, गानू, मंदार, भूषण आणि पिंट्या एक एक करून तलावात बुडत होते. पाणवठ्याचे पाणी उकळी येऊन उसळी मारावे तसे वर उसळत होते. हा तांडव काही क्षण चालला आणि तडफडून ते ही गेले. तेव्हापासुन या शापित पाणवठ्याजवळ कोणीही फिरकत नाही. जो जाईल त्याला असे भयानक अनुभव येतातच. तुला घराबाहेर जाऊ न देण्याचे हेच कारणं होतें."

दादा धाय मोकलुन रडत होता. हुंदके देत बोलत होता. माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. एवढं सगळं घडलं आणि एवढे वर्ष मला त्यापासून दुर ठेवलं. मी स्वतःलाच अपराधी समजत होतो. एवढ्या वर्षात मित्रांची कधीच आवर्जुन चौकशी केली नाही. आणि आता आलो तर सर्व गमावलेल. मी खुप दुखी झालो. खुप काही गमावल्याची खंत वाटु लागली. पण माझी आठवण आणि माझे सवंगडी मला तिथे साद घालत होते. दादा झोपायला गेला. रात्रीच्या टपोर चांदण्यात मी बराच वेळ खिडकीतुन पाणवठ्याकडे एकटक पाहत राहिलो. संतोष आणि इतर मित्र मला अजूनही पाणवठ्याजवळ बोलावत आहेत हा आभास माझ्या डोक्यातुन जाताच नव्हता. शेवटी कसलाही विचार न करताच मी निघालो पाणवठ्याच्या दिशेने. काळाकुट्ट अंधार, कडकडणारी थंडी, रातकिड्यांचा किर्रर्र करणारा आवाज आणि धुसर धुक्याला छेद देत मी संथ पावले टाकत होतो आणि माझ्या जोडीला माझ्या सवंगड्यांची पावले पडत होती. आज या काळोखातही तो पाणवठा आनंदला होता. पुन्हा एकदा सर्व सवंगडी पाणवठ्यावर जमलो होतो.
© SURYAKANT_R.J.