...

8 views

हळद आणि हडळ - ११
हळद आणि हडळ - ११





अमृताने तिच्या हातातील मानपानाचे कपडे त्या हातांमध्ये सुपूर्द केले. ती आतील कुणाशी संवाद साधू लागली. आई, बाबा, आजी आणि अवंती ओरडून तिला मागे फिरण्यासाठी विनवत होते. सावलीने अमृतावर, तिच्या शरीरावर आणि बुद्धीवर पूर्ण ताबा मिळवला होता.

ती आठवू लागली. त्या बंगल्यातील इतर काळोख्या सावलीसदृश आकृतींशी संवाद साधु लागली.

"बाबा, पालखीवरून राजकारणं झालं. आपल्या सर्वांना अपमानित केलं गेलं. आपला सामाजिक बहिष्कार केला गेला. तरीही तुम्ही एकटे लढले. आम्ही तुमच्या पाठीशी होतोच. तुम्ही पोलिसांत गेले, कोर्टात गेले, मंत्रालयात गेले. शेवटी सत्याची बाजू जिंकली. पण तरीही, आपला विजय काही काळापुरताच राहिला. मला माहित आहे, अजूनही त्या घटना आठवतात, माझ्या लग्नाची तयारी चालू असतानाच त्या समाजकंटकांनी आपल्या घरावर धावा बोलला. बाबा, तुमचं स्वप्न होत लग्न धामधुमीत पार पाडायचं. तुम्ही त्यांना विनवणी केली. त्यांच्या पाया पडलात. पणं त्या समाजकंटकांनी काही ऐकलं नाही. रात्रीच्या सामसुमीचा फायदा घेत घराबाहेर मांडवाला आग लावल्यानंतर, आपल्याला याच बंगल्यात कोंडवले गेले. पेट्रोल ओतून आपल्याला जिवंत पेटवून दिले. माझ्या मनात अजूनही तो राग आहे. त्या समाजकंटकांचा बदला घेतला असला तरीही तो आनंद, ती ईच्छा अजूनही अपुरीच होती. आज ती पूर्ण करण्याची वेळ आली आहे."

सावली जोरजोरात हसू लागली.

अमृताच्या हाताला धरून कोणीतरी बंगल्यातून अमृताला आत खेचले. जे काही घडत होते ते सर्व अमानवीय होते. डोळ्यांदेखत मुलगी अश्या बंगल्यात जाताना पाहून कोणत्या आई-बापाला राहवेल?. त्या चौघांनीही ओरडण्याचा प्रयत्न केला, पणं त्या आवाजाला कोणी जुमानणार नव्हतं. आजीने मारुतीरायाचा धावा चालू केला.

"मारुतीराया... गावावर आलेलं संकट तूच परतून लावलयं, आमच्या डोळ्यादेखत पोरीला भूत त्याच्या तालावर नाचवतोय, आम्ही काही करू शकत नाही. तूच धाव आता".

अमृताच्या बाबांनी अश्रू गाळत देवभुबाबांचे स्मरण चालू केले. डोळे बंद करताच त्यांना देवभुबाबांची प्रतिमा दिसू लागली. हवेच्या झुळुकीबरोबर मंदमंद खुळखुळ्यांचा आवाज कानात घुमु लागला. एक एक करून असंख्य खुळखुळ्यांचा आवाज व्हावा आणि त्याच बरोबर मंदिरातील घंटेचा घंटानाद सुरु व्हावा तसा प्रचंड कल्लोळ ऐकू येऊ लागला.

तारासाहेबांच्या बंगल्यातील तो प्रकाशसुद्धा थरथरू लागला. अवंती आणि अमृताची आई घाबरलेल्या होत्या. आवाज कोठून येतोय? का येतोय? काहीच कळत नव्हते. पणं त्या आवाजातील सकारात्मक ऊर्जा आजीला आणि अमृताच्या बाबांना प्रोत्साहित करत होती. दोघांचेही नामस्मरण चालूच होते. आकाशात वीज चमकावी तसा थरथरणारा प्रकाश बंगल्यावर एकवटला. काही कळायच्या आतच बंगल्याच्या दरवाज्याच्या चिंधड्या उडाल्या. अमृता खाली कोसळली.

त्यासरशी तिच्या शरीरातून एक सावली वाऱ्याच्या वेगाने घोंघावत बाहेर पडली. चित्रविचित्र चित्कार काढत ती अक्राळविक्राळ रुप धारण करू लागली. आजी आणि बाबांचे नामस्मरण अजूनही चालूच होते. त्यांच्या आवाजातील तीव्रता, जयघोष वाढतच होता. प्रचंड आवाज होऊन वीज कोसळावी आणि धरणीला पाझर फुटावा असा एक विस्फोटक प्रकाशमान-दैदिप्यमान आवाज झाला आणि ती अक्राळविक्राळ सावली, बंगल्याच्या मागे जाऊन गडप झाली.

जखमी अवस्थेत बेशुद्ध पडलेली अमृता, सावलीच्या तावडीतून बचावली होती. अमृताचे आई, बाबा, आजी आणि अवंती धावतच तिच्या जवळ गेले. काही विश्वासू लोकांना सोबत घेऊन अमृताच्या बाबांनी हॉस्पिटल गाठले. डोक्याला मार होता. डॉक्टर ओळखीचेच होते, त्यामुळे ताबडतोब उपचार सुरु केले. वडिलांकडून मिळालेली माहिती आणि रुग्णाची एकंदर परिस्थिती आणि रिपोर्ट वरून अमृताला "एकाधिक व्यक्तित्व विकार" म्हणजेच "Multiple Personality Disorder" असल्याचे सांगण्यात आले. सकाळ होईतोवर अमृता शुद्धीवर आली. आपण कुठे आहोत? काय झालं? इथे कसे आलो? तिला काहीच कळत नव्हते.

औषधांची लिस्ट देऊन, अमृताला रुग्णालयातून सोडण्यात आले. सकाळी नऊ वाजेपर्यंत अमृता घरी आली. आजीने अमृताची द्रिष्ट काढली. डोक्याला पट्टी पाहून अनेकांनी विचारणा केली, पणं "काही नाही सकाळी पडवीमध्ये पडली" एवढंच सांगितलं गेलं.

अमृताच्या हळदीची ती सकाळ. सकाळपासूनच हळदीची, लग्नाची गाणी वाजत होती. आता पाहुण्यांची वर्दळ वाढत चालली होती. ती अंघोळीसाठी पडवीमध्ये गेली. पडवीकडे जाताना जी पूर्वी मनात भीती होती ती आज मात्र नव्हती. डोक्याची जखम सांभाळून तिने अंघोळ केली. पडवीतून बाहेर आली. आजूबाजूला पाहिले, काहीच नव्हते. एका बाजूला मान वळवत, थोड्या दुरवर नजर फिरवली. तारासाहेबांच्या बंगल्याचा पाठीमागील भाग दृष्टीपथात येत होता. बंगल्याच्या वर गुलमोहराच्या शेंडा लाल फुलांनी भरलेला दिसत होता. ती वक्राकार थोडी मागे फिरली. अवंती शेताकडे चालली होती. एकटीच, तिच्याच धुंदीत. काही काम असेल कदाचित.

अमृता घरात गेली. हळदीसाठी राखून ठेवलेली हळदी रंगाची दुसरी साडी नेसली. सकाळचे १०.३० वाजले असतील, एक एक करून गावातील स्रिया, पाहुण्या आणि मैत्रिणी जमु लागल्या. जुन्या गावगीतांच्या तालामध्ये म्हातारीच्या मागे त्या स्रिया गाणे म्हणत अमृताला हळद लावु लागल्या. एक एक करून सर्वांनी अमृताला हळद लावली आणि मग एकमेकांना हळदीने रंगवण्यात सगळ्याच सामील झाल्या. अवंती दुरूनच सर्व पाहत होती. आनंदामागे काहीतरी दुःख लपवून ती स्वतःशीच पुटपुटत होती. "कदाचित, पुन्हा कधीतरी". तिचे ओठ पुटपुटले.

अवंती तिच्या पडलेल्या सावलीकडे पाहून वेगळेच हावभाव करत होती. एक एक पाऊल संथगतीने टाकत ती अमृताजवळ आली. तिने अमृताकडे पाहिले. दोघींची नजरानजर झाली. अमृता तिच्याशी हसली. अवंतीनेदेखील स्मितहास्य केलं आणि खाली वाकली. बाजूला असलेल्या असलेल्या स्टील च्या भांड्यातून ओल्या हळदीच्या दोन्ही मुठी भरल्या. हात पाय गालावर हळद लावता लावता ती अमृताच्या कानात हळूच म्हणाली.

"तुला पुन्हा ईथेच यायचंय, लवकर येशील ना?"





---------------------------समाप्त-----------------------------------------
© SURYAKANT_R.J.