...

0 views

ज्वलज्वलंत - धर्मवीर बलिदान गाथा
भाग १ - घातचक्र

भाग १ - घातचक्र

संगमेश्वर.....तळकोकण प्रांतातले प्रभावळी सुभ्यातील (शृंगारपुर) टुमदार गाव. मोठे मोक्याचे ठिकाण. कोल्हापूर-पन्हाळा, राजापूर बंदर आणि कुडाळ प्रांतात जाणाऱ्या वाटांवर हे गाव वसलेले होते. कोकणातून कोल्हापूर प्रांतात उतरण्यास येथून घाटवाटा असल्याने याचे महत्त्व जास्त होते. आदिलशाही साम्राज्यात विजापूर व आसपासच्या भागातून मालाची देवाणघेवाण करण्यास कारवार, राजापूर, दाभोळ या बंदरांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असे. त्यामुळे साहजिकच व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी अनेक लष्करी ठाणी या मार्गात वसवली गेली. आदिलशाहीतील समुद्रामार्गे होणारा व्यापार व यात्रेकरूंचा प्रवास याच बंदरांमार्फत होत असे.

      दख्खन काबीज करण्यासाठी औरंगजेब दक्षिणेत आल्यावर मराठ्यांच्या कडव्या प्रतिकाराने त्याचा अंदाज चुकला. म्हणून एकीकडे मराठी बाजू झुंजवत ठेवून मुघलांनी आदिलशाही आणि कुतुबशाहीचा पाडाव केला आणि मराठ्यांना एकटे पाडले. तसेच विजापूर आणि गोवळकोंड्याचे राज्य, तेथील संपन्न मुलुख आणि एक लाखाहून अधिक सैन्य नव्याने मुघलांच्या बाजूने वाढले. विजापुरी व कुतुबशाही सरदारांना असलेल्या दख्खनी मुलखाच्या माहितीचा उपयोग करत बादशाहाने अनेक सरदारांना मनसबी बहाल केल्या. विजापूरचा सरदार सर्जाखान यास सातारा प्रांतात व गोवळकोंड्याचा सरदार शेख निजाम यास मुकर्रबखान हि पदवी देत पन्हाळा भागात रवाना केले.

      शंभूराजांना सह्याद्रीतून मैदानात खेचण्याचा हा डाव होता. दुर्दैवाने याच वेळी स्वराज्याचे सेनापती हंबीरराव मोहिते सर्जाखानाशी वाईजवळ झालेल्या झुंजीत धारातीर्थी पडले. यामुळे सेनापतित्वाची धुरा स्वतःकडे घेऊन शंभूराजांनी खासा औरंगजेबावर हल्ला करण्याचे पक्के केले. पन्हाळा प्रांताचे सामरिक महत्त्व जाणत, शंभूराजांनी याआधीच मलकापूर येथे मराठ्यांची सात हजाराची पागा निर्माण केली होती. या भागातला शत्रूचा वाढता वावर लक्षात घेऊन शंभूराजांनी कवि कलश यास विशाळगडावर तर म्हाळोजी घोरपडे यांना पन्हाळा किल्ल्याचे सरनोबत म्हणून नेमले होते. परंतु काळाने घात केला. शंभूराजांचे सख्खे मेहुणे गणोजी शिर्के मुघलांना फितूर झाले.

      मुकर्रबखान संभाजीराजांना पकडण्यासाठी संधी शोधत होता. जानेवारी १६८९च्या अखेरीस शंभूराजे संगमेश्वर भागात असल्याची बातमी खानाला कळली. अन गणोजींच्या दोन वाटाड्याना सोबत घेत मुकर्रबखान, त्याचा मुलगा इखलासखान सोबत दोन हजार सैन्य घेऊन निघाले. संध्याकाळ होत आल्यावर वाटेत त्याने विचारले, “अब कितना दूर जाना है?..” तेव्हा वाटाड्यानी उत्तर दिलं, “आता तर निम्मा रस्ता काटलाय हुजूर..अजून घाट उतरलो कि आपण कोकणच्या भागात पोहोचू.” मुकर्रबखान आता मात्र घाई करत होता. मलकापूरची खडी मराठी पागा चुकवत वाटाड्यानी अणुस्कुरा घाटाचा मार्ग धरला.

स्वतः मुकर्रबखान ही भयंकर वाट बघून धास्तावला होता. अत्यंत तीव्र उतार, एका बाजूला खडा पहाड, दुसरीकडे खोल दरी आणि मधून केवळ एक व्यक्ती जाऊ शकेल अशी वाट. शिवाय बोचणारी थंडी आणि काळाकुट्ट अंधार. कित्येक घोडी पुढेच जाईनात, काही घसरून दरीत पडली तर काही जागेवर थांबून खिंकाळू लागली. तो सतत म्हणत होता. “या खुदा...ये कैसा रास्ता है. जहन्नम जैसे इन रास्तोंपर आखिर ये काफिर मरहट्टे कैसे घूमते है?? आखिर इतनी ताकत आती कहांसे इन काफिरोंको...या खुदा मदद कर...” पण संभाजीस पकडून बादशाहची मर्जी जिंकण्यापुढे त्याला काहीच दिसत नव्हते. आपले सारे बळ एकवटून तो ओरडत होता. “चलो आगे बढो...निकम्मो..सुबह होने से पहले हमे उस संभा तक पहुचना है.यदी इस बार हम कामयाब हुए तो सारे हिंदोस्ता में तुम्हारी तारीफ होगी. पातशहा सलामत तुम्हे मालामाल करेंगे...जल्दी करो...जल्दी करो.”

      कसाबसा घाट उतरून फौज कोकणात उतरली. तेवढ्यात वाटाडे पुढे आले आणि म्हणाले, “हुजूर अब यहांसे आपको हमारे आदमी आगे जाने के लिये मदद करेंगे.” तशी खान आपल्या दाढीवरून हात फिरवत खुशीत हसला व म्हणाला “ठीक..ठीक.” पण तेवढ्यात एक वाटाड्या म्हणाला, “हुजूर, अब देर मत लगाईये. सकाळच्या पहिल्या प्रहरी शंभूराजे जाणार आहेत..आता घाई नाही केली तर सावज हातातून निसटलं म्हणून समजा.” खानाला घाई करायला हवी हे पुरते समजले होते. म्हणून त्याने सर्व सैन्यास ओरडत, आपल्या हातातल्या आसुडाने जागे करत, मारत तयार केले. काहीजण आत्तापर्यंतच्या प्रवासात झालेल्या त्रासाने बसल्याजागीच पेंगत होते. पहाट आली होती अन वेळ थोडा उरला होता. त्यामुळे खानाने आहे त्यातलेच एक हजार सैन्य तयार केले आणि संगमेश्वरकडे भरधाव घोडा फेकला.

      सकाळी लवकर नाश्ता करून शंभूराजे शेवटचा निवाडा ऐकून पुढे जाणार होते. येसूबाईंचे मन आज विचलित होते. त्यांनी राजांना त्वरा करण्याचा फार आग्रह केला व म्हणाल्या. “आज आमचे मन खूप विचलित आहे. आम्हाला एकाएकी आपली काळजी वाटते. स्वामींनी आता इथे न थांबता ताबडतोब आमच्यासोबत चलावे. निवाड्यास कविराज खंबीर आहेत.” तशी राजे म्हणाले “आपणच अशा धीर सोडून वागायला लागलात तर बाकीच्यांनी आणि रयतेने कुणाकडे पाहावे?? शिवाय आमच्या संगती खंडो बल्लाळ, कविराज, म्हाळोजीबाबा, आणि संताजी आहेतच. आपली मलकापूरची पागा सावध आहे. ती ओलांडून आम्हास न कळता, शत्रू  स्वप्नात देखील घाट उतरू शकणार नाही. आपण ३०० स्वार ठेवून उर्वरित सैन्यासह पुढे जावे. धनाजी, रायप्पा अन बाकी फौज आपल्यासोबत असतील.” ते ऐकून येसूबाई म्हणाल्या, “एवढी फौज आमच्यासोबत कशाला? अन अवघे ३०० स्वार आपल्या रक्षणास पुरेसे आहेत असे आम्हाला वाटत नाही.” तशी खळखळून हसत शंभूराजे म्हणाले.. “आम्ही चिपळूणात दुपारच्या थाळीस तुमच्यासोबत हजर असू, मग तर झालं.” अन सोबतचे मोठे सैन्य देखील येसूबाईंसोबत चिपळूणला पाठवत आपल्या संगती केवळ ३०० स्वार ठेवून घेतले.

नायरीत देसायांच्या वाड्यात निवाडा सुरु होता. ठरल्यापेक्षा थोडा अधिकच उशीर झाला होता. आता राजे निघणार तेवढ्यात एक हेर धावत येऊन कविराजांच्या कानात कुजबुजला. तशी ताडकन उठत कविराज म्हणाले, “स्वामी.....घात झाला. आपल्याला येथून तुरंत निघावं लागेल. मुघल संगमेश्वरास येऊन पोहोचलाय अशी पक्की खबर आहे. स्वामी आता वेळ दवडू नका...आपण म्हाळोजी अन संताजीना सोबत घेत निघावे. मी आणि खंडोजी बल्लाळ इथले थांबून गनिमास अंगावर घेऊ.” जमिनीत नांगर रुतल्यावर बैल एकाजागी थांबावा तसे शंभूराजे सुन्न झाले. पण तेवढ्यात स्वतःला सावरत ते ताडकन तलवार हाती घेत उठले. एवढ्या खोलवर, मलकापूरची सज्ज पागा ओलांडून, वाटेतल्या साऱ्या चौक्या पार करत शत्रू स्वराज्यात आलाच कसा याचा त्यांना ठाव लागेना. तेवढ्यात वाड्याबाहेर एकच गलका उठलेला ऐकायला आला.

      क्षणभर गेला अन राजांचे तेजस्वी डोळे अंगाराने फुलले व राजे गरजले, “कविराज आज मुघलांना मराठी रक्ताचे तेज दाखवायची वेळ आली आहे. आपणा सर्वाना मरणाच्या दाढेत सोडून आम्ही पुढे जाणे शक्य नाही. आम्ही सोबत असता आपला हरेक सैनिक दहा जणांना भारी आहे. चला...हर हर महादेव..जय भवानी...असे गर्जत राजे वाड्यातून धावत बाहेर आले. पण बाहेर येताच राजाना कळले कि शत्रू संख्येने जास्ती आहे. म्हाळोजी, संताजी अन त्यांचे भाऊ, खंडो बल्लाळ त्वेषाने मुघल सैन्यावर तुटून पडले होते. कानातून जाळ निघेल एवढ्या जोरात ओरडत, आरोळ्या ठोकत स्वार एकमेकांशी लढत होते. ते पाहताक्षणी आपल्या घोड्यावर एका उडीत मांड ठोकत शंभूराजे नरसिंहासारखे मुघलांवर तुटून पडले. राजांसोबत कवी कलश देखील समशेर घेऊन गनिमास भिडले.

क्रमशः...
© ईशान्य