...

9 views

कोमल.... ( एक अबोल व्यथा )
कोमल.... ( एक अबोल व्यथा )


                      

                                        कोमलने नुकताच विज्ञान शाखेत शेवटच्या वर्षाला ऍडमिशन घेतलं होतं. इतर मुलीप्रमाणेच तिचीही काही खास स्वप्ने होती.उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं रहायचं आणि एक सुस्वभावी जोडीदार निवडायचा...जो आयुष्यभर छान सोबत देईल असा....

                                  आज कॉलेज सुटल्यानंतर तीला मावशीच्या घरी जायचं होतं. मावशीच्या घरी तिला साडेनऊ वाजत आलेले... तिला तिथून निघता निघता खूप उशीर झाला होता. मावशीने आज इथेच थांब उद्या जा...असं सांगूनही ती काही न ऐकता घरी येत होती. रात्र हळूहळू वाढत होती. आपल्या गावच्या बसस्थानकावर उतरून पाहते तर एकही रिक्षा नव्हती तिथे....आता अर्ध्या तासाचा तो रस्ता पायी चालण्यावाचून तिच्याकडे पर्याय नव्हता. ती झपाझप पावले टाकत घर जवळ करत होती. रस्त्यावर भयाण शांतता...एखादं-दुसरं कोणी दिसलं तरी ते असं बघायचं की मुलगी पहिल्यांदाच बघितली. मध्येच एखादी गाडी तिच्याजवळून भरधाव वेगाने निघून जात होती. नाक्यावरील टपोरी पोरांची ती वखवखलेली नजर हा तिचा नित्याचाच भाग झाला होता. आजही ते दोघे-तिघे नाक्यावर टंगळ-मंगळ करत बसले होते. ती तशीच त्यांची नजर चुकवत घराचा रस्ता धरते. पण मध्येच ते टपोरी पोरं आडवी येतात. ते पूर्णपणे झिंगलेले. कोमलच्या काळजाचा ठोका चुकतो. आता काय करावे तिला काही सुचेना. त्यांची मजल आज वाढली होती. एकाने तर तिचा हात पकडला आणि नको तसले इशारे देऊ लागला....ते बघून तिच्या काळजात धस्स झालं. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. अशा भयाण परिस्थितीत ती त्या लांडग्यांच्या जाळ्यात अडकली होती. तिला घाबरलेले पाहून त्यांना अधिकच जोर चढतो. ते तिघेही तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होते... कोमलचं पुरतं अवसान गळून गेलेलं.पण अचानक पोलिसांच्या गाडीचा सायरन ऐकू येतो....हळूहळू तो आवाज मोठा होत होता...बहुधा रात्रीची गस्त घालण्यासाठी पोलीस निघाले असावेत. तो सायरन ऐकून तिघे घाबरून पळून गेले. तसा कोमलने सुटकेचा निःश्वास सोडला...ती मनोमनी पोलिसांचे आभार मानू लागली...आणि आपल्या वाटेला लागली.

                                  घरी येऊन ती तशीच बसून होती. आज तिला जेवणाचीही इच्छा नव्हती. प्रसंगच बाका उलटला होता तिच्यावर...ती नशिबाने त्यातून सही सलामत सुटली...नाहीतर काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं असतं...त्या टपोरी पोराचे हात पकडणे तिला रुचले नव्हते.ती तशीच बसून विचारात गढून गेलेली....लहानपणापासून तिने सापत्नपणाची वागणूक झेलली होती. तिच्या घरच्यांच्या कपाळावर तर आठ्या पडलेल्या...जेव्हा ती जन्म घेऊन घरात आली होती...तिच्या भावाच्या तुलनेत तिला नेहमी तुटक वागणूक आजपर्यंत मिळाली होती. मुलीला चांगलं वागवून काय मिळणार....तिला चांगलं शिक्षण कशासाठी...एक ना एक दिवस ती परगृही जाणारच आहे ना...! अशा जुनाट विचराचे तिचे आई-वडील. ती सापत्न वागणुक झेलत झेलतच ती मोठी झालेली...आणि आता हे....तिला खूप पछतावा होत होता...मुलगी म्हणून जन्म घायचा...जीवनामध्ये क्षणोक्षणी काटेच काटे आहेत...असा तिचा पक्का समज झालेला. एकेक गोष्ट तिला आठवत होती...आणि मुलगी होण्याचा तिचा स्वतःबद्दलचा तिरस्कार वाढतच होता. विवेक तिच्या जीवनामध्ये आला तेव्हा ती आनंदाने पार हुरळून गेलेली...पण तिच्या प्रेमाच्या ऐन बहरात त्या विवेकने खरे रुप स्वतःचे दाखवले....हा माझ्यावर नाही...ना माझ्या मनावर प्रेम करतो...हा फक्त माझ्या शरीरावर प्रेम करतो...याची तिला चाहूल लागताच...ती त्याच्यापासून दूर-दूर राहू लागली....ती कायमची....राहून राहून तिला त्याच्यावर प्रेम करण्याचा तिटकारा येत होता....आपली गोड स्वप्ने...नाजूक कोमल मनाला ती त्याच्यामध्ये एवढी गुंतवून बसलेली....की ती परत प्रेमाच्या फंदात पडली नाही...सगळे पुरुष सारखेच....! असा तिने पक्का समज करून घेतलेला...आणि आता यातून तिला बाहेरही यायचं नव्हतं....कोमलने आयुष्यात जे जे भोगलं होतं....ते झरझर तिच्या समोरून जात होतं....एका विचाराने तिच्या काळजात धस्स झालेलं...आज ती त्या टपोरी पोरांकडून नशिबाने  वाचली होती...पण उद्याचं काय...? त्या विचाराने ती हादरून जाते...आणि तिची दातखिळीच बसते.

                            आजच्या घडलेल्या प्रसंगाने तर तिचा जीव हवालदिल झालेला...ती जो काही पुरुषांबद्दल विचार करते त्यांवर शिक्कामोर्तब झालेलं....तेच तेच आठवून कोमल डोकं उशी खाली दाबत रडत होती...ये असलं जिणं नको...त्यापेक्षा मरण पत्करलं...या टोकाच्या विचार ती पोचलेली....रडत रडतच तिची कधी झोप लागली तिचे तिलाही कळले नाही.

                             रात्री तीला एक स्वप्न पडलं...ती बागेमध्ये एकटीच निराश मनाने बसलेली...आता आयुष्यात जगण्यासारखं राहिलं तरी काय...? या विचारातच ती गढून गेलेली...

      
                               अचानक तिच्यासमोर एक लख्ख प्रकाश पडला...ती थोडी घाबरूनच त्या प्रकाशाकडे पाहू लागली....आणि त्यातून एक देवी बाहेर आली...चेहऱ्यावर एक प्रकारचं स्मितहास्य. ती देवी अवतरताच...तो लख्ख प्रकाश नाहीसा झाला...देवी एकेक पाऊल टाकत कोमलजवळ येत होती. कोमल मात्र पापणी न लवता त्या देवीकडे पाहत होती. जवळ येऊन त्या देवीने कोमलच्या चेहऱ्यावरून मायेनं हात फिरवला...तशी ती शहारली. तिला त्या मायेच्या आधारानं खूप बरं वाटत होतं. ती देवी बोलू लागली...उठ बाळा...! असं हरून कसं चालेल...तुझ्यापुढे तुझं उभं आयुष्य आहे...असं हार मानल्यागत नको बसुस...जोपर्यंत तुझं मन कणखर आहे...तोपर्यंत तुझं कोणी वाकडं करू शकणार नाही....मला माहिती आहे तू आतापर्यंत किती सोसलस ते...तशी कोमल त्या देवीच्या गळ्यात पडून रडू लागली...देवी पुढे बोलू लागते....मी तुझ्या मनातलं जाणून आहे...तुझ्या नाजूक मनाला किती यातना झाल्या आहेत हे मी जाणते....पण असं हरून कस चालेल. उठ उभी रहा आणि तुझा तू मुकाबला कर त्या राक्षसांशी....माझा आशिर्वाद आहे तुझ्या पाठी...आणि तू आयुष्यात खूप यशस्वी होशील...तुझे आई-बाबा पोरीनं नाव काढलं म्हणून हुरळून जातील....मी पाहिजे तर एका दणक्यात त्या लांडग्यांना तुझ्या रस्त्यातून काढून फेकलं असतं...पण जर मी असं केलं...तर तू कधी स्वावलंबी होणार...आणि तुलाही मी जे सांगितलं...त्याने तू प्रत्येक स्त्री ला प्रोत्साहित कर...तिला जगण्याचं बळ दे....माझी शक्ती आता तुझी शक्ती आहे....ती स्त्री शक्ती आता जागी होऊ दे.....धडा शिकव त्या प्रत्येकाला जो स्त्री ला फक्त एक खेळणं समजतो...समाजात तुच्छ समजतो....दाखवून दे त्या प्रत्येकाला आम्ही मुली पण काही कमी नाही.....कोमल त्या देवीचा प्रत्येक शब्द मंत्रमुग्ध होऊन ऐकत होती....माझे आशीर्वाद नेहमी तुझ्या पाठीशी असं म्हणत....ती देवी हळूहळू मागे जात एका लख्ख प्रकाशासह अंतर्धान पावते...

                                   हे स्वप्न म्हणावे की सत्य...हे कोमलला अजूनही उमजत नव्हते...पण तिचा आत्मविश्वास दुणावला होता...तिच्या मनगटात आता दहा हत्तीचं बळ संचारलं होतं...
सकाळी जेव्हा तिला जाग येते...तेव्हा ती खूप उत्साही दिसत होती....आज आनंदी मनाने ती कॉलेजला गेली. पण राहून राहून तिला एक गोष्ट टोचत होती...ती देवी तर म्हणून गेली....जा तू तुझा मुकाबला कर...पण मी एकटी कसा काय करणार...? त्या विचारातच तिचे एका-मागोमाग एक लेक्चर संपत होते...पण मार्ग काही तिला मिळत नव्हता...जेव्हा शेवटचं लेक्चर संपत आलं...तेव्हा तिला एक भन्नाट कल्पना सुचली...तिने तिच्या मैत्रिणींनाही ती गोष्ट सांगितली.

                                   आज ती परत त्याच रस्त्याने चालली होती....पण घाबरत नव्हे तर अभिमानानं...सोबत तिच्या मैत्रिणी ही होत्या.... तो नाका जवळ आला...आताशी संध्याकाळ होत आलेली...त्यामुळे माणसांचा राबता होता. त्या तिघांनी तिला पाहिले...छेडण्याचा उद्देशाने ते तिच्या पुढ्यात उभे राहिले...कालच्या प्रसंगावरून त्यांचा धीर वाढलेला...तू काय एकटी कमी होतीस की आज तुझ्या मैतरणीना पण घेऊन आलीस त्यातला एक मिश्किल हसत म्हणाला...ते तिघे ही कोमल आणि तिच्या मैतरणीना न्याहाळत होते...आणि नको तसले हाव-भाव करत होते...काही-बाही म्हणत होते. येणारे-जाणारे फक्त बघ्याची भूमिका घेत होते...त्यावेळी कोमलला कळून चुकले....ती देवी म्हणाली होती...तुझा तुलाच मुकाबला करायचा आहे....याचा अर्थ तिला आता उमजत होता...काल ज्या पोराने कोमलचा हात पकडला होता...आज त्याने पुन्हा तिचा हात धरला...तशी कोमलच्या मनात अंगाऱ्यासारखी एक सनक जोरात शिरली...आता कोमलचा हात फक्त नाजूक नव्हता...तर त्या हातात दहा हत्तीचं बळ संचरलेलं...ती तशीच त्या पोराचा हात वाकवून मोडते...तो कळवळतो...कोमल त्या पोराची लाथाबुक्क्यांनी धुलाई करायला सुरवात करते...तिच्या मैत्रिणीही एकेकाला धरून...चोप द्यायला सुरवात करतात. बघ्यांची भूमिका घेणारे ही आता मदतीला पुढे आलेले असतात...त्या पोरांचं शरीर काळं-निळं पडेपर्यंत कोमल त्यांची धुलाई करतच असते...शेवटी पोलीस येतात...कोमल ला एक सॅल्युट ठोकतात....इन्स्पेक्टर पुढे येऊन म्हणतात....आता समाजाला कोमल सारख्याच मुलींची गरज आहे....जेणेकरून कोणी असं काही करण्यास धजावणार नाही...आणि कोमलला शाबासकी देतात आणि त्या तिघा पोरांना घेऊन जातात. बग्यांच्या गर्दीमधले काही अभिमानाने तर काही भेदरून कोमलकडे पाहत असतात.पण कोमलची नजर दुसरीकडे असते....ती देवी तिला आकाशातून पाहत होती...आणि स्मितहास्य करत होती.कोमलही तिला प्रतिसाद देत होती.....

                               हळूहळू कोमलने स्त्रियांमध्ये कमालीची जनजागृती केली. स्त्री ला अभिमानाने कसं जगायचं ते शिकवू लागली. स्वरक्षणाचे धडे दिले...आम्ही मुली पण काही कमी नाहीत ही तिने पूर्ण जगाला दाखवून दिले. भ्रूणहत्येविरुद्धही तिने आवाज उठवला.... समाजाने ही तिच्या कार्याचा गौरव केला. नुसतं म्हणून नाही तर तसं जगून दाखवलं. अभ्यासात ही ती हुशार होती त्यामुळे ती मोठी डॉक्टर झाली... ती देवी म्हणाली होती....तसंच तिने तिच्या आई-बाबाचं नाव काढलं.


-समाप्त-
धन्यवाद
कथा कशी वाटली नक्की कळवा...

 © _अवि