...

6 views

माणुसकीची वाट
माणुसकीची वाट
(अति लघु कथा )

करोनाचा वैशाख वणवा चांगलाच पेटला होता .तापलेल्या रस्त्यावरून क्वचितच एखादं वाहन बॅरीअर गेटवर पोलिसांच्या चौकशी नंतर शांतपणे मार्गस्थ होत होतं . . ..एक फाटक्या कपड्यातील पस्तीशीतला तरुण एका जीर्ण म्हातारी बरोबर अनवाणी पायाने कोठेतरी निघाला होता. उन्हानं दोघांचे पाय पोळत होते , म्हणून त्यानं म्हातारीला एखादया लहान बाळासारखं कडेवर घेतल होतं.....
       तेव्हड्यात एका पोलिसानं त्यांना हटकलं ... ''काय रे इकडं ये , कुठ निघालास ? लॉक डाऊन आहे माहीत आहे की नाही? " ''साहेब म्हातारीला कालपासून खूप ताप आहे म्हणून सरकारी इस्पीतळात घेऊन चाललोय,कुणी गाडी थांबवत नाही.ताप म्हटल्यावर सगळेच लांब पळतात " त्यानं घाबरत उत्तर दिलं .
         पोलिस सुद्धा थोडा मागे सरला , मास्क नीट करत त्यानं खिशात हात घातला ,शंभर दोनशे रुपये देत म्हणाला," हे ठेव, तुझ्या आईला काहीतरी खाऊ घाल." "साहेब ही माझी आई नाही. ही पुलाखाली भीक मागती ,आज तिथंच पडली होती.कोणी नाही हिला. "
         तापलेला रस्ता माणुसकीची शितल वाट दाखवत होता!

शिव पंडित

© All Rights Reserved