...

8 views

सुकन्या
सुकन्या





केरळच्या सदाबहार हरियालीत, डोंगरदऱ्यांच्या कुशीत एक सुंदर घर होत. घराच्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडे, वनौषधी लावलेल्या आणि इतर आजूबाजूच्या, सभोवतालच्या परिसरात चहाचे लांबच लांब मळे. एवढ्या सुशोभित डोंगररांगा कि इथे प्रवास करताना आपल्याला कधी थकवाच न यावा. इथे जो गेला तो इथलाच झाला. स्वतःला या निसर्गात हरवणार नाही असं होणं अशक्यच.

तर या छोट्याश्या घरात राहत होता सनीश, ज्याचं वय आहे फक्त चार वर्षांचे. आई-वडिलांनी घराच्या आवारात अनेक पशुपक्षी पाळलेले जसे गायी, म्हशी, बकऱ्या ससे. त्यामुळे सनीशला बालपणापासूनच निसर्ग आणि प्राण्यांचं सान्निध्य लाभलेलं.

आई-बाबा शेतमळ्यात बागकाम करताना सनीश नेहमीच त्यांच्या पाळीव प्राण्यांशी खेळण्यात रमत असे. अनेकवेळा शेतमळ्यात बागकामासाठी बाहेरील मजुरांना बोलावून कामे करून घेतली जात असत. त्यातही स्त्री-मजुरांना प्राधान्य दिले जायचे, कारण स्रियांची मजुरी पुरुष्यांच्या मानाने थोडी कमीच असायची.

अशीच एक शरीराने कृष भासणारी, काळ्याकुट्ट रंगाची मजूरकर, जिचं नाव होत "सुकन्या", नेहमीच सनीशच्या बागकामांना येत असे. जन्मापासूनच सनीशला ओळखत असल्यामुळे सनीशच्या बालिश बोलण्याचा, खेळण्याचा तिला लोभ होता. दुर्दैवाने तिला मुलबाळ नव्हते. तिच्या पाठी कुटुंब असं काहीच नव्हतं. एकटीच. त्यामुळे का होईना पण सनीश बद्दल तिच्या मनात ओढ होती, आवड होती, प्रेम होते. कामावर येताना आवर्जून ती त्याच्यासाठी काहीतरी खायला आणायची. सनीशच्या आईला मात्र सुकन्याने सनीशला काहीही दिलेले आवडत नसायचे. सनीशची आई, सुकन्याचा द्वेष करायची.

कुडकुडणाऱ्या थंडीचे दिवस होते. हळद आणि चहाची पाने काढण्यासाठी सनीशच्या वडिलांनी मजुरांसाठी निरोप धाडला. दुसऱ्याच दिवशी सकाळी सुकन्या आणि तिचे साथीदार कामासाठी रुजू होणार होत्या. रात्रीचं सर्व आटोपून लवकरच ती झोपी गेली. सकाळी लवकर उठून सनीशसाठी काहीतरी खायला घेऊन जावं या विचाराने तिच्या मनात घर केलं होत शिवाय सनीशला भेटण्याची, त्याला पाहण्याची, त्याला उचलून घेण्याची तीव्र इच्छा तिच्या मनात होती.

पहाट होताच सुकन्या उठली. घाईघाईत तयारी करून सर्व साथीदारांना जमवून पायवाटेने त्या निघाल्या सनीशच्या घराकडे. पहाटेची उजेडणारी सकाळ, कडाक्याची थंडी, दाट धुके आणि पक्ष्यांची किलबिल, वातावरण खूपच मोहक होते. दात दातांवर थरथरण्याचा कडकड आवाज, बोलताना तोंडातून निघणाऱ्या वाफा, थंड पडलेल्या हाताच्या तळव्यांना हातावर घासत, त्या सगळ्याच पोहोचल्या सनीशच्या घराकडे. थंडीमुळे हात पाय फुटले होते. सफेद भासणाऱ्या ओठांवरच्या कातड्या आणि आसुसलेले गाल, चेहरा कुरूप बनवत होते. बोलतानाही आवाजात कंप होत होता. रस्त्यात सनीशला द्यावं असं काही तिला सापडलं नाही. म्हणून खेळण्यासाठी एक पानांची टोपी बनवून बरोबर घेतली.

सुकन्या आणि इतर मजूरकर घरी पोहोचले तेव्हा छोटा सनीश नुकताच झोपेतून उठून अंगणात त्याच्या आजीबरोबर शेकोटीजवळ शेकत बसला होता. छोटीशी कानटोपी, अंगात स्वेटर आणि पायात मौजे घालून सनीश आजीला बिलंगुनच बसला होता. मजूरकर स्रियांना पाहून आजीने सनीशला बाजूला बसवले आणि त्यांच्याशी बोलण्यासाठी दोन पावले पुढे आली. शेकोटीसमोर बसलेल्या सनीशला पाहून सुकन्याला मोह झाला. ती जोरात पावले टाकत सनीशला उचलून घ्यायला धावली. तिचे फाटके मळके कपडे, फुटलेले हातपाय नि ओठ आणि त्यातच तीच विद्रुप दिसणं, यांमुळे सनीशच्या आईला आधीच नापसंत असलेली सुकन्या, सनीशला उचलून घ्यायला येते हे पाहून सनीशच्या आईला खूपच राग आला. दारातूनच तिने आवाज दिला,"सनीश, जा घरात लवकर, नाहीतर मार खाशील". सुकन्याला काही तीच बोलणं समजलं नाही. तिने त्याच घाईत सनीशला दोन्ही हातांनीं उचलून छातीशी कवटाळत त्याच्या गालावर मुका घेत, सनीशला त्याच्या आईच्या हातात सोपवले.
सनीशला घेताना त्याच्या आईच्या हातांना सुकन्याच्या हातांचा हलकाच स्पर्श झाला. प्रचंड इरीशी वाटावी आणि अंगावर काटा मारावा अश्या अविर्भावात सनीशची आई चिडचिड करू लागली. हाताच्या स्पर्श्याच्या इरीशीची सनक मेंदूपर्यंत गेली आणि तिला अंगावर काटा मारताच हातातून सनीश खाली सटकला. काही कळायच्या आतच सनीश पायरीवर पडला. थंडीमुळे नरम पडलेलं कोवळं शरीर ते, पायरीच्या कोपऱ्यावर डोकं आदळताच रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. डोकं फुटून मेंदू बाहेर आला. आघात एवढा कि कुठलीही हालचाल न होता, सनीश रक्ताच्या थारोळ्यात कायमचा थंडावला.
सुकन्या सनीशकडे पाहून जोरजोरात रडू लागली. सर्व घटनास्थळी धावले. रडण्याचा एकच टाहो होऊ लागला. सनीश चे बाबा धावतच घरातून बाहेर आले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सनीशला पाहून त्यांचेही भान हरपले. काय अवस्था होत असेल त्या आई-बापाची, ज्यांना अश्या घटना डोळ्यांनी पाहाव्या लागतात? काय झालं? कसं झालं? असे अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. आणि सनीश च्या आईने द्वेषाने भरलेल्या आवाजातच सुकन्यावर आरोप लावण्यास सुरु केले. तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तिच्या अंगावर धावून येत तिला मारहाण करण्यास सुरुवात केली.
सुकन्याची तशी चूक काहीच नव्हती. पण निरागस लोभ तिच्या अंगलट आला होता. तिने सनीशला उचलून घेतले हि तिचीच चूक आहे हे तिलाही मान्य करावेच लागले. तिने स्वतःच्या चुकीची कबुलीच तशी दिली आणि संपूर्ण घटनेत पूर्ण दोषी झाली सुकन्या.
आपलं लहान बाळं सुकन्यामुळे गेलय अशी समजूत करून सनीश च्या बाबांनीही सुकन्याला मारहाण करायला सुरुवात केली. शरीराने जीर्ण झालेली सुकन्या घटनेच्या आघाताने आणि सनीशच्या घरच्यांच्या आरोपाने आधीच अर्धमेली झाली होती. बाकी मजूरकर स्रियांनी तेथून पळ काढला. सनीशच्या कुटुंबातील इतर सदस्यसुद्धा जमले. सुकन्याचे कुरूप दिसणे हे एकमेव कारण ठरले होते तिचा द्वेष करण्यासाठी. आणि हा द्वेष या घटनेमुळे इतका वाढला कि जमावाने सुकन्याला मारतच डोंगराच्या कड्यापर्यंत आणले. सुकन्या रडत होती, विव्हळत होती, हात जोडून माफी मागत होती. परंतु जमाव आता माणूस राहिला नव्हता. व्देषाच्या आगीचा लोट असाच शांत होणार नव्हता. हातात दगड घेत त्या जमावाने तिच्यावर दगडांचा मारा चालू केला. दगडांच्या माऱ्यापुढे सुकन्याचा टिकाव लागणार नव्हताच. अगदी काही वेळातच सुकन्या त्या कड्यावरून रक्तबंबाळ होऊन कोसळली.
फक्त एक लहान बाळ उचलून घेण्याची शिक्षा तिला जीव गमावून मिळाली.
पणं खरंच ती गुन्हेगार होती का?
सुकन्या रक्तबंबाळ अवस्थेतच, डोळ्यांतून अश्रू ओघळत, किंचाळत कोसळली आणि त्या डोंगरदरीच्या हिरवाईमध्ये गडप झाली.
काही क्षणाचाच तो प्रसंग, निमित्त झालं आणि दोन जीव गेले. सनीश च्या घरच्यांनी सनीशचे सर्व विधी पार पाडले. आणि सुकन्याबद्दल काहीच माहित नाही या समजुतीत ते प्रकरण पूर्णपणे विसरले.
दिवसागणिक दिवस सरले. सुकन्याच्या मागे कुणीही विचारणारे नव्हते. प्रकरण तिथेच शांत झाले.
आणि काही महिन्यानंतर सुकन्याला सर्वच जण विसरले.
आजूबाजूच्या परिसरात धरण बांधायला सुरुवात झाली होती आणि अचानकच सनीशच्या कुटुंबातील एक छोटा बालक हरवला. सनीशचे काका सर्व ठिकाणी शोधायला गेले. एक दिवस गेला, दोन दिवस गेले आणि बघता बघता एक महिना गेला. ना कोणती खबर ना कसली शंका. सनीशच्या कुटुंबावर दुसरा आघात. कुठे गेला असेल? कोणी नेला असेल? कसा असेल? कधी भेटेल? कशाचीच उत्तरे नव्हती. शेवटी प्रयत्न संपले. आणि अपेक्षाही संपली.
तोच परिसरात आणखी लहान बालके हरवण्याचा घटना घडू लागल्या. वातावरण भयग्रस्त झाले. धरणाच्या बांधकामासाठी पाण्याला बांध घालायचे काम चालू केले होते. आणि अश्यातच मोठी दुर्घटना घडली. तात्पुरता पाणी वळवण्यासाठी घातलेला मातीचा बांध फुटला आणि ५ कामगार वाहून गेले. भीतीमध्ये आणखी भर पडली. बांधकामाचे काम पुन्हा सुरु झाले. यावेळेस काहीतरी भलतच घडणार होत. काँक्रेट मिक्सर कोसळून पुन्हा २ जण दगावले. धरणाच काम पूर्ण होत नव्हतं. विघ्न एकामागून एक येतच होते. सर्वत्र चर्चा होऊ लागली आणि कुणीतरी म्हणाल बळी द्यावा लागेल. अर्थाचा अनर्थ व्हायला वेळ नाही लागला. बातमी वाऱ्यासारखी पसरली, लहान बालकांचे बळी देऊनच धरणाचे काम केले जाते.
परिसरातील ग्रामस्थांचा आक्रोश वाढला आणि त्यांनी धरणाचे काम बंद पाडले. चौकशी आयोग नेमला. सर्वतोपरी चौकशी झाली, कुठेही मानवी सांगाडे सापडले नाहीत. आणि पुन्हा एकदा धरणाचे काम चालू झाले.
आधीचा कॉन्ट्रॅक्टर ग्रामस्थांच्या भीतीने पळाला होता. नवा कॉन्ट्रॅक्टर थोडा खमक्याच होता. आढा वेढा घेऊन बोलण्याची सवय आणि परिसरातील प्रत्येक खबरीवर लक्ष ठेऊन असणारा नवा कंत्राटदार रात्री उशिरापर्यंत साईट वर खुर्ची टाकून बसायचा.
पूर्ण काळोखी अमावस्येची रात्र उजाडली. काम आटोपून घरी जायला त्याला उशीर झाला होता. दारूच्या दोन बॉटल पोटात रिचवल्यावर घरी जाण्याचे त्याला भानही उरले नाही आणि त्राणही. नशेतच बडबडत, गुणगुणत असताना त्याला नदीच्या काठावर रांगेत चालणाऱ्या अग्निज्वाळा दिसल्या. प्रथम दर्शिनी दुर्लक्ष केल्यावर पुन्हा पुन्हा तेच दृश्य पाहून त्याची नशा उतरली.
कुठलीही हालचाल न करता तो तिथेच स्तब्ध पडून राहिला. थोड्या वेळाने त्याची बायको तिथे धावतच आली. "धनी आपलं पोरगं एकटच इकडे धावत आलयं" सर्व प्रकार त्याच्या लक्ष्यात येताच त्याने "भुत भुत" करत गोंगाट भरला. बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली.
सनीश च्या घरापर्यंत बातमी पोचली होती. पणं दुःखाने भरलेलं कुटुंब अजूनही सावरलं नव्हतं.
कुटुंबातील इतर लहान मुले त्यांच्या खेळण्यात दंग होती. सनीश गेल्यापासून सनीशची आई मात्र एकटीच रहायची. घराबाहेर सुद्धा कुणालाही दिसत नसायची. सनीशच्या काकांनी सनीशच्या आई-वडिलांना हि बातमी सांगताच सनीशची आई मिश्किलशी हसली.
काय असेल तिच्या हसण्यात?
© SURYAKANT_R.J.