...

5 views

अर्धजळीत चिता
अर्धजळीत चिता





विपुल पहिल्यांदाच लांब पल्ल्याची ड्रायव्हिन्ग करणार होता. मुंबई-कोल्हापूर रस्ता तसा नेहमीच गजबजलेला. विपुलला ट्रॅफिक ची तशी काही भीती नव्हती. दुपारी जेवण आटोपून विपुलने टायरची हवा, इंजिन ऑइल, ब्रेक ऑइल. कूलण्ट वॉटर सर्व काही व्यवस्थित तपासले. कपड्यांची बॅग, पाणी आणि खाण्यासाठी सटर फटर बरोबर घेतलं. बाजूच्या सीटवर बॅग ठेवत आई-बाबांना त्याने एक हात खिडकीतून बाहेर काढत, हॉर्न वाजवून "बाय-बाय" केलं.

आई-बाबा दोघेही गेटजवळ येऊन त्याला हात दाखवत होते. मनात चिंता होतीच. "सांभाळून जा रे... गाडी हळू चालवं.... घाई करू नको.... मध्येच थांबून काही खाऊन घे..." अश्या एक ना अनेक सूचना रात्रीपासूनच वारंवार देत होते. आत्ताही हात दाखवत तेच पुन्हा पुन्हा... शेवटी आई बाबांची काळजीच ती. विपुलला मात्र असं सारखं सारखं सांगणं म्हणजे एकदमच इर्रिटेटिंग वाटायचं. "हो...हो..., नका काळजी करू, मी जाईन बरोबर, पोहोचल्यावर फोन करतो" असं सांगून विपुलने गाडीची काच वर चढवली. गाडी चालू करून हळूहळू रोडला लागला. गाडी दिसेनाशी होईतोवर आईबाबा तिथेच थांबलेले.

सीटबेल्ट लावलेलाच होता. सदाबहार गाण्यांचा आस्वाद घेत, मध्यम गतीने तो राष्ट्रीय महामार्गाला लागला. तास दीड-तासाचे अंतर कापल्यावर विपुलने गाडी रोडच्या बाजूला लावली. गाडीतून उतरून पाय थोडे मोकळे केले. धूसर, लाली पसरलेला आकाश आणि अस्ताला जाणारा सूर्य पाहून एक selfie घेतली. पुन्हा गाडीत जाऊन बसला. सीटबेल्ट लावला आणि गाण्यांमध्ये बेधुंद होऊन गाडी चालवू लागला. एव्हाना लोणावळा घाट पार केला होता.

आणखी बराच अंतर पार केल्यावर पुण्यामध्ये cng गॅस भरून, चहासाठी थोडं थांबणं झालं. आठ वाजत आले होते. कुठेतरी चांगल्या धाब्यावर थांबून जेवण करावे असा बेत आखून विपुल ने कात्रज घाट पार केला. पुढे जाऊन काही अंतरावर एका धाब्यावर जेवण आटोपले. जेवण यायला आणि जेवायला बराच उशीर झाला होता. साडे नऊ वाजून गेले होते. कोल्हापूर अजून दूरच होते. काळोख पसरला असला तरीही रस्त्यावर गाड्यांची ये-जा चांगलीच होती. प्रवासाचा आता कंटाळा आलेला. पण जेवढं थांबणार तेव्हढाच पोचायला उशीर होणार त्यामुळे संथ का होईना गाडी चालूच ठेवायची या बेताने पुढे दीड दोन तास विपुल गाडी चालवतच राहिला.

आता साताऱ्यामध्ये पोहोचला होताच, तोच त्याचा फोन खणाणला.

गाडी बाजूला थांबवून तो फोनवर बोलू लागला. "हॅल्लो, कुठवर पोचलास?" बाबा.

"आत्ता साताऱ्यामध्येच आहे, पोहोचेन हळूहळू, तुम्ही जेव्हा आणि झोपा"

"बरं तू जेवलास का?" बाबा.

"हो, जेवूनच निघालोय. चला ठेवतो."

फोन कट करून विपुल पुन्हा मार्गस्थ झाला. प्रवासाचा थकवा आणि जेवणाची सुस्ती डोळ्यांपर्यंत पोहोचली होती. साडे अकरा वाजून गेले होते. रस्त्यावरील वाहनांची वर्दळ आता तुरळक झाली होती. आत्तापर्यंत गाडीमध्ये पुढच्या आरशाला अडकवलेली बाहुली नजरेत आली नव्हती. पण आता मात्र मागून येणाऱ्या गाड्यांच्या प्रकाशाने, हवेमुळे आणि गाडीच्या हलण्याने ती बाहुली सुद्धा प्रकर्षाने नजरेत येत होती. किंबहुना विपूलच लक्ष वारंवार त्या बाहुलीकडे जात होत.

निळे डोळे, गोबरे गाल, मिश्किल हसू आणि दुमडलेले हात. खरेदी करताना खूप आवडली होती ती बाहुली, मात्र रात्रीच्या वेळेस गाड्यांच्या प्रकाशात ती भूपच भेसूर वाटायला लागली होती. मनात भीतीने घर केलं. "कसली भीती? त्या निर्जीव बाहुलीचा? छे ... छे ..., काय रे विपुल" विपुल मनातल्या मनात स्वतःशीच पुटपुटत होता. गाडीचा वेग ताशी ६० ते ७० किमी होता. आणि अचानकच गाडी रस्ता सोडत असल्यासारखं जाणवू लागलं. टायरच्या घासण्याचा आवाज येऊ लागला. गाडीला बाजूला थांबवत विपुल गाडीतून उतरला. बघतो तर गाडी पंक्चर. गाडीच्या पुढच्या बाजूला उभे राहून विपुल टायर पाहत होता. आता काय करावे? गाडीला पणं आत्ताच पंक्चर व्हायचे होते? डोक्यावर हात नेत, पाय जमिनीवर आदळत, दात ओठ खात विपुल संताप व्यक्त करत होता. गाडीच्या मागच्या बाजूला स्टेपनी होती. त्याने मागून स्टेपनी काढली. पुढच्या बाजूला येताना पुन्हा अचानक, त्याचं लक्ष समोर गेलं. काचेतून दिसणारी बाहुली मिश्किल हसत, त्याच्याकडेच पाहत होती. त्याच्या पाठीमागच्या बाजूने येणाऱ्या गाडीचा उजेड त्या बाहुलीवर पडला. काही सेकंदाचाच तो प्रसंग असेल, बाहुलीने डोळे बंद केले आणि पुन्हा उघडले.

विपुल घाबरला. भास होता का तो? गाडीच्या उजेडामुळे असेल कंदाचीत. विपुल स्टिअरिंग च्या बाजूने टायर खाली ठेवून जॅक लावण्यासाठी खाली वाकला. हळूच कोणीतरी हसल्याचा आवाज त्याच्या कानापर्यंत येऊ लागला. विपुल पुन्हा उभा राहिला. मागेपुढे वळून पाहिले पणं आसपास, दूरवर कोणीही नव्हते. त्याने दुर्लक्ष्य करून पुन्हा जॅक लावून पंक्चर झालेला टायर काढला. टायर ढकलत मागे नेतच होता, पुढून येणारी गाडी जोरात हॉर्न देत त्याच्या एकदम जवळून गेली. हवेच्या वेगाने आणि हॉर्नच्या आवाजाने अंगावर काटा आला. मनात धस्स झालं. छातीत धडधडू लागलं. डोक्याचा पारा चढला, दोन शिव्या हासडून त्याने मन मोकळं केलं.

तोवर गाडी पुढे गेली होती. रक्तदाब वाढला होता. स्टेपनी आत ठेवून गाडी चालू करू लागताच, गाडी धक्के खात बंद होत होती. इंडिकेटर प्रमाणे कूलण्ट ऑइल पाहिलं, इंजिन ऑइल पाहिलं. दोन्हींची लेव्हल कमी झाली होती. पुन्हा गाडी चालू करण्याचा प्रयत्न केला. गाडी चालू होत नव्हती. आता विपूलची चिडचिड होऊ लागलेली. डोळे बंद करून, डोक्याला हात लावून तो विचार करत होता. पुढे काय करायचं?. तोच कानात सुस्कारा सोडत, च्यु च्यु च्यु करत हसण्याचा आवाज आला.

मनातून दचकत, डोळे उघडून विपुल इकडे तिकडे पाहू लागला. दुसऱ्याच क्षणी स्मशान शांतता. पुन्हा भास असल्याची जाणीव. वेळ वाढत होती. बारा वाजले होते. निर्जन शांतता, काळोखा रस्ता, भुताटकीची बाहुली आणि बंद पडलेल्या गाडीसोबत विपुल. गाडीत एकटं बसायला त्याला भीती वाटत होती. त्याने दरवाज्या उघडला आणि बाहेर येऊन पाहू लागला. हॉर्न देत एक गाडी जोराने पुढे गेली आणि गाडीच्या उजेडात चमकली, एक वास्तू.

हृदयाचा ठोका चुकला, डोळ्यासमोर अंधारी यावी आणि डोकं बधिर व्हावं तसच काहीस. विपुलचे हात पाय थरथरू लागले.

रस्त्याच्या बाजूला स्मशानभूमीत मसणावर अर्धवट जळालेली, धुमसणारी चिता त्याला दिसली होती. थरथरतंच तो खाली बसला. चेहऱ्यावर घाम फुटला होता. डोळ्यासमोर अंधारी येऊन मेंदूवर दडपण यावे आणि डोळे दुखावेत, तसच काहीस विपुलला जाणवत होत. डोक्यावर दोन्ही हात ठेऊन, गुडघे टेकून तो खाली बसला. चर्रर्र चर्रर्र करत पावलांचा आवाज त्याच्याच दिशेने येत असल्याचे त्याला जाणवु लागले. हळूच मान फिरवत तो कानोसा घेऊ लागला. मागे कुणीही नव्हतं. पुन्हा तोच मिश्किल हसण्याचा आवाज, च्यु च्यु च्यु करत सुस्कारे सोडत चिडवण्याचा आवाज. हा भास नव्हताच. आवाज खरोखर येत होता. बसल्या जागीच दुसऱ्या दिशेने मान वाळवून पाहिले. आणि धक्काच बसला. गाडीतली बाहुली त्याच्याकडेच चालत येत होती. विपुलचे डोळे विस्फारले.

तोल जाऊन बसल्या जागीच मागच्या बाजूला तो कोसळला. एक दोन कोलांट्या मारून त्याने तिथून पळायचा प्रयत्न केला. पण पळणार कुठे? स्मशानाकडे तो आपोआपच धावु लागला. डोकं बिथरल होत. पुढे काय आहे, कुठे जातोय हे कळायच्या आतच तो त्या धुमसणाऱ्या सरणाजवळ येऊन थांबला. पुढे अर्धवट जळालेल प्रेत आणि मागे झपाटलेली बाहुली. विपुलच स्वतःवरच नियंत्रण सुटलं. घाबरलेल्या अवस्थेत त्याने बाहुलीकडे वळून पाहिलं. पूर्ण शरीर थरथरत होत. डोळ्यांतून पाणी येत होत. कंठातून आवाज फुटत नव्हता. बाहुलीने पुन्हा सुस्कारा सोडत, च्यु च्यु च्यु आवाज केला आणि मिश्कीलपणे हसली. त्या हसण्याने विपुल आणखी घाबरून मागे दोन पावले टाकतो न टाकतो तोच त्या अर्धवट जळालेल्या प्रेताने विपुलला मागून मिठी मारली आणि त्या सरणावर विपुलसकट पुन्हा झोपून घेतले. धुमसणाऱ्या चितेने आगीचे रूप घेतले आणि त्या चितेबरोबरच विपुलसुद्धा अग्निमध्ये सामावला.
© SURYAKANT_R.J.