...

3 views

सर्व्हे नंबर २५ - भाग ३
सर्व्हे नंबर २५



भाग ३



मी, सीमंतिनी आणि सिम्बा आतमध्ये गेलो. दरवाज्या लावून घेतला आणि गप्पा गोष्टी करत जेवू लागलो.

"चार्जिंग च्या लाईट्स किंवा सोलर दिवे लावून घेऊ, काळोख झाल्यावर भयाण वाटत". सीमंतिनी म्हणाली.

"हो, करूयात, सध्यातरी चार्जिंग लाईट्स लावूयात". मी म्हणालो.

"आपण कोणतीही पूजा, होम हवन, वास्तु-शांती केली नाही. करायला हवी का?" सीमंतिनी थांबून थांबून एक एक प्रश्न विचारात होती. मी मात्र त्या विडीवाल्या म्हाताऱ्याच्या विचारात होतो. सीमंतिनी मध्येच जोरजोराने बोलू लागली. "अरे मी भिंतींशी गप्पा मारायला आले का इथे? काही विचारतेय, लक्ष कुठे आहे तुझं?"

मी भानावर येत म्हणालो," अगं सॉरी, ते पूजेचं विचारलंस तर त्याच विचारात हरवलो".

कशी बशी तिची समजुत काढून जेवण आटोपलं.

चंद्राच्या उजेडाने परिसर चांदणे शिंपडल्यासारखे भासत होते. आम्ही दोघेही बाहेर गॅलरीत झोक्यावर बसलो होतो. सिम्बा समोरच पाय पसरून , पुढच्या पायावर डोकं ठेऊन, सुस्त पडून आमच्याकडे पाहत होता.

"काय रे डंबरू, मज्जा वाटली ना तुला? आपण आता नेहमी यायचं हा इकडे" सीमंतिनी सिम्बाशी लाडातच बोलायची. अगदी आपल्या लहान बाळाप्रमाणेच त्याचे सर्व लाड पुरवायची. सिम्बासुद्धा काही कमी नव्हता. रोज सकाळी लवकर उठून तिच्या अवतीभवती घुटमळत राहणार. मध्येच जवळ येऊन चेहरा चाटणार, कामाला जाताना हातातील वस्तू खेचणार, कपडे खेचणार, ती झोपली कि तो पण तिच्या बाजूला, डोक्याजवळ, पायाजवळ पडून राहणार, येता-जाता गॅलरीमध्ये आपली वाट पाहत राहणार आणि घरी पोहोचल्यावर लहान बाळासारखा आपल्याकडे झेपावणारे. त्याला जवळ घेत नाही तोवर त्याला चैनच पडणार नाही. आमच्या गप्पा चालूच होत्या. गप्पांच्या ओघात १२.३० कधी वाजले कळालेच नाही.

थंडी वाढत होती. आम्ही झोपायला गेलो. सिम्बालाही आत घेऊन दरवाज्या बंद केला. सिम्बा अजून एकच वर्षाचा होता त्यामुळे त्याला एकटं बाहेर थंडीत ठेवणं आम्हाला आवडणारही नव्हतं.

बाहेरची लाईट चालू ठेऊन इतर लाईट्स बंद केल्या आणि आम्ही झोपी गेलो.

रात्रीचे ३ वाजले असतील, बाहेर काहीतरी आवाज झाला आणि सिम्बा दचकून उठला. एक दोन वेळ भुंकल्यावर तो शांत झाला. पण त्याच्या भुंकण्याने मला जाग आली. मी हळूच दरवाज्या उघडून बाहेर आलो. बाहेर धुकं पसरलं होत. त्यामुळे दूरवर काहीस अस्पष्ट धूसर प्रकाश तेवढा दिसत होता. इकडे तिकडे नजर फिरवून पुन्हा आत जाण्यासाठी वळलो तोच कुणीतरी गार्डन च्या कोपऱ्यात बसलं असल्याचं जाणवलं. वळून त्या दिशेने दोन पावले पुढे टाकली पण तिथे काहीच नव्हतं.

आत जाऊन पुन्हा झोपी गेलो. पहाटेचा गजर लावला होता. ६.३० होताच मोबाईल च्या अलार्म ने जाग आली. दरवाज्या उघडताच गार वाऱ्याची झुळूक बाहेरच्या थंडीची जाणीव करून देत होती. दरवाज्या उघडण्याच्या आवाजाने सिम्बा पण जागा झाला. थोडे आढेवेढे आळस देत, शेपूट हलवत माझ्या मागेमागे तो पण बाहेर आला. धुक्याच्या दवबिंदूंनी पाने फुले आकसली होती. धुके सर्वत्र पसरले होते. सिम्बा जवळ आल्यावर त्याच्या गालाला गाल लावले. त्यानेही माझ्या छातीजवळ त्याचे डोके टेकवले.. त्याच्या पाठीवर थोडा वेळ हात फिरवल्यावर त्याचे लाड पूर्ण झाले. मग थोडे सूर्य-नमस्कार, वॉर्मअप करून दात घासत गार्डन मध्ये फेरफटका मारू लागलो. सीमंतिनी उठली होती. तिने थोडी लाकडे काढली आणि बाहेरच शेकोटी पेटवली.

गप्पा मारत, शेकोटीचा आनंद घेत, स्वतःच्या फार्म हाऊस चा स्वप्न अनुभवतानाचे समाधान चेहऱ्यावर झळकत होते. शांत आणि चिंतामुक्त आयुष्य जगण्यासाठी असं स्वतःच हक्काचं ठिकाण असणं खरंच गरजेचं असत. शेकोटीसमोर थोडा वेळ सरला आणि हाल्या आणि त्याची बायको दोघेही हजर झाले.

सीमंतिनीने दोघांनाही आवाज दिला. शेकोटीसमोर हात शेकवत हाली हळुवार आवाजातच सीमंतिनीसी बोलू लागली.

"मालकीण, झोप लागली का नीट?" हालीने विचारलं.

"हो गं, खूपच छान वाटलं. मस्त वातावरण आहे इथलं" सीमंतिनी उत्तरली.

हाल्याने जाऊन थोडी लाकडे आणली. आणि गार्डन मध्ये साफ-सफाई साठी तो निघून गेला. हालीसुद्धा घराच्या साफ-सफाईला लागली.

सीमंतिनी अंघोळीसाठी आत गेली. सिम्बा गार्डन मध्ये इकडे तिकडे नाक लावत फिरतच होता. मी शेकोटी सावरून उठलो आणि काल रात्री म्हातारा जिथे दिसला त्या ठिकाणी उभा राहून पाहू लागलो. सिम्बाही तिथे आला होता. नाकाने वास घेता घेता तो पायाने तिथे उकरू लागला.

"सिम्बा, गप्प बसं, का नुसता खड्डे करतोस, जा तिकडे" एका आवाजात ऐकेल तो सिम्बा कुठे, त्याच आपलं चालूच होत. नाक खुपसून वास घेणे आणि मग पायाने जमीन खरवडने. मी त्याची गम्मत पाहतच होतो, तोच त्याने एक अर्धवट जळालेली विडी शोधून काढली. त्याच्या तावडीतून काढून घेत मी हाल्याला आवाज दिला. हाल्या जवळ येताच त्याला विचारलं," काय रे, रात्री अपरात्री इथे कोण येत असत का नेहमी?"

"न्हाय शेठ" हाल्याने लगेचच मान हलवत उत्तर दिले. मी ती अर्धी जळालेली विडी त्याला दाखवत सांगू लागलो. "काल रात्री लाईट गेली होती, तेव्हा इथे एक म्हातारा नि म्हातारी बसले होते, हि बघ म्हातारा विडी ओढत होता"

हाल्या घाबरला. त्याला काय बोलावे सुचत नव्हते. तो विडीकडे पाहून गप्प उभा राहिला.
© SURYAKANT_R.J.