...

6 views

सर्व्हे नंबर २५ - भाग ७
सर्व्हे नंबर २५ - भाग ७



मन स्थिर नव्हते. आधीच हाणम्यादाच्या प्रकरणाने मन विचलित झालेले, त्यात हे खड्ड्याचे रहस्य. घरात स्वस्थ बसवत नव्हते. मी वारंवार खोलीत फेऱ्या मारत होतो. येरझाऱ्या मारता मारता खिडकीतून खड्ड्याकडे नजर लावत होतो. बाहेर थंडी खूपच वाढली होती. धुके पसरायला लागले होते. वाहनांची तुरळक आवाजाही होत होती. आणि पुन्हा कुत्र्यांच्या भुंकण्याने बाहेरील शांतता भंग होत होती. मी जसा विचारात होतो तशीच सीमंतिनीही. जेवण बनवत असली तरीही ती आज शांतच होती. कामाचा थकवा होताच. गरमा गरम जेवण आटोपून आम्ही लवकर झोपी गेलो. सिम्बासुद्धा अंगावर चादर घेऊन शांत झोपला होता. रात्रीचे १२.३० वाजले असतील, बाहेर कसलातरी पुसटसा आवाज येऊ लागला. सीमंतिनी आणि सिम्बा गाढ झोपेत होते. मला जाग अली. अंथरुणातील गर्मीतून उठून थंडीत कुडकुडत निघायचा कंटाळा आलेला. लाईट्स अचानकच गेली आणि सर्वत्र काळोख पसरला. मी चाचपडत, हळूहळू मोबाईल शोधू लागलो. कोपऱ्यात टेबल वर ठेवलेला मोबाईल घेऊन त्याची फ्लॅश चालू केली.

अंगात स्वेटर घातला होता. कानटोपी घालून, एका हातात काठी घेऊन मी दरवाज्याची कडी उघडली. हळूच दरवाज्या उघडून बाहेर आलो आणि दरवाज्या पुन्हा ओढून घेतला. मोबाईलची फ्लॅश सभोवार फिरवून त्याच्या उजेडात काही दिसतंय का पाहिलं. थंडीमुळे दात कडकडत होते. हात थरथरत होते. अंगावर शहारे येत होते. पायात चप्पल घालून मी आवाजाचा कानोसा घेत पुढे जाऊ लागलो. शांतपणे, अधून-मधून आवाज येतच होता. पणं नक्की आवाजाची दिशा समजत नव्हती. पावले संथ टाकत मी मातीच्या ढिगाऱ्यावर चढलो....