...

2 views

हळद आणि हडळ - खंड २ - भाग १३
हळद आणि हडळ - खंड २ - भाग १३



टाश्यांचा कडकडाट थांबला आणि अवंती भानावर आली. रक्ताच्या थारोळ्यात माखलेला हात वेदनेने थरथरत होता. हे कसं झालं हे तिला स्वतःलाही आठवत नव्हतं. ती धावतच घरामध्ये गेली. हळुहळु एक एक जण घरात ये जा करू लागलं होत. अवंती हात धरून खोलीत बसली होती. हातावर कापड बांधून ती वेदनेने व्याकुळ होऊन कण्हत होती. मागच्या दारातुन आत येताना रक्ताचे थेंब लादीवर सांडले होते. पाहुण्यांपैकी अवंतीच्या शेजारील मैत्रिणीचें याकडे लक्ष गेले आणि ती घाबरूनच अवंतीकडे गेली. जोरजोरानेच ती अवंतीला विचारू लागली "अवंती, काय होतंय तुला? हा रक्ताचा सडा कसला? तू अशी कण्हतेस का? बघू काय झालाय." अवंती हात दाखवायला तयार नव्हती. मैत्रिणीचा आवाज वाढत होता.

आत येणाऱ्या जाणार्यांचं ध्यान त्याकडे गेलं. तेव्हढ्यात अवंतीची आईदेखील तिथे आली. काय घडतंय काही कळायच्या आतच ती आणखी घाबरली. कालच्या प्रकाराने नुकतीच सावरलेली तिची आई पुन्हा चिंतातुर झाली. एकामागून एक वाईट घटना घडतंच होत्या. आई तिला विचारत होती. पण अवंती मात्र कण्हतच राहिली.

शेवटीं गोंगाट झाला आणि कुणीतरी अवंतीच्या बाबांना बोलावून आणले. कापलेला हात थरथरताना पाहून त्यांच्याही काळजात चर्रर्र झालं. लागलीच त्यांनी अवंतीला डॉक्टरकडे घेऊन जायची तयारी केली. मनात देवभुबाबांचं स्मरण केलं. मांडवदारात घडलेल्या प्रकाराची चर्चा होत असतानाच जेवणाची तयारी सुरु झाली. अवंती रिक्षा मध्ये बसली आणि दवाखान्यात जायला निघाली. अमृता तीच सांत्वन करून माघारी फिरली तोच, आत्तापर्यंत धैर्य राखून कण्हत बसलेली अवंती बाहेर सरसावली. अमृताचा हात हातात धरून तिला विनवु लागली. "ताई चल ना गं माझ्या सोबत, मला खुप भीती वाटते". अवंती रडवेल आवाजात बोलत होती. तिचं रडवेल नाजूक चेहरा आणि तिची एकंदर अवस्था पाहुन कुणाचं मनं पाझरलं नसत. अमृताने मान हलवली. सावली मनोमनी खुश झाली. परंतु तेवढ्यात अमृताची आजी दुरूनच आवाज देत तिथे आली. अमृता रिक्षामध्ये बसणारच होती, तेवढ्यात आजीने आवाज दिला, "थांब अमृता, कुठे चाललीस? अगं हळदीचं अंग आहे, मांडव सोडून तुला कुठेही जात येणार नाही.

"अग्ग पण आजी, अवंतीला बघ किती लागलय, तिची अवस्था बघ" अमृता म्हणाली.

"ते कायं नाय, एवढे लोक आहेत, कोणतरी जाईल सोबत, तू आत चल पहिले" आजीने आवाज चढवला तसा मांडवातील इतरही लोकांनी अमृताला घरातच थांबायला भाग पाडले.

सावलीचा राग अनावर होत होता. पावलोपावली तिची संधी हुकत होती. अवंतीचा चेहरा पडला. पण ईलाज नव्हता. रिक्षा चालू झाली. आरशातून अवंती अमृताला घरात जाताना पाहुन आणखी चिडू लागली. सावलीचं अवंतीच्या देहावर ताबा मिळवणे आणि सोडणे यांमुळे क्षणाक्षणाला तीच वागणं बदलत होत. कधी रडतं, कण्हत तर कधी किंचाळत ओरडत ती दवाखान्यात गेली.

डॉक्टरांनाही तिला तपासणे, तिच्यावर उपचार करणे कठीण झाले होते. त्यातच बराच उशीर होऊनही अवंती घरी आली नाही म्हणून घरातील सर्वांचे लक्ष तिच्या येण्याकडे लागले होते.

वेळ सरत होती. जेवणाची लगबग चालू झाली. पंगती उठु लागल्या. आजूबाजूच्या शेतात, माळरानात, दारू पिणाऱ्यांच्या पार्ट्या रंगु लागल्या. रात्रीचे दहा वाजले असतील आणि रसिकाचे हळदीला..... गाणे वाजू लागले.

वाडीतील काही हौशी म्हातारी दारूच्या नशेत नाचु लागली. लहान मुलांनी हळुहळु मांडवातील एक कोना नाचण्यासाठी अडवला. नाचगाणे पाहणाऱ्यांच्या गटात स्रिया आणि पुरुष मंडळींचे वेगवेगळे गट बनले. गोरी नवरी मांडवाखाली..... , कोंबडी पळाली....., जवा नवीन पोपट हा....., एका मागून एक जोशवर्धक गाण्यांच्या मेजवानीने परिसर दुमदुमू लागला...
© SURYAKANT_R.J.