...

3 views

विद्यावाचस्पती
आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आणि महत्वाचा असा दिवस आहे.आज मी पीएच.डी(विद्यावाचस्पती)ही मानाची पदवी मिळविली.जे माझ्या बाबांनी पाहिलेलं स्वप्न होतं आणि भूतकाळातील काही आठवणीचे तुकडे माझ्या ओंजळीत जमा झाले.माझे वडील विदर्भातील एका छोट्याश्या खेड्यातील एक पिडीत शेतकरी,ते तेव्हाचे पहिले गावातील ग्रॅज्युएट.जीवनावर प्रचंड श्रध्दा असणारी एक सामान्य व्यक्ती पण पुढील लाॅच्या शिक्षणासाठी ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठमध्ये दाखल झाले.काळ असेल १९७२ -१९७५ चा. येथूनच बाबांच पूर्ण बदलले.आपणही माणूस आहोत आणि आपणही समाजाचं काही देणं लागतो म्हणून बाबा शिक्षण मध्यावर थांबवून गावाकडे परतले ते एक नवीन विचार घेऊन.येथेच आमच्या आयुष्याचे रस्ते ठरवले गेले.त्यावेळी आमचा जन्मही झाला नव्हता.काही चांगल करायचं असेल तर आपण राजकारणात उतरलं पाहिजे असं बाबांना वाटलं आणि ते तसं घडतही होतं.बदलाची मशाल घेऊन बाबा झुगारुन काम करायला लागले.त्यांच्या आयुष्यात माझी आई आली आणि तिनेही त्यांच्या या वेडाला दुजोरा दिला.ही दोघं सतत काही तरी चांगलं करत राहायची असं मला पुढे आमच्या गावातील काही चांगल्या माणसांकडून कळले.नंतर भाऊ आणि मी त्यांच्या आयुष्यात आलो. आम्ही दोघं मोठी होतं होतो.घरात माणसांचा प्रचंड राबता असायचं.कधी नाटकाची तयारी करणारे नाटक मंडळी तर कधी रात्र रात्रभर कविताच्या मैफिली,नाटकातील संवाद,गाणी गाणारी बाबाची मित्रमंडळी.रात्रीच्या रात्री शब्दांनी बहरुन जायच्या.कसे कुणास ठाऊक पण हे सारे बदलले.काळ,परिस्थिती आणि माणसेही.बाबांची सारीच समीकरणे चुकत चालली होती.बाबांच्या चांगुलपणाचा अनेकांनी फायदा घेतला.५० एक्कर जमिनीपासुन आम्ही २०..१५..आणि पुढे ९ एक्करवर आलोत.आता बाबांनी थांबायचं ठरवलं आणि त्यांचं जग मी आणि भाऊ एवढच सिमीत करुन टाकलं.आम्ही भराभरं मोठी होऊ लागलोत.भाऊ साधा,सरळ,निरागस. मी तितकीच आगाऊ पण आम्ही दोघेही बाबाच्या जवळपासच असायचो.सतत अंगणात त्यांच्या भोवती खेळायचो.पण मी प्रचंड उपदव्यापी काही तरी राडाच करुन ठेवायचेच.त्या वेळस बाबा सतत काहीतरी लिहित असायचे.त्यातील एक वही माझ्यामुळे कशी हरवली ती माहीत नाही.बाबा ती शोधायला लागले पण ती सापडेचना याचा राग म्हणून बाबांनी पहिल्यादाच मला मारले.मी खूप लहान होते त्यामुळे मी खूप गोंधळ घालत रडायला लागले व त्यांना आर्जव करायला लागले.बाबा मी नाही घेतली ती वही पण माझ्याबरोबर बापही रडायला लागला व स्वतःशीच बोलायला लागला माझं हे अपयश कदाचित तुम्हालाही संपवेल.तेव्हा मीच माझं आयुष्य संपवतो. हे ऐकून मी घाबरले.अर्थात मी खूपच लहान होते पण बाबाला असं रडताना मी यापूर्वी कधीच पाहिले नव्हतं.त्याच्या गळ्यात पडून मी अजून रडायला लागले अन सांगायला लागले बाबा मी परत नाही लावणार तुमच्या कागदाला हात पण तुम्ही रडू नका.याचा बाबांवर काय परिणाम झाला ते कळलेच नाही पण बाबांनी त्यांनी मिळवलेली डिग्री,सर्टिफिकेट आणि ते सतत रात्र रात्र जागून लिहित असणारी सारीच कागदंपत्रे जाळून टाकली आणि एका नवीन गोष्टीला पुन्हा नव्याने हात घातला .
पण तरी चांगली कामे करणे त्यांनी सोडले नाही.शक्य होईल तितकी मदत ते गरजूंना करत असायचे.चांगले विचार हे कशानेच सपत नाही की,संपविले जातं नाही.
आता मी आणि भाऊ तरुण झालो होतो. आम्ही दोघेही शहरातल्या काॅलेजमध्ये जाऊ लागलो पण गावातील काही मुंबाजी प्रवृतीच्या माणसांना हे रुचत नव्हत पोरालं शिकतो ते ठीक पण पोरीलंही, तसं ती बाबांना समजून सांगण्यासाठी घरी येऊ लागली पण आमच्या बाबांवर यांचा परीणाम होईल ते आमचे बाबा कसले. मी शहरातल्या नवीन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.काॅलेजचा पहिलाच दिवस आणि माझ्या वर्गातला एक मुलगा मला काही तरी बोलला अर्थात तो फारच सोम्य बोलला होता पण मला आता आठवत नाही. मी दिल्या त्याच्या कानाखाली दोन लावून.कशी कुणास ठाऊक पण ही घटना मी जाण्याच्या अगोदरच आईच्या कानावर गेली.आईनं घरातच रान एकत्र केलं अन तिचा नेहमीचाच डाॅयलाॅग तिने पास केला.बापाच्याच पावलावर पाऊल टाकते कार्टी अन असंच बरचसं पण बाबा तिच्याकडे फक्त स्मित करत पाहत होते.त्यांच्यासाठी हे नेहमीचच.आई गंभीर होऊन बोलली हे असं किती दिवस चालणारं साहेब,पोरगी मोठी झाली. समाज तर वाईट आहेच उद्या त्या पोरानं इच्या चेह-यावर ॲसिडगिसीड फेकलं तं तुम्ही तिला दम भराच आज..बी.ए.चे ते तीन वर्ष संपलेत.पुढील शिक्षणाचा प्रश्न समोर आला,भाऊ आणि मी दोघातुन एकच बाहेर शिक्षणासाठी जाऊ शकत होता.भाऊने माझ्यासाठी त्याच्या पुढील शिक्षणास नकार दिला,'जेईलचं' पाठवा बाबा ती हुशार आहे.मी शेतकरी आहे तेव्हा शेती करणे हेच माझ्यासाठी उचित आणि तुम्हाला अन गावाला सोडून मी राहू शकत नाही...पुन्हा मुंबाजी प्रवृतीची माणसे आमच्या घरी आलीत कशाला पोरीलं औरंगाबादला पाठवतोस.तू एवढा हुशार होतास काय झालं तुझं? म्हणून तिचं होईल? कुठं नोकरी लागणार आहे तिलं? त्यातला एक पुन्हा पुटपुटला 'शिक्षणानं घर उध्वस्त होतात.' पण बाबा यावर एवढेच बोलले मी तिला नोकरी मिळावी म्हणून पाठवतंच नाही.शिक्षणं ही चांगला माणूस घडविण्याची प्रक्रिया आहे असं मला वाटतं.उद्या मी असेल नसेल आणि तिच्यावर एखाद वादळ कोसळलं तर या शिक्षणामुळेच ती या वादळावर मात करेल हे नक्की आणि केलच पोरीनं पळून लग्न तर बाप म्हणून ती माझी जबादारी.मी पुढील शिक्षणासाठी डाॅ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ प्रवेशले हे सर्व इज परत आठवलं.बाबांच स्वप्न मी आज पीएच.डी करुण डाॅक्टरेट ही पदवी मिळवून पूर्ण केलं आहे.मी आज गावातील त्या मुंबाजी प्रवृतीच्या माणसांना एवढेच सांगेल की,'शिक्षणामुळे घरं उध्वस्त होतं नसतात तर उभारली जातात.' याचं उदाहरणं मी आहे कारण शिक्षणामुळेच मी आज येथे आहे.शिवाय मी 'मराठा विद्या प्रसारक समाज' सारख्या नावाजलेल्या शिक्षण संस्थेत त्र्यंबकेश्वरला प्राध्यापक म्हणून काम करते कारण शिक्षण ही चांगला माणूस घडविण्याची प्रक्रिया आहे.बाबांच्या या मतावर माझाही त्यांच्याइतकाच विश्वास आहे.आपण सर्वांनी माझा आजचा दिवस अधिक सुंदर केला.माझ्यावर शुभेच्छांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव करून.मी तुम्हा सर्वांची आभारी आहे...💐💐🙏🏻🙏🏻
डाॅ. जया रमाकांत शिंदे
मराठी विभाग
कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,त्र्यंबकेश्वर.