...

2 views

सर्व्हे नंबर २५ - भाग १०
सर्व्हे नंबर २५ - भाग १०



संध्याकाळ झाली होती. गेट जवळ येताच गाडीचा हॉर्न वाजवला, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. पुन्हा दोन तीन वेळा हॉर्न वाजवला. सिम्बाचाही आवाज येत नव्हता आणि हाल्याही कुठे दिसत नव्हता. शेवटी मीच उतरून गेट उघडला. गाडी आत घेतली. सीमंतिनी घाईतच उतरली आणि सिम्बाला शोधु लागली. घरामध्ये शोधून झालं तरीही सिम्बा कुठेच दिसत नव्हता. गार्डनमध्ये शोधूनही तो सापडला नाही. मी घराच्या मागे जाऊन शोधू लागलो. अडगळीमध्ये कोपऱ्यात जाऊन सिम्बा लपून राहिला होता. खूपच भेदरलेल्या अवस्थेत, थरथरत , अंग चोरून तो आत लपला होता. मी त्याला आवाज देऊनही तो प्रतिसाद देत नव्हता. सीमंतिनीही तिथे आली. तिनेही त्याला बाहेर काढायचा प्रयत्न केला. पण तो बाहेर यायला तयारच होत नव्हता.

बऱ्याच प्रयत्नांनी अडगळ बाजूला सारून मी त्याला उचलून घेतले. त्याच्या छातीची धडधड वाढली होती. डोळ्यांतून पाणी येत होत. अंग थरथरत होत. काहीतरी घडले असावे म्हणून तो एवढा घाबरला होता. त्याच्या पाठीवर आणि डोक्यावर हात फिरवत, कुरवाळत त्याला घेऊन आत गेलो. त्याच्या अंगावर चादर टाकून त्याला जवळ ओढून घेतले.

"सीमंतिनी, जरा याला सांभाळ, मी हाल्याला शोधतो, तोच सांगेल काय झालं" मी सीमंतिनीजवळ सिम्बाला देत म्हणालो.

घर, गार्डन आणि फार्महाऊसच्या आजूबाजूचा पूर्ण परिसर शोधला तरीही हाल्या काही सापडला नाही.

काळोख वाढत होता. कदाचित घरी गेला असेल असे समजून मी हि घरात गेलो. थोडा फ्रेश होऊन खुर्चीत बसलो. सिम्बा खूपच धास्तावला होता. मी त्याला जवळ घेऊन थोपटू लागलो, तोच बाहेरून हाक दिल्याचा आवाज आला. खिडकीतून डोकावून पाहिले तेव्हा हाली आणि पाड्यावरची काही लोक हाल्याला शोधतच इकडे आली होती.

"मालक, ते अजून घरी आले नाहीत. कुठे पाठवलंत का?" हालीने विचारले.

"नाही. आम्ही आलो तेव्हा तो इथे नव्हताच. आम्ही समजलो, तो लवकर घरी गेला असेल". मी म्हणालो.

"आणि हो, आमचा सिम्बा सुद्धा खूप घाबरलाय, घराच्या मागे अडगळीत लपून बसला होता. अजूनही आवाज निघत नाही त्याचा" मी पुढे सांगितलं.

मनात शंकेची पाल चुकचुकली. मी, सीमंतिनी आणि सिम्बाला बरोबर घेतले. पाड्यावरच्या मंडळींनी सोबत कंदील आणला होता. आमच्याकडे मोबाईल होते. त्यांच्या सोबतीने पुन्हा परिसर पिंजून काढला. कुठेही ठाव लागत नव्हता. शोधता शोधता आमच्यातील काही लोक टेकडीच्या वरच्या दिशेला गेले. काही लोक रावणशेठच्या फार्म हाऊस वर जाऊन शोधू लागले.

मी सीमंतिनी आणि सिम्बा पुन्हा फार्म हाऊस कडे जायला निघालो. गेटजवळ पोहोचलो आणि सिम्बाला खाली ठेवले. सिम्बा आता थोडा ठीक झाला होता. तो गेटच्या आत यायला तयार नव्हता. मातीचा वास घेऊन तो हळूच एका झुडपाच्या दिशेने भुंकु लागला. मला आणि सीमंतिनीला शंका आली. आतून चार्जिंगची लाईट आणून एका हातात काठी घेऊन मी त्या झुडपात शोधू लागलो. झुडुपाला लागून असलेल्या गवतावर काही ओढत नेल्याच्या खुणा अस्पष्ट दिसत होत्या. गवताचं, काट्यांच झुडूप जास्तच घनदाट होत. काठीने गवत झोडपून थोडा पुढे गेलो आणि मनातली शंका खरी ठरली. मी घाबरलो. रक्ताच्या थारोळ्यात, निपचित पडलेला हाल्या, त्या झुडपामध्ये सापडला. सीमंतिनीने आरडा ओरडा करून लोकांना जमवले. झुडपातून कसबसं हाल्याला बाहेर काढलं.

चेहऱ्यावर, अंगावर मोठमोठाले ओरबाडल्याचे व्रण दिसत होते. रक्तस्राव होऊन अंग सुजल होत. पाड्यावरील लोक तातडीने त्याला हॉस्पिटलला घेऊन गेले. मी सीमंतिनी आणि सिम्बा पुरते घाबरलो होतो. पाड्यावरची लोक निघून गेली तशी फार्म हाऊसवर पूर्ण शांतता पसरली. सर्व घडामोडी भीतीदायक होत्या. संकट येतात तर चारही बाजूंनी धावून येतात आणि मग त्यातून सुटायला कोणताच मार्ग उरत नाही, तशीच अवस्था माझी झाली होती. तात्पुरता का होईना तेथून निघून जावे असा विचार करून मी सीमंतिनीला तयारी करायला सांगितली. "हातात भेटेल ते घे, बाकी नंतर बघू" असं म्हणून आम्ही लगेचच गाडीकडे निघालो. घाईघाईतच गाडी चालू करू लागलो. गाडी चालू होत नव्हती. वेळ जसजशी सारत होती, काळोख आणि धुक्याची जुगलबंदी भयानकतेला आमंत्रण देत होती. आता विजेचीही खेळ चालू झाला आणि विद्युतप्रवाह कमी झाल्याने डिम लाईट वर अंधुक आणि भयावह वातावरण तयार झाले. झाडांवरील पक्ष्यांचा किलकिलाट परिसर दुमदुमून सोडू लागला. कोल्हे-कुत्र्यांच्या ओरडण्याने अंगावर आपसूक शहरे येऊ लागले. घरात जायचीही भीती आणि बाहेर उभे राहायचीही. चालत जाणे योग्य नव्हतेच, आणि गाडी मिळणेही कठीण होते.

आत्तापर्यंत शांत झालेला सिम्बा पुन्हा विव्हळू लागला. त्याला उचलून घेऊन शांत करण्याचा प्रयत्न केला पण हाताचा चावा घेऊन तो हि गार्डन च्या दिशेने पळू लागला. पळता पळता तो पडत होता, विव्हळत होता. अंदाधुंद त्याच पळणं, वागणं पाहून आम्हालाही राहवलं नाही. सीमंतिनी त्याला पकडण्यासाठी त्या अंधुक उजेडातही धावत होती.

एकामागोमाग एक विचित्र घटना घडत होत्या आणि त्या माझ्या नियंत्रण बाहेर जात होत्या. त्या दोघांनाही थांबवण्यासाठी मी त्यांच्या मागे धावू लागलो. काही अंतर धावलो असेंन, सीमंतिनी आणि सिम्बा दृष्टिपथास येत नव्हते. आणि अचानकच लाईट गेली. सर्वत्र किर्र्रर्र काळोख. सिम्बाला पकडण्याच्या गडबडीत चार्जिंग लाईट गाडीजवळच राहिली होती.

"सीमंतिनी पुढे जाऊ नकोस, इकडे ये. परत फिर, .... सिम्बा ...... सिम्बा ..." जिवाच्या आकांताने मी ओरडू लागलो.

पण धुक्याच्या काळोख्या भयानकतेशिवाय तिथे काहीच नव्हते. कुठे गेले असतील? आवाज नाही येत, मी जागेवरच रडू लागलो. पण त्या रडण्यालाही कोणी सहानुभूती दाखवणारं नव्हतं.
© SURYAKANT_R.J.