...

33 views

विसावू या वळणावर

*विसावू या वळणावर"*

मधुसुदन साठे हाॅस्पिटलच्या स्पेशल रुममध्ये, डोळे बंद करुन पडले होते बेडवर. खूप हलकं वाटत होतं त्यांना आता... कारण नाका - तोंडातल्या नळ्या काढल्या होत्या... Intravenous drip काढली होती... औषधं - गोळ्या सगळं बंद केलं होतं डाॅक्टरांनी. ऐंशी वर्षांचे साठे अगदी पहिल्यापासूनच जाणून होते, त्यांच्या लंग्ज कॅन्सरबद्दल. त्यामुळे गेली दोन वर्ष ते ह्या आजाराशी, अगदी जाणतेपणाने लढले होते. ती सगळी सिटिंग्ज, ते सगळे पेट स्कॅन सेशन्स... अंगाचा दाह करणार्‍या, त्या सगळ्या असुरी गोळ्या... या सगळ्याला मोठ्या धिराने तोंड दिलं होतं साठेंनी. त्यामुळेच त्यांच्यापासून अजिबात न लपवता... त्यांच्या देखतच त्यांच्या मुला - सुनांना सांगितलं होतं डाॅक्टरांनी, की शेवटचे दोन - चार दिवस बस्स. त्यांना आता हवं तसं जगूद्या, हवं ते करुद्या... घरी घेऊन जायलाही परवानगी दिली होती डाॅक्टरांनी त्यांना. थोडक्यात साठेंचा क्लायमॅक्स सीन चालू झाला होता, तो ही शेवटच्या टप्प्यातला... 'दि एन्ड' चा बोर्ड लागण्याच्या, किंचीत आधीचा.

दोन्ही मुलांनी एकत्रीत रित्या विचार - विनिमय करत त्यांच्या बाबांना, त्यांच्या स्वतःच्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. दोन्ही भाऊ आॅफिसमधून सुट्टी घेऊन... बाबांसोबत रहाणार होते, त्यांचे ऊरलेले दिवस. मधुसुदन साठेंना घरी आणण्यात आलं... त्यांच्या प्रशस्त बेडरुममधील त्यांच्या आवडत्या सागवानी पलंगावर, त्यांना झोपवण्यात आलं. दोन्ही सुना आपापली बच्चे कंपनी सांभाळून, येऊन - जाऊन असणार होत्या. दादरच्या हिंदू काॅलनीतील साठेंच्या त्या चार खोल्यांच्या प्रशस्त घरात, जागा कमी पडण्याचा प्रश्नच नव्हता. आणि मुख्य म्हणजे साठेंच्या दोन्ही मुला - सुनांच्या मनात, अगदी ऐसपैस जागा होती... त्यामुळे भौतिक जागेची अडचण जरी असती, तरी ती प्रेमाने निभावून नेण्यात आली...