...

1 views

चिं.त्र्यं.खानोलकर

मी २००६ ला डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठमध्ये दाखल झाले. अर्थातच ते सारं जग नवं,सुंदर आणि लोभस असं होतं.आम्ही सर्व विद्यार्थी फडके आणि खांडेकर यांच्या कथा, कादंबऱ्यांमध्ये अगदी बुडून जायचो पण बडवे सरांनी चिं.त्र्यं. खानोलकर म्हणजेच आरती प्रभू यांची पहिल्यांदाच आम्हाला ओळख करून दिली.बडवे सरांचा तो आवडता कवी,पुढे आमचाही तो आवडता कवी कधी झाला हे कळलेच नाही.सर अनेकदा त्यांच्या कवितेचा संदर्भ देत असायचे आणि बघता बघता आम्हीही या कवीच्या,लेखकाच्या प्रेमातच पडलो.चिं.त्र्यं खानोलकरांच्या कोंडुरा,रात्र काळी घागर काळी,या कादंबऱ्या वाचल्या की त्यांचं गूढ अस्तित्व सतत जाणवत राहते.त्यातून खानोलकरांच्या कथाही वगळता येत नाही. त्यांची कथा- कादंबरी वाचत असताना त्यातून व्यक्त होणारा दुःखाचा स्वर आपल्या मनात सतत रेंगाळत राहतो आणि तो सतत कवितेतही जाणवत राहतो.त्यांची रात्र काळी घागर काळी ही माझी आवडती कादंबरी.मी तेव्हा अक्षरशः दहा वेळा वाचली आणि प्रत्येक वेळी मी ती बडवे सरांकडून समजून घेत राहीली पण मला ती कळायचीच नाही.आता एक लक्षात येतं की 'रात्र काळी घागर काळी'मधील लक्ष्मी शेवटी घरातून बाहेर पडते पण तिच्या डोळ्यात एक अपार एकाकीपणा भरून उरलेला जाणवत राहतो.आपल्या अपार एकटेपणासह बकुळ आणि सदूच्या अस्ती बरोबर घेऊन लक्ष्मी शून्य मनाने एक अज्ञात वाट चालू लागते.ही कादंबरी वाचत असताना अनेकदा वाटत राहते मुद्दामहुन चिं.त्र्यं.खानोलकर लक्ष्मीवर ही वेळ आणतात.तिला मूक्तपणे फुलताच येत नाही. खांनोलकरांनी खरंच लक्ष्मीवर अन्याय केला आहे असं मला सतत वाटत राहते.मला लक्ष्मी पासून वेगळं होताच येत नाही तेव्हा आणि आजही.खानोलकर लेखक म्हणून सतत आपल्या शब्दांशी,आपल्या साहित्याशी, त्यातल्या त्यात आपल्या कवितेशी कायम इमान राखत आले,चिंत्र्यं तथा आरती प्रभुची कविता म्हणजे वेदनेची चिरंतन जाणीव.म्हणूनच त्यांचं जीवन आणि साहित्य कायम गूढ राहिलं. २६ एप्रिल १९७६ या दिवशी हा शब्दप्रभू कायमचा विसावला.त्यावेळी त्यांचे अखेरचे शब्द होते.
"अखेरच्या या वळणावर यावा
मंद सुगंधी असा फुलोरा
थकले पाऊल सहज उठावे
आणि सरावा प्रवास सारा."
आरती प्रभूचा आज स्मृती दिवस म्हणून त्यांच्या स्मृतीला हे शब्दसुमने अर्पण......एक रसिक प्रेमी वाचक -प्रा.जया शिंदे.