...

6 views

सर्व्हे नंबर २५ - भाग २
सर्व्हे नंबर २५



भाग २



मी आणि सीमंतिनी शांत बसलो. मनात विचार येऊ लागले, एकट्याने कधी राहावं लागलं तर? सीमंतिनी गप्पच होती. आम्ही घरी आलो. चहा पिता पिता सीमंतिनीने पुन्हा विषयाला हात घातला. "काय वाटतंय तुला?, ते जर समाधी काढत असतील तर घ्यायची का?"

"हम्म, मला पण तेच समजत नाहीये, काय करायचं? मनात भीती राहिली तर उगाचच संदर्भ जोडत बसणार आणि काहीही घडलं कि तीच भीती मनात घर करणार." मी निःश्वास टाकत बोललो.

"तसं काही नसतं रे, लोक स्मशानभुमी जवळ बिल्डिंग बांधून राहतात. गुप्ताला सांग, ते व्यवस्थित काढा मगच डील करू". सीमंतिनी आत्मविश्वासाने बोलली.

मी गुप्ताला फोन करून लगेच कळवले. दोन दिवसात व्यवहार ठरवला. जागेच्या नव्या मालकाने दुसऱ्याच दिवशी समाधी इतर ठिकाणी हलवली. रविवारी मी आणि सीमंतिनी पुन्हा जागा पाहायला गेलो. बुल्डोजर ने लेव्हलिंग करून गवतसुद्धा पाडले होते. त्यामुळे जागा आता मोठी आणि मोकळी वाटत होती. आम्ही दोघेही खुश झालो. काही दिवसातच जागेचा व्यवहार पूर्ण करून जागा ताब्यात घेतली आणि इतर मोकळ्या बाजूंनी तारेचे कुंपण घातले. काही दिवसांची सुट्टी घेऊन नर्सरीतुन झाडे मागवली. चाफा, मधुमालती, कांचन, रातराणी, सोनचाफा, गुलमोहर, कृष्णवेल, अशी झाडे वेली कुंपणाच्या बाजूने लावून आतील भागात नारळ, आंबा, चिकू, फणस, सीताफळ, पेरू, जांभूळ अशी झाडे लावली. जागेला लागून एक नैसर्गिक तलाव असल्याने पाण्याची कमतरता नव्हती. बाजूच्या आदिवासी पाड्यातील एक जोडपं देखरेखीसाठी कामावर ठेवलं. एका बाजूला २ खोल्यांचं छोटसं घर बांधून घेतलं. बघता बघता ३ महिन्यांत "स्वनातलं घर" तयार...