...

5 views

फुलचोर...
तिला कुठेही फुले दिसली की ती गुपचूप पणे घेऊन येण्याच्या सवयी मुळेच बहुधा तिला हे नाव पडले असावे.
लहानपणापासूनच तिला फुलांची इतकी आवड होती की रोज केसात फुल माळल्या शिवाय ती शाळेत जायचीच नाही .तिच्या ह्या फुलांबद्दलच्या ओढीमुळेच तिची पणजी तिला " फुलाबाई" म्हणायची.
तिच्या आजीला आणि आईला देखील फुलं झाडांची आवड असल्याने तिच्या अंगणात अनेक प्रकरची फळझाडे , फुलझाडे होती. फिकट गुलाबी छटा असलेली लिली , टपोरी , मोठ्या पाकळ्यांची गुलाबं , भरगच्च पाकळ्यांची लाल गुलाबी दोन प्रकारची जास्वंद , धुंद करणारा हिरवा चाफा आणि प्राजक्ताच्या झाडाखाली बसून उबदार उन्हं अंगावर घेणं तर तिचा आवडता छंद होता . घरसमोरच्या चांदणीच्या झाडावर तर तासन- तास बसून राहायला तिला खूप आवडायचं.
बहुतेक हे फुलांबद्दलच वेड वारसागतच तिच्याकडे आल असावं . तिच्या ह्या फुलांच्या वेडामुळे ती नातेवाईकात भलतीच प्रसिध्द होती. फुले तोडण्याच्या नादात कित्यांदा तिला ओरडा ही बसला होता कधी फुल मालकांचा तर कधी आईचा . अनेकदा तर तिला दुखापत ही झाली होती.
तिच्या अंगणात तऱ्हतर्‍हेची फुलझाडे असल्याने शाळेत जाताना तिला केसात माळायला एक तरी फूल हवे असायचे. कधी अंगणातल्या झाडांना फुले नसतील तर तिच्या आजोबांना गजरे वाल्याकडून तिला गजरा आणावा लागायचा.
रस्त्यावरून जाताना कोठेही तिला फुलं किंवा फुलझाडे दिसली की ती मंत्रमुग्ध होऊन त्यांच्याकडे बघतच रहायची. त्यांचा रंग , त्यांचा सुवास तिला वेडावून टाकायचा. जणू त्या फुलांशी तिच अनामिक नातं होत. तिच लहानपणापासूनच एक मोठं मजेशीर स्वप्न होत की , एका खूप मोठ्या फुलांच्या मळ्यात तिच छोटस घर असावं ज्यातून पहावं तिकडे फुलच- फुल नजरेस पडतील.
मग त्या मळ्यातील फुल किती प्रकारची असतील , कोणत्या रंगाची असतील ह्या कल्पनेतच तिचे दिवसातील कित्येक तास निघून जायचे .
जसा जसा काळ पुढे सरकत गेला तशी तशी ती मोठी होत गेली . उच्च शिक्षणासाठी तिला तिच फुलझाडांनी नटलेलं घर सोडून बाहेरगावी जाव लागलं.तिची केसात फुल माळायची आवड ही आता कमी झाली होती आणि फुलांसोबतच्या मैत्रीची जागाही आता तिच्या नवनवीन मित्रमैत्रिणींनी घेतली होती .
मात्र अजूनही फुलांबद्दल असलेली तिची ओढ आणि वेड मात्र कायम जसच्या तसच आहे.
© सावी