...

102 views

पाऊस
मला अजून ही नाही कळालं की अस का व्हावं माझ्याकडून.. नेमकं ज्या व्यक्तीशी खूप बोलावसं वाटत तिच्याच समोर आपण मुके का होऊन जातो. हे मुकेपणाचं ढोंग असत कि आजार.. कि आज हि तसंच होतंय जसं पहिल्या वेळेला तिला पाहिल्यावर झालं होत..

आणि आठवल्या त्या मैफिली..

आम्ही सगळे मित्र कॉलेज कॅम्पस मध्ये कविता करण्यात फेमस होतो.. अर्थात त्या वेळेचं गॅदरिंग काव्यमय करण्यात आमचाच हात होता.. कट्ट्यावर बसलो कि चालू व्हायच्या त्या मैफिली.. ऐन पावसाळ्याचे ते दिवस. त्यादिवशीच अशीच चारोळी ऐकवत होतो..

"प्रेमाच्या त्या ढगांनी..
आज तुझ्यावरच बरसावं.."

पुढे काही सुचेनासच झालं.. समोर दिसणार ती फक्त स्पष्ट दिसत होती.. अचानक आलेल्या पावसाने डोक्यावर रुमाल घेऊन धावत आडोसा शोधणारी तीच दिसत होती.. मी भारावून गेलो होतो.. सगळीकडे जणू धुकं आणि आम्ही दोघेच त्या थेंबांचा आस्वाद घेतोय असं वाटत होत.. अचानक मित्राच्या हाकेने भानावर आलो.. " अरे ऐकवतोय ना पुढे..?"

मग जे आपसूक निघालं ते तिच्याकडे पाहूनच..

"प्रेमाच्या त्या ढगांनी..
आज तुझ्यावरच बरसावं..
आणि त्याचवेळी मी नेमकं..
तुझ्यासोबत भिजावं.."

बाजूने टाळ्यांचा आणि वरून ढगांचा गडगडाट एकाचवेळी झाला.. सगळे आता मोठा पाऊस येणार यावर चर्चा करयाला लागले.. माझं मन मात्र बेभान सुटलेल्या वाऱ्यासोबत तिच्याकडेच जात होत.. कोण होती ती.. ? कोणाला विचारावं तर ती चर्चा धो धो पावसाप्रमाणे पूर्ण कॉलेजभर झाली असती.. कोण असेल ती हा प्रश्न उत्तराशिवाय मनातच राहिला.. त्यानंतर पावसाळा आणि चारोळी चालूच राहिल्या..

#ekathangmann ©सागर_एक अथांग मनं