...

1 views

सत्व परीक्षा
                   भाग    १
        अनिकेत आज मुलगी बघायला चालला होता. अनिकेत त्याच्या मावशी कडे राहत होता. अनिकेत सरमळकर मुळचा कोकणातला पण कामानिमित्त तो मुंबईत आला होता. मुंबई त्याला नविनच होती. म्हणून तो मावशी कडे राहत होता. मावशी चे चाळीतले  दोन खोल्यांचे घर होते. मावशी ला दोन मुले होती.दोन्ही मुलगे होते. मोठा मुलगा अनय ८ वीला होता.धाकटा मुलगा विनय ५  वीला होता. दोघांचा पण अनिकेत दादा खूप लाडका होता. मावशी चे मिस्टर पण खूप  चांगले होते. त्यांनी कधीच अनिकेत ला परकेपणा नाही दाखवला. अनिकेतचा स्वभाव पण खूप चांगला होता. मावशीचे घर जरी लहान असले तरी मन मात्र मोठे होते. अनिकेत वर माळ्यावर झोपत असे.
      अनिकेत अभ्यासात खूप हुशार होता. त्याने शिक्षण पण चांगले घेतले होते. त्यामुळे त्याला मोठ्या  पगाराची चांगली नोकरी लागली होती. नोकरीत तो स्थिरस्थावर झाला होता. म्हणून घरचे आता त्याच्या लग्नाच्या पाठी लागले होते. म्हणून मुलगी बघायचा कार्यक्रम ठेवला होता. अनिकेत ने हे सगळे कसं जमवून आणलं होतं ते त्याला च माहीत. त्याच्या घरच्यांना वाटत होते की हे स्थळ आलं आहे पण अनिकेत ने हे सगळं जमवून आणलं होतं.
                   अनिकेत दिसायला अगदी राजबिंडा होता. व्यायामाची त्याला पहिल्या पासूनच आवड होती.  २७ वर्षाचा,घारे डोळे, सरळ नाक, पिंगट कुरळे केस, गोरा पान अनिकेत आज तर खूपच  छान दिसत होता. बेबी पिंक कलरचा शर्ट आणि ब्लॅक कलरची ट्राऊझर  त्याला खूप छान दिसत होती. तो त्याची आई, वडील, मावशी ,मावशीचे मिस्टर, असे मुलगी बघायला आले होते. अनिकेत ची मावशी घाटकोपर ला राहत होती. ज्या मुलीला अनिकेत पहायला चालला होता, ती विक्रोळी ला राहत होती. मुलीच्या घरी ते पोहचले दोन खोल्यांचे छोटेसे घर होते. मुलीचे नाव रुचिरा पावसकर होते. तिला एक लहान भाऊ होता. त्याचे नाव राज होते. ती तिचे आई वडील आणि लहान भाऊ असे चौकोनी कुटुंब होते.
               तीनेपण चांगले शिक्षण घेतले होते. तिला पण चांगल्या  पगाराची नोकरी होती. नेहमी असतो तसा कांदे पोह्यांचा कार्यक्रम होता.  सगळेजण स्थिरस्थावर झाल्यावर मुलीला बोलावले. सगळ्यांच्या नजरा आता तिच्या कडे लागल्या होत्या. रुचिरा चहा चा ट्रे सांभाळत बाहेर आली. सगळे तिला बघत च बसले. रुचिरा होतीच तशी खूप  सुंदर  .  २२  वर्षांची,गोल चेहरा, तरतरीत नाक, सरळ आणि लांब सडक काळेभोर केस, गोरा पान रंग, हिरव्या रंगाची काठ पदराची साडी ती नेसली होती.  गर्द हिरवा रंग तिच्या गोऱ्या कांती वर खूप च खुलून दिसत होता.  अनिकेत पण तीला बघत च बसला. रुचिरा ने सगळ्यांना चहा दिला.

                तिच्या आईने तिला समोर खुर्ची वर बसायला सांगितले. तिची आई तिला सोबत म्हणून  तिच्या बाजूला उभी राहिली. तिला खूप  ऑकवर्ड वाटत होते. कारण सगळे तिच्या कडेच बघत होते.  तिच्या बाबांनी ओळख करून दिली. "ही आमची रुचिरा"रुचिरा चे बाबा म्हणाले.
रुचिरा खाली मान घालून बसली होती. कारण दोन खोल्यांचे छोटेसे चाळीतले घर. त्यामुळे तिला कळेना नेमके कुठे बघावे कारण सगळे तिच्या कडेच बघत होते. 
         अनिकेत चे काका म्हणजे मावशीचे मिस्टर  सगळ्यांना उद्देशून म्हणाले, " हा आमचा अनिकेत. "
रुचिरा ने हळूच अनिकेत कडे बघितले. " अनिकेत पण हॅन्डसम दिसत होता. अनिकेत च्या मावशी ने मग तिला प्रश्न विचारायला सुरूवात केली.
अनिकेत ची मावशी, " जेवण करता येते का तुला? "
रुचिरा, " हो,  येते. "
असेच काही जुजबी प्रश्न विचारले."  अनिकेत तुला काही प्रश्न विचारायचे आहेत का❓मावशीने त्याला विचारले.
अनिकेत चे त्याच्या आई पेक्षा जास्त मावशी बरोबर जमायचे. पण सगळ्या समोर काय प्रश्न विचारायचे तेच त्याला कळेना. कारण  काकांच्या मित्राने ज्याने हे स्थळ सांगितले होते त्यांनी रुचिरा बद्दलची सगळी माहिती आधी च दिली होती. 
               मग मावशी चे मिस्टर सगळ्यांना उद्देशून म्हणाले की, त्यांना काही एकांतात बोलायचे असेल तर बोलू द्या. पण एकांत द्यायला पण जागा नव्हती. त्यामुळे मग सगळे थोडावेळ बाहेर थांबले. आता अनिकेत आणि रुचिरा दोघेच होते त्या खोलीत. सगळे जरी बाहेर असले तरी दोघांवरही एक प्रकारचे दडपण होते.  अशा परिस्थितीत काय बोलायचे त्याला सुचेना कारण त्याची ही पहिलीच वेळ होती मुलगी बघण्याची आणि रुचिरा ची पण पहिलीच वेळ होती दाखवण्याच्या कार्यक्रमाची.
           त्याने फक्त तिला एवढेच विचारले की," तुमच्या वर कोणाचा कसलाही दबाव नाही आहे ना लग्न करण्या साठी. "
रुचिरा, " नाही माझ्यावर कोणाचाच दबाव नाही .  पण तुम्ही हा प्रश्न विचारला ते आवडले मला. माझ्या मताला तुम्ही प्राधान्य दिलं ते आवडले. "
तो फक्त तिच्याकडे बघून हसला. तुम्हाला मला काही विचारायचे आहे का?
रुचिरा, " तुमच्या वर कसला दबाव नाही ना ह्या लग्नासाठी.?
अनिकेत, " नाही. आणखी काही  विचारायचे आहे का तुम्हाला?
रुचिरा, " तुमची सगळी माहिती आधी च दिली आहे. "
अनिकेत, " मावशीला आवाज देऊ का? फार वेळ त्यांना असं ताटकळत ठेवणं बरोबर वाटत नाही. "
खूप काळजी करणारा वाटतो आहे. रुचिरा ने  मनामध्ये नोंद केली.
    मावशी आणि बाकी सगळे आत आले . मावशी चे मिस्टर मग म्हणाले, " तुमचा काय निर्णय असेल तो नंतर फोन करून कळवा. " रुचिरा च्या बाबांना पण काकांचे म्हणणे पटले. शेवटी लग्न म्हणजे आयुष्याचा प्रश्न आहे. इतक्या लगेच कसा निर्णय घेणार. घरी जाऊन सगळ्यांचे मत विचारुन मग काय तो निर्णय घ्यावा असे काकांचे मत होते. त्यांनाही रुचिरा चे मत जाणून घ्यायचे होते. 
        आम्ही येऊ का आता?  असे म्हणून सर्व जायला निघाले. रुचिरा चे बाबा त्यांना सोडायला गेले.



रुचिरा होकार देईल का? बघुया पुढच्या भागात.