...

6 views

सर्व्हे नंबर 25 - भाग 5
सर्व्हे नंबर 25 - भाग 5



पायवाटेने निघालेला हाल्या आधीच घरी पोहोचला होता. आम्ही पाड्यावर पोहोचलो. रिकाम्या हाताने जाणे आवडणार नव्हते म्हणून पाड्याच्या सुरुवातीला असलेल्या छोट्याश्या टपरीतून "पार्ले जी" बिस्कीट घेतले. हाल्याच्या दारात गाडी उभी राहताच लगेचच आजूबाजूचे लोक अवती भोवती जमा झाले. एव्हाना हालीला भुत दिसल्याची खबर सर्वदुर पसरली होती. मी आणि सीमंतीनी गाडीतून उतरलो. सिम्बाला गाडीत ठेऊन दरवाज्या बंद करणार होतो पणं तो ही मस्ती करू लागला. नाईलाजाने त्यालाही बरोबर घेतले. पाड्यावरची पोर त्याला पाहून कोल्हाकुत्रा आणलाय असं त्यांच्यातच बडबडू लागले. मी सिम्बाला सावरत हालीच्या घराबाहेर थांबलो. सीमंतीनी दाराबाहेर उभी होती. हाली दरवाज्यात येऊन बसली.

बिस्कीट तिला देत सीमंतीनी विचारू लागली, "काय होतंय हाली, का उगाच घाबरतेस?"

"मला भीती वाटते, ते दोघ मला बघत असतात" हाली म्हणाली. दोघींचे बोलणे चालू होते. मी हाल्याला बाजूला बोलावले.

"हाल्या मला सांग, नक्की काय होतंय?" मी विचारले.

हाल्याने मला पाड्यावरच्या देवज्याबा कडे नेले.

देवज्याबा म्हणजे पाड्यावरील सर्वात वयस्क व्यक्ती. जेमतेम 90 वर्षांचा म्हातारा. सफेद धूसर आत गेलेले डोळे, गाल बसलेले, केस पांढरे विरळ झालेले. ओबड धोबड सफेद दाढी आणि काळी त्वचा.

सफेद मळकी बनियान घालून, लाकडी बाजेवर ते पहुडले होते.

आम्ही आत गेलो तेव्हा ते माझ्याकडे पाहू लागले. हाल्या देवज्याबा जवळ जाऊन सांगू लागला. "रावणशेठ च्या बंगल्यामागे यांनी बंगला बांधलाय ते तुम्हाला भेटायला आलेत. हाली घाबरले, तिला बघाला आले व्हते".

देवज्या बा ने थरथरतच दोन्ही हात जोडून मला नमस्कार केला. मीसुद्धा छातीला हात टेकवून, मान झुकवून त्यांचं अभिवादन स्वीकारलं. देवज्याबांच्या घश्यातून आवाज स्पष्ट निघत नव्हता. बसलेल्या आवाजातच ते सांगू लागले.

आमच्या बाबांनी सांगितलेल्या गोष्टी आहेत. ते लहान असताना त्यांनी सुद्धा त्या म्हातारा आणि म्हातारीला पाहिलं होत. आतापर्यंत खूप लोकांना दिसलेत. इंग्रजानीं इकडची गावच्या गावं लुटली होती. घरदारं जाळून, लुटीचा माल ते घेऊन चालले होते. आमच्या गनिमांना कळताच त्वेषाने ते पेटून उठले. आजूबाजूच्या गावातल्या पोरांनी छुप्या धाडी टाकून त्यांना खिळवत ठेवले. एक एक करून इंग्रजांची टोळी रात्रभरात संपवली. लुटीचा माल थोडा थोडका नव्हता. लुटलेल्या गावांना माल परत करण्याचं ठरलेलं पणं त्यातही काही चोर होतेच. शिवाय इंग्रजांना कळायच्या आतच मालाची विल्हेवाट लावायची होती.

गनिमांनी प्रत्येक गावासाठी वेगवेगळ्या तुकड्या बनवल्या. जेवढं वाटता येईल तेवढं वाटून टाकलं. अजूनही काही सामान वाटायचा होता. इंग्रज मागावर होते. त्यामुळे सामान सांभाळायची जबाबदारी आपल्या पाड्याचा म्होरक्या हाणम्यादाला सोपवली.

हाणम्यादा याच पाड्यावर राहायचा. बलदंड शरीर आणि 10 हत्तीचं बळ असलेला हाणम्यादा, दहा जणांना भारी. दरारा असा कि समोरचा सेनापती बी चरकल. हाणम्या दा नी जबाबदारी संभाळली. माल कुठंतरी लपवला. इंग्रज शोधत शोधत आले. कोणतरी फुटला. हाणम्यादा ला लय तरास दिला पणं तो लवला न्हाई. असं म्हणत्यात इंग्रजांनी हानाम्यादा ला मारून त्या टेकडावर टाकलं. कोण म्हणत फितूरांनी हाणम्यादा चा काटा काढला. कोण म्हणत हाणम्यादा ने माल टेकडीवर लपवला आणि अजुनपण त्याच रक्षण करतोय. खरं काय नी खोटं काय, कुणास ठावं. पणं हाणम्यादा नी ताई दिसतात काय काय लोकांना.

कधीही न वाचलेला इतिहास ऐकून अंगाचा थरकाप उडाला. अश्या किती घटना असतील ज्यांपासून आजची पिढी अनभिज्ञ् असेल. काय झालं असेल हाणम्यादा च? ते दोघे अजूनही का दिसतात लोकांना? अनेक प्रश्न डोक्यात गदारोळ माजवत होते. सिम्बा कंटाळला होता. तो मस्ती करू लागला. सीमंतीनी सुद्धा आम्हाला शोधतच तेथे आली. "अरे जायचं नाही का? कधीपासून शोधते तुम्हाला? इकडे का आलात?" सीमांतीनिने विचारलं.

"आम्ही हालीबद्दल बोलत होतो, ते सांगतात कि त्यांच्या बाबांच्याही लहानपणापासून तिकडे असं काही दिसत अश्या चर्चा आहेत" मी म्हणालो.

"बरं ते जाऊदे, अश्या आख्यायिका सर्वच गावात असतात, चला आपल्याला उशीर होतोय" सीमंतीनी फार्म हाऊस वर जाण्यासाठी घाई करू लागली. देवाज्याबांचा निरोप घेऊन आम्ही निघालो. माझ्या डोक्यात तो काळ आपसूकच आकार घेऊ लागला. ही खरी घटना असेल का? याचा कुठे काही संदर्भ का नाही सापडत? मी पाहिलेलं जोडपं हाणम्यादा नी ताई होतं कि आणखी कोणी? देवाज्याबा ने केलेले वर्णन तरी तसेच वाटत होते. फार्म हाऊस चा गेट जवळ आला तसा मी गाडीतून उतरलो. गेट उघडला आणि गाडी हळू हळू आत घेतली.
© SURYAKANT_R.J.