चिमणी
अनेक घटनांनी माणूस घडत जातो...बदलत जातो...माझ्या बालपणाचा काळ फार समृद्ध होता.येथेच्छ फिरायचं, बागडायचं, चिमण्यांना पकडण्याचा प्रयत्न करायचा. झाडावर चढून खाली उड्या मारायच्या. खराटी(आमच्या वावरातील छोटा पाणी वाहत ठेवणारा नाला)मधल्या वाळूत झिरा बनवायचो त्या झि-यातले पाणी प्यायचे. खूप झाड लावायची, काही झाडे इतरांना वाटायची.चिमण्यांना पकडून पिवळा रंग द्यायचा.कारण त्यावेळी आम्हाला सांगितले होते की तुम्ही चिमणी पकडली किंवा तिला माणसाने हात लावला. तर दुसऱ्या चिमण्या तिला चोची मारून, मारून टाकतात.काय तर चिमणी ही बामणीनं आहे आणि दुसऱ्या चिमण्या तिला पुन्हा स्वीकारत नाही. माहीत नाही पण ही गोष्ट त्यावेळेस आम्हाला पडताळून पहाविशी वाटायची आणि मग आम्ही दुपारच्या वेळेला भरपूर दाणे टाकून, टोपली लावून,चिमण्या पकडण्याचा उद्योग करायचो. चिमणी पकडली गेली की आम्ही तिला हळदीचे पाणी करुण त्या पाण्यात बुडवायचो व ती चिमणी सोडून द्यायचो पण आम्ही त्या चिमणीला मेलेले पाहिलं नाही. नंतर लक्षात आले की ह्या माणसाच्या मनातल्या गोष्टी तर नाहीत ना,असतीलही कारण जातीयतेचं विश वृत्तपत्रातील बातम्यांमध्ये दिसते.आज काळ खूप बदलला नंतर आमच्या नागराज मंजुळे काका यांनी एका चित्रपटामध्ये काळी चिमणी शोधणारा नायक दाखविला होता.काळी चिमणी कशासाठी हे तुम्हालाही माहीत आहे. त्यानंतर आमचा असाच एक मित्र तोही गोगाबाबाच्या टेकडीवरून लेण्यापर्यंत. सतत भटकंती करायचा.सतत काहीतरी शोधत असायचा.आमच्यातले काही जण त्याला विनोदाने म्हणायचे, 'घावली का रे, काळी चिमणी' अर्थात हा संदर्भ वेगळा... मध्यंतरीच्या काळामध्ये मी एका सुखवस्तू कुटुंबामध्ये गेली. त्या सुखवस्तू कुटुंबामध्ये छोटी छोटी बालके होती पहिलीपर्यंतची. माझी आई ही बालके खेळायला घेऊन जात असे.तेथेच वाचमनचीही ऐक दोन चिमुरडी खेळायची आईं त्यांनाही खेळवायची छान छान गोष्टी सांगायची.आमची आई गोष्टी फार रंगवून सांगते आणि ती बालकेही यात रंगून जायची पण आईच्या सोबत असलेल्या छोटीला मात्र हे काही आवडायचे नाही. ती आईला म्हणायची आजी त्यांना नको खेळवू,ती घाण आहेत.आईला ही गोष्ट मात्र अस्वस्थ करायची.ही घाण कोणी हिच्या मनात टाकली असेल हे मात्र कळले नाही . चिमणीला खरंच दुस-या चिमण्या मारतात का? म्हणून हळदीच्या पाण्यामध्ये बुडवून चिमण्या सोडणारी आम्ही निरागस बालकं...आणि आई सोबत असणारी ती निरागसं बालकं..गोगाबाबाच्या टेकडीवर चिमणी शोधणारा आमचा तो वेडा मित्र.अशा कितीतरी घटना आज आठवत होत्या का, कोण जाणे...
भद्रकाली@
भद्रकाली@