...

1 views

पाकडांची बरणी
पाकडांची बरणी

मी आनी पप्या
मिशन पाकड
माझ्या हातात मोठ्ठा ताकला
पप्या बरणीच्या झाकणाची चौकट मोजताना म्हणाला
"या बरणीत श्वास घेता येईल का ?"
मी मात्र झोडपत राहिलो
दगडीफुलातून आयुष्य चुंबणाऱ्या पाकडास
या फुलावरून दुसऱ्या फुलावर
बसणारा पाकड बघतला
की ताकला आभाळात तलवारी सारखा भिरकवायचो
ताकल्याच्या धक्क्यानेच
पाकड कोसळायचा हिरव्यागार गवतावर
पाकडाच्या पंखांना इजा होऊ नये म्हणून
पप्या हळुवारपणे पकडून टाकायचा बरणीत
पाकडांनी बरणी भरली
की निसाटलेली चड्डी करगोट्यात गुंडलून
धारायचो घरची वाट
घराच्या उंबऱ्यावर आलो
तेव्हा बाप वट्याच्या भिंतीला टेकून
दारूसाठी पैसं नाय मिलाल म्हणून भांडत होता..
आय चुलीजवळूनच वरडली
" या घरात मला मोकला स्वास घेता येत नाय "
मी हातातल्या बरणीकडं बघत राहिलो
तर बोटं पिवळी झाली होती
पाकडांच्या पंखांच्या रंगात
मला आय दिसत होती....