...

5 views

इतिश्री

आजकाल मन कधी कधी फितूर होतं
मेंदू एकदम दक्ष ... शहाणा... मला देतो कानमंत्र
पण मनही तसेच मुरब्बी
अलगद हातावर तुरी देतं...........
मनाचा आणि मेंदूचा छत्तीसचा आकडा
मी सांभाळतो दोघांनाही जीवापाड
राहतात दोघे हातात हात घेऊन
पण इतक्यात तुझ्या स्मृती पुन्हा डोकं वर काढतात ... !
मग मन वाहत जातं आसवांबरोबर
मेंदू उठतो पेटून , काळीज होत बैचेन
एकच रणकंदन माजतं
आणि रक्ताच पाणी पाणी होतं...... !
मग माझाही पारा चढतो
कपाळावर हात मारून निघून जातो एकांतात
स्थितप्रज्ञ राहण्याची खुणगाठ पक्की बांधतो मनात.....
डोळ्यांत तेल घालून बसतो
तूझ्या आठवांना उंबऱ्यावरच आडवतो
आणि घेतो अंग काढून
सुखाची सारी दारं .. कवाडं बंद करुन !
पण पुन्हा मन काळजाशी संधान साधते
आणि विचलीत होऊन मेंदूची त्यांच्याशीच युती होते...
आता मीच पडतो एकाकी
आणि इतिश्री होते माझ्या संयमाची...!

शिव पंडित
© All Rights Reserved