...

1 views

सोबत

अशी उभी का एकटी
विचारलं कोणीतरी
तेव्हा समजलं मला
जागेवर नाही हरी ...

कुठे शोधू विठुराया
सारी पंढरी हिंडले
जीपीएस सीसी टीव्ही
जंग जंग पछाडले ...!

कुठे शोधू विठुराया
नाही तुला मोबाईल
एक्स , इंस्टा ,फेसबुक
तुझे नाही प्रोफाईल ...

मग गाठला मिडीया
त्यांचे मलाच सवाल
टीव्ही वगैरे बघ ना
किती झालाय बवाल.. .

म्हणे सापडल्या मूर्ती
खोल खोल तळघरी
आता ओळखावे कसे
कोण खोटी कोण खरी...

पुन्हा घातलाय घाट
तुझ्या भव्य राऊळाचा
पुन्हा पडेन एकटी
घात माझ्या संसाराचा ... !

एकटीच आहे उभी
झाली युगे अठ्ठावीस
आता पुरे हा दुरावा
मन झाले कासाविस...

नको वेगळे राऊळ
नको भव्य इमारत
माझा विठुराया हवा
माझ्या संगत सोबत... !


© Dr.Shiv Pandit
#marathikavita