...

61 views

इतकं सुंदर आयुष्य असूनही...
चार दिवसाच्या आयुष्यात फुलपाखराला ही वाटतं बेधुंद बागडावं...!
आपलेच रंग उधळीत मनसोक्त उडावं...!
पुन्हा जन्म आहे की नाही हे त्याने न जाणावं...!
मग इतकं मोठं आयुष्य असूनही
माणसानं दुःखी का असावं...!!!


मधासाठी वण वण फिरून माशीने पोळं गच्च भरावं...!
आपण माणसानं स्वार्थासाठी क्षणात माशी आणि पोळ्याला वेगळं करावं...!
तरीही त्यांनी पुन्हा कामाला लागावं...!
मग इतकं गोड आयुष्य असूनही माणसानं उदास का बसावं...!!!


आलेल्या वादळातून पक्षांसारखं पुन्हा उभं राहावं...!
काडी काडी जमवून परत घरटं बांधव...!
पिल्लांसाठी झेप घेऊन रोज आकाशी उडावं...!
मग इतकं मनासारखं आयुष्य असूनही माणसानं असमाधानी का राहावं...!!!


गृहित धरत नाही कोणी आपल्याला हे मुंग्यांनी ही जाणावं...!
कधी ही घर त्यांचं मोडून जाईल हे त्यांना माहीत असावं...!
तरीही इवल्याश्या जीवांनी कण कण करून वारूळ जमवावं...!
मग इतकं सुंदर आयुष्य असूनही माणसानं निराश का व्हावं...!!!


देशासाठी जीव आपला धोक्यात घालून सीमेवर लढावं...!
घर आणि स्वप्न त्यांची, कर्तव्यापुढे अपूर्ण राहावं...!
भारतमातेच्या रक्षणासाठी अमर होऊन त्यांनी उरावं...!
मग इतकं सुरक्षित आयुष्य असूनही माणसानं का घाबरावं...!!!


येणाऱ्या वेळेला हिमतीने सामोरंच जावं...!
संकटांनी ही सत्य जाणून माघारी फिरावं...!
मुफ्त मिळालेल्या जीवनाला स्वतः का संपवावं...!
मग इतकं खंबीर आयुष्य असूनही माणसानं जगणं का थांबवावं...!!!

{POURNIMA}🖊️