...

3 views

आपला भारत आता म्हातारा होऊ लागला
आपला भारत आता म्हातारा होऊ लागला!!!

200 वर्षांची गुलामी सोसली,
न जाणे कित्येक क्रांतिकारींनी आपली आहुती दिली.
सत्याहत्तर वर्षांपुर्वी मोकळ्या नभात फडकला,
आज आपला भारत म्हातारा होऊ लागला.

विविध परंपरेनी भारत माता नटलेली,
समस्त धर्मांना आसरा देऊन माय माझी थकली,
पितृत्व निभावतांना हिंदुस्थान पुरता खचला,
त्यास आधार द्यायला हवा,
कारण आपला पिता आता म्हातारा होऊ लागला.

नैसर्गिक खैरातीने ती होती सजलेली,
लेकरांची हाव शमावतांना खुद्द लंकेची पार्वती जाहली.
आपल्या मागण्यांना जरा आवर घाला रे,
आपला कल्पवृक्ष आता म्हातारा होऊ लागला रे.

अंतराळी तंत्रज्ञानाने गगन भरारी घेतली,
पण सामान्य ज्ञानाची पात्रता तेवढीच घसरली.
सुजाण न् सक्षम नागरिकांची गरज आहे उद्याला ,
आपला आर्यवर्त आता म्हातारा होऊ लागला.

शिक्षा, क्रिडा, उद्योगात मान थोडी उंचावली,
का कुणास ठाऊक? कृषी गटात मात्र नाराजी कायमची राहिली.
कष्टाच्या जोरावर शिकूया उभारी घ्यायला,
त्याला हातभार द्यायला हवा,
कारण आपला भारतखंड आता म्हातारा होऊ लागला.

आपली मृदा, संपदा आपणच पाहिजे तारली,
चहूदिशांनी वधारूया सर्व मिळून खूशाली .
वयाचा मान राखून सलामी ठोकूया तिरंग्याला,
तर INDIA नसून हा आपला भारत म्हातारा होऊ लागला.

.... 📝 गेयता.
© All Rights Reserved