...

8 views

मी रणभूमी..
वज्रबाहू खड्गास मिळे जिथे नवी उर्मी
अदम्य मनांच्या वीरांची प्रिय..मी रणभूमी...धृ

महारुद्र तांडवी मी भद्र कालिका
प्रलयप्रपाती मी कोसळती उल्का
धगधगत्या अग्नितेजाची रश्मि..मी रणभूमी...१

उधाण सागरी मी सारंगी गलबत
सीमोल्लंघनी मी मानाची नौबत
कालजयी योध्यांची कर्मभूमी..मी रणभूमी...२

मी अमर पवित्र भगव्याचे धैर्य
मी शिवशंभूच्या मनगटीचे शौर्य
घडविते सरसेनापती पराक्रमी..मी रणभूमी...३

आक्रुद्ध अंतरीची पेटती ज्वाला
शर्थीच्या वेळी अंतिम जयमाला
धर्म अधर्म समराची अंतर्यामी..मी रणभूमी...४

मी उसळत्या समशेरींची पात
मी सळसळत्या धमन्यातील रक्त
धर्म संकटी महायज्ञ गिरामी..मी रणभूमी...५
© ishanya