...

3 views

श्रावण महोत्सव( भावगीत)
भावगीत
श्रावण महोत्सव
सजला हा श्रावण, हिरवळ चोहीकडे
अंगणात माझ्या ग पारिजातकाचे सडे||धृ||

अंगावर घेतले ग हरिततृण डोंगरांनी
श्रावणात घननीळा बरसतो रानोरानी
नागपंचमीचा सण पुजतात नाग फडे
अंगणात माझ्या ग पारिजातकाचे सडे||१||

सोमवारी महादेवा बेलपत्री पिंडीवरी
लेकी सुना आल्या पहा पुनवेला माहेरी
अशी अतूट ही नाती बहिनभाऊ माया वडे
अंगणात माझ्या ग पारिजातकाचे सडे||२||

उंच गेला माझा झोका सोबतीला या मैत्रीणी
सासरचे गोड गुज गेल्या सख्या मोहरूनी
मनोमनी जपले ग आईचे संस्कार धडे
अंगणात माझ्या ग पारिजातकाचे सडे||३||

शुभदिन श्रावणाचा सौख्य देवास मागते
सौभाग्य अखंड राहो महादेवास सांगते
सोबतीला सदोदीत रहा सांगणे ना पडे
अंगणात माझ्या ग पारिजातकाचे सडे||४||

ऊन पावसाचा खेळ श्रावणात हा रंगतो
सप्तरंगी इंद्रधनु नभी सुरेख सजतो
नदी नाले खळाळती मनी श्रावण प्रीत जडे
अंगणात माझ्या ग पारिजातकाचे सडे||६||

प्रफुल्लित सृष्टी सारी मनभावन दृश्य किती
श्रावणाचे गुणगान पक्षी मंजूळ हे गाती
सांगता श्रावणाची न व्हावी वाटे मनी
ऋतूराज सांगा कसा थांबेल हा गडे||७||
अंगणात माझ्या ग पारिजातकाचे सडे

अनुरत्न
सौ अनुराधा रत्नाकर उपासे मस्के
मंगरूळ ता तुळजापूर
© All Rights Reserved