...

2 views

गडकोटातून - राव (सरसेनापती प्रतापराव गुजर)
#विश्व_कविता_दिवस

संभवसंभव या मातीतून
अवतरला झंझावात
"राव" तयांचे नाव असे जो
रुद्राचा मानस प्रपात
मेघ बरसुनी उदंड भूवरी
जशा कोसळती धारा
कर्तुमकर्तुम राज्यनभाचा
आज निखळला तारा...धृ

अंगेजणीची झुंज जाहली
उमराणीच्या युद्धात
बहलोलाची मस्ती जिरली
पाणी रोखता क्षणात
परि शत्रूला शरण दिल्याने
राजांचा चढला पारा
कर्तुमकर्तुम राज्यनभाचा
आज निखळला तारा...१

रुष्ट होऊनि छत्रपतींनी
लिहिले रावास खत
उद्विग्न सेनापतींचे मनी
सूडाने उसळले रक्त
रणचंडीच्या महायज्ञाचा
आज पेटला निखारा
कर्तुमकर्तुम राज्यनभाचा
आज निखळला तारा...२

सौदामिनीचा वेग घेऊनी
महारथी दौडले सात
अरि गगनाचा वेध घेऊनी
झाला महा उल्कापात
अभिषेक करुनि श्वासांचा
वाहती रुधिराच्या धारा
कर्तुमकर्तुम राज्यनभाचा
आज निखळला तारा...३

© ईशान्य (निखिल दातार)